अस्वस्थ वर्तमान
डॉ. प्रवीण बनसोड
आजच्या समाजात तरुणांच्या चर्चा जास्त करून पैशावर केंद्रित झालेल्या दिसतात; मोबाईल आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाइन फसवणूक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने आर्थिक आणि मानसिक अस्वस्थता निर्माण होत आहे.
ज्यावेळी एखाद्या समाजाची गरज केवळ 'पैसा' हीच असते, तेव्हा तो समाज फारसा प्रगल्भ झाला आहे, असे आपल्याला म्हणता येत नाही. कारण माणसाला विचारशक्ती असते, नवकल्पना, नावीन्यता आणि जगण्यातील सौंदर्य सुदृढ समाजासाठी गरजेचे असते, परंतु तरुणांच्या कट्ट्यावर बोलण्यात जगण्यातील प्रश्नांपेक्षा पैसा कमावण्याचे विषय जास्त चर्चिले जातात, तेव्हा त्यांच्या भवितव्याविषयी चिंता वाटू लागते. माणसाचे विचार त्यांनी स्वतः निर्माण केलेले नसतात, तर त्यांना कोणीतरी तसे विचार करण्यासाठी भाग पाडत असते.
त्यातून 'कसाही कमवा पण पैसा कमवा' अशी नवी 'मार्केट व्हॅल्यू' निर्माण केली जात असते. चित्रपटांमधून दाखविले जाणारे श्रीमंतीचे दर्शन आणि त्यासाठी केले जाणारे फसवणुकीचे समर्थन तरुणांना जीवन जगण्याचे नवे तत्त्वज्ञान सांगत असते. त्यामुळे मध्यम शहरांमध्ये राहणारा तरुणसुद्धा पैसे कमावण्याचे विविध मार्ग शोधत असतो. नीती आणि अनीतीचे नियम भांडवली व्यवस्थेला लागू पडत नाहीत. ही व्यवस्था आपल्या समर्थनार्थ समाजमन निर्माण करीत असते. जगण्यासाठी आवश्यक असणारा पैसा कोणत्याही माध्यमातून यावा, असे नवे तत्त्वज्ञान या व्यवस्थेने निर्माण केले आहे. त्यातच हातात आलेल्या मोबाईल आणि त्यातील विविध अप्लिकेशन्सचा वापर करून सहजपणे दुसऱ्याची फसवणूक करता येते आणि फसवणूक केल्यानंतर पकडले जाण्याची ही कोणतीही शक्यता नसते. त्यामुळे हा मार्ग अनेकांना सहज आणि सोपा वाटू लागतो. पण त्यासाठी हवे असते तांत्रिक ज्ञान. तांत्रिक ज्ञान वापरून दुसऱ्यांना फसवणूक करता येणे सहज शक्य आहे, हे लक्षात आल्यानंतर दुसऱ्यांच्या भावनांचा विचार न करता सहजपणे फसवणूक केली जाते.
सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आपणा सर्वांच्या हातात आली आहे, पण खरोखर त्यामुळे मानवाचे जीवन समृद्ध बनणार आहे का, हा खरा प्रश्न आहे. निदान भारतासारख्या देशांमध्ये तरी यामुळे सामान्य माणसाच्या जीवनात बदल होतील असे म्हणता येत नाही. उलट मोबाईलच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे आर्थिक घोटाळे आणि लुटीचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. मोबाईल आणि त्यातील विविध अप्लिकेशनचे तंत्रज्ञान वापरणारी मंडळी शिक्षित आहेत. त्यापैकी काही तर उच्चशिक्षित तंत्रज्ञ आहेत. पण या ज्ञानी माणसाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून लोकांना गंडवण्यास आणि आर्थिक लुटीचे साधन बनवले आहे, ही मात्र गंभीर स्थिती आहे. प्रसिद्ध लेखक उदय नारकर यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे, 'आपण आपल्या कृतीनुसार विचार करत असतो. मनुष्याचं असणं तसंच आहे. काहीही न करता माणूस विचार करू शकत नाही. आपले विचार काळसूत्रात गुंफलेले दिसतात, याचं कारण आपलं शरीर आणि संवेदनादेखील तशाच काळसूत्रात गुंफलेल्या असतात. यंत्र विचार करू शकतील का, असा प्रश्न तत्त्वज्ञांना कधी कधी पडतो. कदाचित ती करूही शकतील; पण त्यांची विचार करण्याची पद्धत आपल्यापेक्षा खासच वेगळी असणार. याचं कारण यंत्राची भौतिक रचना आपल्याहून सर्वस्वी भिन्न असते. त्याला शारीरिक गरजा नसतात, भावनिक आयुष्य नसतं. यंत्राला इंधन लागतं, पण तहान लागत नाही. इंधन मिळालं नाही, तर ते निमूट बसेल. तळमळणार नाही. माणसाचं भावनिक आयुष्यदेखील त्याच्या भौतिक गरजांशी निगडित असतं. या व्यावहारिक, संवेदनांच्या आणि भावनांच्या पर्यावरणापासून आपला विचार अलग करता येत नाही. त्यामुळे यंत्राला विचारशक्ती प्राप्त झालीच तर ते कसला विचार करतंय हे आपल्याला कळण्याची सुतराम शक्यता नाही.'
जर यंत्राला आणि कृत्रिम बुद्धिमत्तेला भावनाच नसतील आणि त्याचा वापर करणारी व्यक्ती चुकीच्या पद्धतीने वापर करत असेल तर मग याचा दोष कोणाला द्यायचा.. आपल्या वैचारिक स्वातंत्र्याला की स्क्रीनवरून बिनदिक्कतपणे बोट फिरवून दुसऱ्यांना लुबाडण्याचं स्वातंत्र्य मिळालं याला.. शेवटी हाच मुद्दा उरतो, स्वातंत्र्य आपण कसे वापरतो.. समाजाच्या भल्यासाठी की दुसऱ्यांना नुकसान पोहोचविण्यासाठी. यासंदर्भात आपल्या देशाची आकडेवारी अतिशय बोलकी आहे.
२०२५ मध्ये ऑनलाइन फसवणुकीत भारतातील सुमारे ₹१९,८१२.९६ कोटींचे नुकसान झाले. यापैकी ७७% तोटा गुंतवणूक स्कॅम्समुळे झाला, ८% डिजिटल अटक , ७% क्रेडिट कार्ड फ्रॉडमुळे आणि इतर प्रकारच्या फसवणुकीमुळे बाकीचं नुकसान झालं. म्हणजेच, २०२५ मध्ये भारतात ऑनलाइन फसवणुकीमुळे सुमारे ₹१९,८०० कोटी (१९.८ हजार कोटी) इतकी रक्कम लोकांनी गमावली.
आधुनिक युगाला डिजिटल युग असे म्हणतात. इंटरनेट, स्मार्टफोन, ऑनलाइन बँकिंग, सोशल मीडिया यांमुळे आपले दैनंदिन जीवन अधिक सोपे आणि वेगवान झाले आहे, असे वाटते. मात्र या डिजिटल सुविधांबरोबरच ऑनलाइन फसवणूक ही एक मोठी सामाजिक समस्या बनली आहे. तंत्रज्ञानाचा गैरवापर करून लोकांची आर्थिक, वैयक्तिक आणि मानसिक फसवणूक केली जाते.
ही फक्त आर्थिक फसवणूक नाही, तर ती मानसिक वेदनाही आणि अस्वस्थता देते. वर्तमानाची ही अस्वस्थता भविष्यात अनेक धोके निर्माण करणार यात शंका नाही.