मुलुख मैदान
रविकिरण देशमुख
मन मोठे करून राज्यसभेची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी सोडावी तर उद्या हे दोघे एकत्र राहतील पण आपण पुढे एकाकी पडलो तर काय, ही चिंता काँग्रेसला सतावत असावी.
गुरुवारी राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपताना राज्याच्या राजकारणाची पुढील दिशा ठरेल असे संकेत दिसत आहेत. काँग्रेस आणि शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही पक्ष महाविकास आघाडीला (मविआ) मिळू शकणाऱ्या एकमेव जागेसाठी आग्रही असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासाठी ते जो काही निर्णय घेतील त्यातून बरेच संकेत प्राप्त होतील.
पवार यांनी अलीकडेच संसदीय कारकिर्दीच्या ६० व्या वर्षात पदार्पण केले. आता जर ते पुन्हा राज्यसभेत गेले तर पुढील वर्षी साठ वर्षे पूर्ण होतील. त्यांच्या निकटवर्तीयांना हा विक्रम पवार यांच्या नोंदवला जावा अशी इच्छा असेल. तामीळनाडूचे दिवंगत मुख्यमंत्री करुणानिधी सलग १३ विधानसभा निवडणुका जिंकत ६० वर्षे विधानसभा सदस्य राहिले. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात ५० वर्षे कार्यरत होते. पण विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा या चारही सभागृहाचे सदस्यत्व ६० वर्षे भूषविणारे पवार एकमेव असतील.
पवार यांनी उमेदवारीबाबतचे इरादे स्वतः स्पष्ट केलेले नाहीत. पण मंगळवारी सायंकाळी त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे व ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे उध्दव ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर जाऊन आले. तिथे पवार यांच्या उमेदवारीबाबत चर्चा झालीच असणार.
शरद पवार यांच्या स्वभावाप्रमाणे स्वतःहून ते या विषयावर बोललेले नाहीत. त्यांच्या मनातले जाहीरपणे कोणी बोललेले नाही. मविआकडे एक उमेदवार आरामात निवडून आणण्याचे संख्याबळ असतानाही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस जवळ येतानाही उमेदवार ठरत नाही. आणि तो ठरत नाही म्हणून भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील महायुतीचे उमेदवार जाहीर करणे लांबवले गेले. राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी ३६ मतांची गरज आहे. हे मतदान गोपनीय नसल्याने कोण कोणाला मत दिले हे लगेच कळते. महायुतीचे संख्याबळ पाहता त्यांचे सहा उमेदवार आरामात निवडून येतात शिवाय त्यांच्याकडे २४-२५ मते शिल्लक राहतात. शरद पवार स्वतः उमेदवार नसले तर कदाचित महायुती सातवा उमेदवार देण्याची शक्यता यामुळेच नाकारता येत नाही.
दुसऱ्या बाजूला पवार स्वतः निवडणुकीसाठी उभे राहिले तर झाकली मूठ सव्वालाखाची असा काहीसा प्रकार मविआबाबत होणार आहे. पवार यांनी संसदीय कारकिर्दीच्या ६० व्या वर्षात अलीकडेच पदार्पण केले. तेव्हा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमात ‘एक्स’वर त्यांच्याबद्दल एक गौरवपर संदेश टाकला होता. याचा अर्थ शरद पवार पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर राष्ट्रवादीकडे असलेली जास्तीची मते त्यांच्याकडे वळविली जाण्याची शक्यता वाढते.
पवार यांना मते देण्यात त्यांच्यापासून दूर केलेल्या राष्ट्रवादीला गैर वाटण्याचे कारण नाही. एकतर त्यांचे वय, राजकारणातील त्यांचे स्थान आणि त्यांना असलेली सहानुभूती पाहता त्यांच्या विरोधात राजकीय पाऊल उचलणे काहींना गैर वाटेल. तिकडे काँग्रेसला मात्र मविआला मिळू शकणाऱ्या एका जागेची आस लागली आहे. सध्या त्यांना राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद टिकविणे आवश्यक वाटते आहे. त्यासाठी किमान २५ म्हणजे एकूण सदस्यसंख्येच्या १० टक्के सदस्य असणे आवश्यक आहे.
हे पद आपल्याकडेच असावे यासाठी त्यांना महाराष्ट्रातील राज्यसभेची एक जागा आवश्यक वाटत असावी. ती गरज मविआतील इतर दोन पक्षांना वाटतेय का हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. एकतर मविआ आज प्रत्यक्षात आहे की केवळ कागदावर अस्तित्वात आहे हे विशेष आहे.
