संपादकीय

राज‍नीतीपेक्षा प्रभावी व्हावी लोकनीती!

सत्तेसाठी मूल्यांची तडजोड, बेताल विधाने आणि संधीसाधूपणाने भरलेले आजचे राजकारण लोकशाहीला घातक ठरत असून, यावर उपाय म्हणजे सजग नागरिकांनी राजकारणापेक्षा प्रभावी अशी लोकनीती उभारणे होय.

नवशक्ती Web Desk

लक्षवेधी

डॉ. संजय मंगला गोपाळ

सत्तेसाठी मूल्यांची तडजोड, बेताल विधाने आणि संधीसाधूपणाने भरलेले आजचे राजकारण लोकशाहीला घातक ठरत असून, यावर उपाय म्हणजे सजग नागरिकांनी राजकारणापेक्षा प्रभावी अशी लोकनीती उभारणे होय.

राजकारण अत्यंत खालच्या पातळीवर उतरवण्याची ऑलिंपिक स्पर्धा लागल्याप्रमाणे, राज्यातील सत्ताधारी नेते-कार्यकर्ते वागत आहेत. केंद्रात आणि राज्यात येनकेनप्रकारेन सत्ता ताब्यात ठेवणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, ‘लातूरमधून विलासरावांचे नामोनिशाण मिटा देंगे’, अशी मुक्ताफळं उधळतात. पुण्यामध्ये भाजपने केलेल्या अमाप भ्रष्टाचाराचे पाढे, त्यांच्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात सहभागी असलेले त्यांचे सत्तेतील भागीदार उपमुख्यमंत्री पुराव्यानिशी मांडतात. त्यांना पत्रकारांनी भ्रष्टाचाराबद्दल काही विचारले तर म्हणतात, ‘माझ्यावर सत्तर हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्यांसोबत मी सत्तेत आहे’! राज्य मंत्रिमंडळात सामील असणारे नवी मुंबईतील भाजपचे एक वरिष्ठ नेते, मंत्रिमंडळातील त्यांचे वरिष्ठ असणाऱ्या दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांबाबत, ‘त्यांनी माझ्या नादाला लागू नये. त्यांचाही टांगा उलटा करून टाकेन, त्यांचे घोडे फरारच नव्हे तर गायब करून टाकेन!’ असे म्हणतात. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या साऱ्याला नुसते अपवादच ठरणार नाहीत तर राजकारणातील या चुकीच्या बाबींना आळा घालतील, ही अपेक्षाही व्यर्थ! मुघलांच्या सरदारांना जसे जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी छत्रपती राजाराम महाराजांचे सरदार संताजी-धनाजी दिसत असत, तसे यांना सर्वत्र ठाकरे बंधू दिसत आहेत. उद्धव आणि राज ठाकरे म्हातारे झालेत, अशी भाषा ते वापरतात. 

‘या बोटावरची थुंकी त्या बोटावर’, ही स्पर्धाही सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या ऑलिंपिकमध्ये सुरू केली आहे. हे करताना केंद्र आणि राज्यस्तरावरील आपलेच जोडीदार पक्ष कसे गाळात निघतील, याची पद्धतशीर तजवीज सुरू आहे. ‘मीच मोठा भाऊ’, अशी चढाओढ करणाऱ्या भाजपला या स्पर्धेत हरवणं इतरांना अवघड जातं. दहा नेत्यांनी, अकरा तोंडाने, बारा बेताल विधानं, तेरावेळा करायची; ही भाजपची नेहमीची खासियत आहे. उलटसुलट डायलॉगबाजी करायची आणि जे विधान फारच लोकक्षोभाला बळी पडेल ते मग निमूटपणे मागे घ्यायचं आणि वर आम्ही असं बोललोच नव्हतो, अशा थापा मारत पुढची संधीसाधू विधानं करीत सुटायचं, याचे भक्कम प्रशिक्षण भाजप नेत्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघात पुरेपूर देण्यात आलं आहे. विदर्भात आपल्या सहकारी शिंदेसेनेला स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने ज्या एमआयएम पक्षाच्या नावे बोटं मोडण्यात उभं आयुष्य घालवलं त्याच्यासोबतच युती जाहीर केली. अंबरनाथमध्ये सहयोगी शिंदेसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी, भाजपने चक्क काँग्रेससोबत युती करायचं ठरवलं. भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाला याबाबत प्रश्न करताच, हे स्थानिक स्तरावरील निर्णय चुकीचे असल्याचे सांगत त्यांच्यावर कारवाई करू, असं सांगितलं. काँग्रेसने या पक्षविरोधी कृत्याबद्दल आपल्या १२ नगरसेवकांची लागलीच हकालपट्टी केली. भाजपने मात्र आपल्या पक्षातील स्थानिक नेत्यांवर कारवाई तर केली नाहीच उलट काँग्रेसने पक्षातून बाहेर काढलेल्या १२ जणांना भाजपमध्ये प्रवेश दिला! ‘सत्तेसाठी काहीपण’ ही एक नवीन ऑलिंपिक स्पर्धा भाजपने देशात सध्या सुरू केली असल्याने, त्याचा खेळ ते महाराष्ट्रातही करून दाखवत आहेत! 

