अस्वस्थ वर्तमान
डॉ. प्रवीण बनसोड
राजर्षी शाहू महाराजांनी शेतीविकासाला चालना देतानाच शेती सिंचनाखाली आणल्याशिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार नाही, याची स्पष्ट कल्पना असल्यामुळे पाणी वापराबाबत योग्य धोरण ठरविले. शेती पाण्याखाली आणण्यासाठी प्रयत्न केले.
शेतीच्या विकासावरच देशाचा विकास अवलंबून असतो, त्याची पुरेपूर जाणीव असल्याने शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानात शेतीकडे जाणीवपूर्वक लक्ष्य दिले. दुष्काळ, गुरांचे आजार, अल्प उत्पादन याकडे लक्ष पुरवून शाहू महाराजांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाच्या योजना राबविल्या. राज्य कारभार स्वीकारल्यानंतर छ. शाहू महाराजांनी सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांचे प्रश्न समजून घेतले. शेतीच्या दुरवस्थेमुळे शेतकऱ्यांचे दारिद्र्य वाढून त्यांचे जीवनमान खालावते, याची जाणीव झाल्याने शेतीची उत्पादकता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न शाहू महाराजांनी सुरू केले. शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी आधुनिक तंत्र आत्मसात केले पाहिजे, असे मत छ. शाहू महाराजांनी मांडले आणि १९१२ मध्ये कोल्हापूर येथे ‘किंग एडवर्ड ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूट’ स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून सुधारीत बी-बियाणे, खते, पशुपालन याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचू लागली. अद्ययावत शेती, अवजारांचे प्रदर्शन भरवून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिक मिळू लागले. शिवाय आधुनिक शेती उपकरणांचे संग्रहालय सुद्धा शाहू महाराजांनी निर्माण केले.
शेतकऱ्यांनी वनौषधी आणि इमारती लाकडाची लागवड केल्यास त्यांचे उत्पन्न वाढू शकेल, हे ध्यानात आल्याने महाराजांनी साग, हिरडा, बेहडा, आंबा, फणस, काजू व इतर वनौषधींची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. साबुदाणा तयार होणाऱ्या टॅपिओकाची शेती करण्यासाठी विशेष प्रोत्साहन महाराजांनी दिले. शेतकऱ्यांना जाचक ठरणाऱ्या वनकायदा आणि पतधोरणात शाहू महाराजांनी तातडीने बदल करून शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. शेतकरी सावकारांकडून कर्ज घेत असल्याने आणि अव्वाच्या सव्वा व्याज देत असल्याने शेतकरी नाडला जातो, म्हणून शाहू महाराजांनी १८९५ मध्ये शेतकऱ्यांना दरबारामार्फत कर्जपुरवठा करण्यास सुरुवात केली. १ जून १९९९ रोजी एक वटहुकूम जारी करून सावकारांवर अनेक निर्बंध आणले, त्यानुसार शेतकऱ्याच्या शेतातील उभी पिके जप्त करण्यावर बंदी आणण्यात आली. शिवाय शेतकऱ्यांच्या जप्त केलेल्या जमिनी सोडविण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यास सुरुवात केली.
शेतकऱ्यांनी नगदी पिकाकडे वळले पाहिजे, असे शाहू महाराजांना वाटत असल्यामुळे त्यांनी पन्हाळा येथे चहा, कॉफी, रबर याचे खास मळे तयार केले, सोबतच बटाटे, कापूस, ताग, रेशीम यांसारखी पिके घेण्यास शेतकऱ्यांना प्रवृत्त केले, त्यामुळे चहा उत्पादनाचा प्रयोग मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाला. ‘पन्हाळा चहा नं. ४’ या नावाने नवीन ब्रँड प्रसिद्ध झाला, परंतु महाराजांच्या निधनानंतर हा ब्रँड बंद पडला. मानवी जीवन आणि शेती याचा अन्योन्यसंबंध सांगताना शाहू महाराज म्हणतात, “कृषी कर्मापासून दुहेरी उन्नती होते. स्वतःला सुख तर होतेच, शिवाय सर्व मनुष्यजातीलाही सुख मिळते. कृषी कर्म करताना क्षात्र धर्माला बाधा येते, ही समजूत निखालस आहे. श्रमाची प्रतिष्ठा जगात मोठी, फारच मोठी आहे. शेती ही श्रमाची प्रतिष्ठाच आहे.”
महाराजांच्या कारकीर्दीत शेती हाच प्रमुख व्यवसाय होता, परंतु शेतीचे लहान-लहान तुकड्यात विभाजन झाले होते. वाटणी व्यवहारामुळे अशा लहान तुकड्यांची निर्मिती झाली होती. लहान तुकड्यांची व्यवस्था बदलून त्याचे रूपांतर मोठ्या शेतीमध्ये व्हावे म्हणजे शेती व्यवसाय किफायतशीर होईल, असे शाहू महाराजांचे मत होते. हे मत त्यांनी बोलून दाखविले आणि तशी कृतीही केली. माणगावच्या परिषदेमध्ये भाषण करताना महाराज म्हणतात, “तुम्ही साधारण माणशी दहा एकर जमीन वाट्याला येईल असे तुमच्या म्हारकीचे तुकडे करा आणि हे उत्पन्न तुमच्यातील वडील असणाऱ्या व्यक्तीकडे चालवायला द्या. म्हणजे सर्वांना अर्धपोटी रहावे लागते ते वाचेल.” महाराजांनी आपले मत केवळ भाषणापुरते मर्यादित न ठेवता तशी कृती केली. त्यासाठी त्यांनी १९१३ ला अविभाज्य इनामाचा कायदा केला. त्यानुसार वाटणी करता येणार नाही, असे ठरविले. राजर्षी शाहू महाराजांनी शेतीचे विविध प्रयोग आणि संशोधनाला चालना दिली. जुन्या अवजाराच्या ठिकाणी नवी अवजारे, प्रत्यक्ष प्रात्यक्षिक, प्रदर्शने, शेतकी शाळा असे अनेक उपक्रम छत्रपती शाहू महाराजांनी राबविले. पन्हाळा व भुदरगड येथे चहा व कॉफीची लागवड, तर वेलदोडे, कॉफी, रबर, ताग, बटाटे, अंबाडी, लाख, ट्रॅपिओका, कंबोडियन, कापूस इत्यादींची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन व सहकार्य दिले.