मविआची स्थापना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी झाली. त्यानंतर भाजपाने अशीकाही दमछाक सुरू केली की राजकीय अस्तित्वासाठी मविआतील तिनही पक्षांना सोबत राहणे आवश्यक वाटू लागले. भाजपाच्या चौफेर हल्ल्यामुळे रोजच आव्हानांना सामोरे जात असतानाही जनता त्यांच्या सोबत राहिली आणि लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत ३० जागा निवडून आल्या. त्यामुळे आता विधानसभा आपलीच अशा थाटात मविआचे नेते राहिले. त्यांच्यातील काहींचे महायुतीवर प्रेम आहे हे ही इतरांना कळत होते. पण जनमताचा रेटा आपल्यामागे आहे या भावनेने त्यांनी काही गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि विधानसभेला फटका बसला, चिरफळ्या उडाल्या.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविताना मविआ एकसंध राहिली नाही. काही ठिकाणी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडी तर काही ठिकाणी स्वतंत्रपणे वाट चोखाळली. शिवसेना उबाठाने बऱ्याच ठिकाणी स्वतंत्र निर्णय घेतले. मुंबईत त्यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती केल्याने काँग्रेस सुरक्षित अंतरावर राहिली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांचे नेतृत्व मान्य करत पुणे, पिंपरी चिंचवड व परभणी येथे युती केली आणि पुढची दिशा दाखविली. मविआतील दुरावा स्पष्ट दिसू लागला होता. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुणे व अन्य काही जिल्हा परिषदांत ही युती कायम ठरवत तुतारीऐवजी घड्याळ या चिन्हाखाली निवडणुका लढविण्याचा इरादा स्पष्ट होताच केवळ मविआ नव्हे तर महायुतीच्या गोटात वेगळी चर्चा सुरू झाली हे कोणी नाकारणार नाही.
याचे प्रमुख कारण अजित पवार दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत उघड विधाने करू लागले होते. ते एकत्र येण्यामुळे पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा येथील राजकीय गणिते बदलणार हे निश्चित होते. ते पुढच्या राजकारणाची दिशा ठरवणारे ठरले असते. पण मध्येच अजित पवार यांचे अपघाती निधन झाले आणि या शक्यतांना ब्रेक लागला. दोन्ही राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या स्वतंत्र विधानांमुळे विलिनीकरणाच्या शक्यता दुरावत असल्याचे दिसत असले तरी काही आमदारांना, दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील नेते व कार्यकर्त्यांना अजूनही आशा आहे.
त्यामुळेच की काय मविआच्या दोन मित्रपक्षांमध्ये वेगळीच भावना आहे. एकीकडे महायुतीतील भाजपाचे प्रमुख नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिल्या फळीतील काही नेते विलिनीकरणाची चर्चा आपल्याला माहिती नव्हती असे बोलून दाखवतात तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस व शिवसेना उबाठाची अशीच भावना असली तरी ते बोलून दाखवत नाहीत. आपल्याला विलिनीकरणाबाबत कल्पना दिली नाही तर पवार यांना राज्यसभेच्या उमेदवारीसाठी थेट पाठिंबा का द्या. त्यापेक्षा संख्याबळाच्या आधारावर या एका जागेवर दावा ठोका असा पवित्रा दोन्ही पक्षांनी स्वीकारला आहे. पण वस्तुस्थिती अशी की तिघे एकत्र आल्याशिवाय त्यांचा उमेदवार निवडून येत नाही.
यापुढची राज्यसभेची निवडणूक २०२८ मध्ये आहे. त्यावेळची परिस्थिती काय असेल हे आज सांगता येत नाही म्हणून प्रत्येकजण आपापल्या परीने ही जागा आपल्या पदरात कशी पडेल यासाठी प्रयत्नशील आहे. पवार यांनी आता थांबायला हवे असे या दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांना वाटू लागले आहे. २०२८ साली काय परिस्थिती असेल या विचाराने त्यांना ग्रासलेले दिसते. मन मोठे करून ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी सोडावी तर उद्या हे दोघे एकत्र राहतील पण आपण पुढे आपण एकाकी पडलो तर काय, ही चिंता काँग्रेसला सतावत असावी. विरोधकांच्या एकीचे काय होणार याचे उत्तर या निवडणुकीत मिळेल असे दिसते.
ravikiran1001@gmail.com