या सर्वांवर कडी म्हणजे कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेत भाजपने स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त केलेले तुषार आपटे यांचे निमूट राजीनामा प्रकरण! या आपटेंचा कारनामा जनता विसरून गेली अशा भ्रमात भाजप पक्षनेते होते! देशभर ‘बेटी बचाओ’ म्हणून जाहिरातबाजी करणाऱ्या पंतप्रधानांच्याच भाजपने, स्वीकृती दिलेले हे तुषार आपटे म्हणजे काही महिन्यांपूर्वीच बदलापुरात एका शाळेत लहान विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने सत्तेवर येताच मागल्या शुक्रवारी झालेल्या नगरपरिषदेच्या विशेष सभेत नेमणूक झालेल्या स्वीकृत सदस्यांमध्ये भाजपने या आपटेंचा समावेश केला होता. जागरूक नागरिकांनी याबाबत आवाज उठवताच, दुसऱ्याच दिवशी या बेटीविरोधी बदमाशाला राजीनामा देण्याचे फर्मान भाजपला सोडावं लागलं! जनता गाफिल राहिली असती तर हा नराधम नगरपरिषदेत भाजपच्या कृपाप्रसादे निर्विघ्नपणे ५ वर्षांची मुदत पूर्ण करू शकला असता. जनतेची जागरूकता, हाच लोकशाहीतील लोकनीतीचा पाया आहे.

जनआंदोलनाचा राष्ट्रीय समन्वयाशी संलग्न घर बचाओ घर बनाओ आंदोलनाने, ज्येष्ठ सामाजिक नेत्या मेधा पाटकर यांच्या संयोजनात मुंबईत विविध पक्षाचे उमेदवार, आमदार आणि नेत्यांना लोकमंचावर बोलावून, जनतेच्या अपेक्षा विदित केल्या आणि त्यावर प्रत्येकाने आपापली भूमिका मांडावी असं सांगण्यात आलं. निवडून येणाऱ्या नेत्यांनी नंतर वचनभंग करण्याचा प्रयत्न केल्यास, जनता गप्प राहणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

पुण्यात स्त्रीमुक्ती आंदोलन संपर्क समितीने घोषित केलेल्या जाहीरनाम्यात आवाहन केले, ‘लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्यामागची प्रेरणा ही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी; प्रस्थापित जनविरोधी धोरणे बदलण्यासाठी; नैसर्गिक, आर्थिक आणि मानवी संसाधनांचा अधिक चांगला विनिमय करण्यासाठी असायला हवी. परंतु ती फक्त स्वतःच्या ‘विकासा’साठी आणि आपल्या बाजूने सत्ता वळवण्यासाठी आहे असे दिसून येते. त्यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवारांना रोखण्यापासून अर्ज मागे घ्यायला लावण्यापर्यंत सत्ताबळ, धनशक्ती आणि मनगटशक्तीचा सर्रास वापर होत आहे. निवडणुकीच्या तोंडावरही सामान्य लोकांच्या, स्त्रियांच्या, कष्टकरी वर्गाच्या नागरी गरजा व प्राथमिकता काय आहेत हे समजून घेण्याची बहुतांशी उमेदवारांना गरज वाटत नाही. अशी निवडणूक प्रक्रिया म्हणजे निव्वळ थट्टा असून नागरिकांच्या संविधानिक मताधिकाराचे अवमूल्यन आहे. या आधीही निवडणुकीत अपप्रकार व्हायचे, पण संपूर्ण निवडणूकच आता अपप्रकारांची मालिका बनल्याचे आपण पहात आहोत. तत्त्वशून्य राजकारणाचा हा अभूतपूर्व गोंधळ भारतीय जनता पक्षाच्या दशकभराच्या कारकीर्दीत अधिकच वाढला आहे. किंबहुना हेतुपुरस्सर वाढवला गेला असे आमचे स्पष्ट मत आहे. 