शाहू महाराजांची जलनीती : राजर्षी शाहू महाराजांनी शेतीविकासाला चालना देतानाच शेती सिंचनाखाली आणल्याशिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार नाही, याची स्पष्ट कल्पना असल्यामुळे पाणी वापराबाबत योग्य धोरण ठरविले. शेती पाण्याखाली आणण्यासाठी नव्या विहिरी, तलाव, बंधारे आणि कालवे बांधायला सुरुवात केली. त्यापैकी त्यांच्या दूरदृष्टीचा उत्कृष्ट नमुना म्हणजे ‘राधानगरी धरण’ होय. आज या धरणाला शंभरपेक्षा जास्त वर्षे होऊनही त्याचे बांधकाम उत्कृष्ट आहे. महाराष्ट्रातील इतर भागाप्रमाणे कोल्हापूर विभागातही दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत. त्यामुळे दुष्काळ निर्मूलनासोबतच भविष्यकालीन पाणी नियोजनाचे धोरण शाहू महाराजांनी राबविले. रयतेच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतानाच शेतीच्या सिंचनाची व्यवस्था महाराजांनी केली. १९१५-१६ या वर्षातील अहवालावरून असे दिसते की, कोल्हापूर संस्थानात नद्यांमधून ३९,७८३ एकर, विहिरीमधून ३९,८४५ एकर आणि तलावांमधून २३२ एकर अशी एकूण ७९,८६० एकर क्षेत्रावरील शेतीच्या सिंचनाची सोय होत होती. हे क्षेत्र अधिक वाढण्यामागे शाहू महाराजांची दूरदृष्टी आणि प्रयत्नपूर्वक नियोजन हे होते. भूजलातून पाणी उपसा न करता नदी, तलावांतील पाणी वापरण्यावर त्यांचा भर होता म्हणून १९०९ मध्ये राधानगरी धरण प्रकल्प हाती घेण्यात आला. १९१८ पर्यंत या धरणाच्या कार्यासाठी शाहू महाराजांनी १४ लाख रुपये खर्च केले. परंतु महाराजांच्या कारकीर्दीत हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. पुढे राजाराम महाराजांनी हा प्रकल्प पूर्ण करून राजर्षी शाहू महाराजांचे स्वप्न पूर्ण केले. जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी वाहून न जाता योग्य प्रकारे साठविले तरच भविष्यातील दुष्काळाला तोंड देता येणे शक्य आहे, याची पुरेशी कल्पना असल्याने राजर्षी शाहू महाराजांनी नवीन सार्वजनिक तळी बांधण्याची मोहीम हाती घेतली. दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी १९०२ मध्ये पाटबंधारे धोरण जाहीर केले. त्यासाठी पाटबंधारे खाते निर्माण करून खास इरिगेशन ऑफिसरची नेमणूक केली. आपल्या संस्थानात जलनीती आखण्यासाठी पाटबंधारे खात्यामार्फत प्रत्येक गावाची तपशीलवार पाहणी करून शाहू महाराजांनी धोरण आखले. सिंचन प्रकल्पाबाबत तर त्यांची महत्त्वाकांक्षा आकाशाला गवसणी घालणारी होती. कर्नल फेरिस या इंग्रज अधिकाऱ्यास लिहिलेल्या पत्रात शाहू महाराज म्हणतात, “आपण येथून निघून गेल्यावर, मी सुमारे २० बंधारे बांधले. पण माझी महत्त्वाकांक्षा पूर्ण झाली नाही म्हणून मी आता एक मोठा सिंचन प्रकल्प हाती घेणार आहे आणि टंचाईवर मात करणार आहे. घराघार पाण्यामुळे समृद्धी नांदायला हवी.”
शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीकरिता सिंचन आणि शेती शिक्षणाची गरज ओळखून त्याप्रमाणे कृती करणारे राजर्षी शाहू महाराज यांचा एक जाहीरनामा मुळातून वाचण्यासारखा आहे. या जाहीरनाम्यातून शाहू महाराजांची सिंचनाबाबतची दूरदृष्टी दिसून येते. शाहू महाराजांच्या या जलनीतीचा प्रत्यक्ष परिणाम पुढील काळात दिसून आला. स्वतंत्र पाटबंधारे खाते निर्माण करून भविष्यकालीन दुष्काळाला थोपविण्यासाठी महाराज प्रयत्नशील होते. त्यामुळेच १९०६ साली संस्थानात असलेल्या ११ हजार ७०० विहिरींमध्ये वाढ होऊन १९२० पर्यंत ९८ हजार ८०० इतक्या विहिरी झाल्या. शिवाय शहापूर रुकडी, शिरोळ या परिसरात २० नवीन तलाव बांधण्यात आले. शाहू महाराजांच्या या शेती व जलनीतीचा अवलंब करण्याची आजही गरज आहे.