पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने केली इच्छामरणाची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं पत्र

सूरतमधील किरीट पटेल यांनी पत्नी आणि नातेवाईकांकडून होत असलेल्या कथित छळाला कंटाळून इच्छामरणाची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या अर्जामुळे वैवाहिक वाद, पुरुषांचे हक्क यावर चर्चा सुरू झाली आहे.
पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने केली इच्छामरणाची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं पत्र
पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने केली इच्छामरणाची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं पत्र
Published on

वैवाहिक वाद, न्यायासाठी केलेली धावपळ आणि मानसिक तणाव यामुळे हतबल झालेल्या सुरतमधील एका व्यक्तीने थेट इच्छामरणाची परवानगी मागितल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, किरीट पटेल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करून पत्नी आणि तिच्या नातेवाईकांकडून होत असलेल्या कथित छळामुळे जगण्याची इच्छा उरली नसल्याचे म्हटले आहे.

सुरतमधील रहिवासी असलेल्या किरीट पटेल यांनी आपल्या अर्जात दीर्घकाळ सुरू असलेले कौटुंबिक वाद, मानसिक त्रास आणि तक्रारींवर कारवाई होत नसल्याने इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.

पत्नीवर गंभीर आरोप

पटेल यांनी पत्नीवर महिलांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्यांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. कौटुंबिक वाद निर्माण केल्यानंतर पत्नी पोलिस किंवा महिला हेल्पलाइनकडे तक्रार करत असे आणि त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.

मुलाच्या जीवाला धोका असल्याचाही दावा

पटेल यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलाबाबतही गंभीर आरोप केले आहेत. पत्नीने मुलाला इजा करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला असून, याबाबत पोलिसांकडे तक्रार करूनही एफआयआर दाखल करण्यात आला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या प्रकरणाची चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणी त्यांनी वारंवार केल्याचेही सांगितले आहे.

‘लुटेरी दुल्हन’ असल्याचा आरोप

या प्रकरणातील आणखी एक चर्चेचा मुद्दा म्हणजे दोघांचाही हा तिसरा विवाह असल्याचा दावा. पटेल यांनी पत्नीला "लुटेरी दुल्हन" संबोधत, ती विवाहानंतर आर्थिक आणि कायदेशीर दबाव निर्माण करून पतींकडून पैसे उकळते, असा आरोप केला आहे.

पत्नीने यापूर्वीच्या विवाहांमधूनही आर्थिक लाभ मिळवल्याचा दावा त्यांनी केला असला, तरी या आरोपांनाही कोणताही अधिकृत आधार मिळालेला नाही.

नोव्हेंबर २०२४ मध्ये झाला विवाह

पटेल यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा सध्याचा विवाह १४ नोव्हेंबर २०२४ रोजी झाला. त्यानंतर पत्नी, सासू आणि इतर नातेवाईकांकडून सातत्याने पैशांसाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

तसेच, त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेले पोटगी आणि कौटुंबिक हिंसाचाराशी संबंधित खटले हे दबावाचे साधन म्हणून वापरले जात असल्याचाही दावा त्यांनी केला.

इच्छामरणाची मागणी का?

इच्छामरणासाठी दिलेल्या अर्जात पटेल यांनी पुरुषांच्या वैवाहिक वादांमध्ये त्यांना पुरेसे कायदेशीर संरक्षण मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. पोलिस ठाणे आणि शासकीय कार्यालयांचे अनेकदा उंबरठे झिजवूनही केवळ आश्वासने मिळाली, प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झाली नाही, असे त्यांनी नमूद केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्वीकारण्यात आलेल्या या अर्जात त्यांनी इच्छामरणाची परवानगी मागितली असून, याशिवाय स्वतःकडे दुसरा कोणताही मार्ग उरला नसल्याचे म्हटले आहे.

पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने केली इच्छामरणाची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं पत्र
भरधाव ट्रकने कारला फरफटत नेले; थोडक्यात वाचला बाप-लेकीचा जीव, अंगावर शहारे आणणारा VIDEO व्हायरल

अधिकाऱ्यांची भूमिका अद्याप स्पष्ट नाही

पटेल यांनी आपल्या तक्रारींकडे ठराविक कालावधीत लक्ष दिले गेले नाही, तर टोकाचे पाऊल उचलण्याचा इशाराही दिला आहे. मात्र, त्यांच्या आरोपांबाबत किंवा इच्छामरणाच्या मागणीबाबत प्रशासनाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान, या प्रकरणामुळे वैवाहिक वादांमधील पुरुषांचे मानसिक आरोग्य, उपलब्ध कायदेशीर पर्याय आणि कौटुंबिक तक्रारी हाताळण्याच्या यंत्रणेवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. कायद्यानुसार पुढील प्रक्रिया आणि चौकशी केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in