स्वच्छ निवडणूक प्रक्रिया डावलत लोकांवर लादलेले लोकप्रतिनिधी आम्हाला नको आहेत. लोकशाही प्रक्रियेतून जनमताने निवडून आलेले आणि लोकांप्रति उत्तरदायित्व असलेले लोकप्रतिनिधी हवेत. शहरातील पाणी, वाहतूक व्यवस्था, शिक्षण, आरोग्य, कचरा व्यवस्थापन, या नागरी सुविधांमध्ये आणि रोज ढासळत चाललेल्या पर्यावरणासाठी आवश्यक सुधारणा  तसेच  ज्यांच्या श्रमाने शहर चालते त्या श्रमिक स्त्रियांच्या प्राथमिकतांकडे लक्ष देण्याचा भरोसा वाटणाऱ्या उमेदवारांनाच निवडून द्यावे! 

सर्व आयुष्य आंबेडकरवादी पुरोगामी चळवळीत घालवल्यावर आपली निस्पृह पत्रकारिता सोडून, सत्ताधारी शिवसेनेत गेलेल्या कार्यकर्ता- नेत्याने म्हटल्याप्रमाणे मतदान करा! तुम्ही गुंड असा, माफिया असा, बलात्कारी असा, ठेकेदार असा, बिल्डर असा, आम्हाला काही देणेघेणे नाही. आम्हाला पैसे द्या, नाही तर पिकनिकला घेऊन जा, तीर्थयात्रेला घेऊन जा, नाही तर टीव्ही, कुकर, साडी द्या. आमचं मत तुम्हाला! निवडणुकीत असं मत विकून झाल्यावर हेच मतदार, महापालिकेत किती भ्रष्टाचार आहे ना पाणी येत नाही म्हणून मोर्चा काढणार, रस्ते नीट नाहीत म्हणून बोंब मारणार, आक्रोश करणार, व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर अक्कल पाजळणार आणि देश अमेरिका, जपान, जर्मनीसारखा झाला पाहिजे, अशी अपेक्षा करणार?

 ‘बोये बीज बबूल के, तो आम कहा से आये’! मतदान विकणे म्हणजे सावकाराच्या घरी आपले बैल पाठवण्यासारखे आहे. देशाच्या नकाशावरील आपला सातबारा, पाच वर्षांसाठी विकणे आहे. शिक्षित, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या, समाजसेवेचा अनुभव असणाऱ्या चारित्र्यसंपन्न उमेदवारांना मतदान करा! आपण मतदान केल्याचा अभिमान वाटला पाहिजे आणि पश्चात्तापही होता कामा नये. राजनीतीवर लक्ष ठेवून असणारी, राजनीतीपेक्षा प्रभावी लोकनीती उभारणारी जागरूक जनता, हीच लोकशाहीत खरी ताकद आहे. आगामी महापालिका निवडणुकीत सर्वांनी हे भान ठेवत, सत्ताधारी पक्षाला घरी बसवणारे मतदान करणे आवश्यक आहे!  

जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयाचे राष्ट्रीय समन्वयक आणि

भारत जोडो अभियानचे राष्ट्रीय सचिव sansahil@gmail.com

मुंबईकरांचे झोपेचे गणित बिघडले, मिळत नाही आठ तासांचीही झोप; शहरी जीवनशैलीचा दुष्परिणाम

CBSE चा मोठा निर्णय; मध्यपूर्वेत ७ देशांतील बारावीच्या परीक्षा रद्द, निकालाबाबत लवकरच होणार घोषणा

Air Indiaच्या ट्रॅव्हल पॉलिसीचा गैरवापर; ४ हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना दंड

दहावी-बारावी परीक्षेत 'मास कॉपी'चे प्राबल्य; १०३ कर्मचाऱ्यांवर गुन्हे; निलंबनाची कारवाई

ठाणे जिल्ह्यात HPV लसीकरण मोहिमेला वेग; १४-१५ वर्षांच्या मुलींना मोफत लस; पालकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन