Canva
संपादकीय

व्यर्थ गेला तुका....

नवशक्ती Web Desk

शिक्षणनामा

- शरद जावडेकर

सर्वच धर्मांबद्दल शासनाने तटस्थ राहणे भारतीय संविधानाला अपेक्षित आहे. गाडगेबाबा म्हणतात की, ‘‘देवासाठी पैसे खर्च करु नका. तोच पैसा शिक्षणाला द्या. मंदिराची भर करु नका. जो विद्यार्थी हुशार आहे, तो पैसा त्याला द्या. धर्मकृत्य करण्यासाठी नाही. विद्या घेण्यासाठी पैसे खर्च करा. शाळेहून थोर मंदिर नाही. उदार देणगी शाळेला द्या. भक्तीचा प्रसार नाही श्रेयसकर, शिक्षण प्रसार सर्वश्रेष्ठ’’ पण भारतात वाढत असलेली बुवाबाजी, अंधश्रद्धा, कर्मकांड इत्यादीबद्दल कुसुमाग्रजांनी उद्विग्नतेने म्हटले आहे, ‘‘व्यर्थ गेला तुका, व्यर्थ ज्ञानेश्‍वर । संतांचा गजर व्यर्थ गेला ॥

महाराष्ट्राला फुले-शाहू-आंबेडकर यांसारख्या समाज क्रांतिकारकांची जशी परंपरा आहे, तशीच संत तुकाराम महाराज, सावता माळी, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांची परंपरा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ‘‘तिर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी’’, गाडगे बाबा म्हणतात, ‘‘देवळात देव नसतो, तेथे पुजाऱ्याचे पोट असते’’! मग गाडगेबाबा माणसात देव शोधायला सांगतात. त्यांची दशसूत्री अशी आहे. भुकेलेल्याला अन्न द्या, तहानलेल्याला पाणी द्या, गरीब मुला-मुलींना शिक्षणात मदत करा, बेकारांना रोजगार द्या, गोरगरिबांना शिक्षण द्या इ. हाच आजचा रोकडा धर्म आहे। हीच खरी भक्ती व देवपूजा आहे॥ संत कबीर म्हणतात, ‘‘मोको कहा ढूँढे रे बंदे, मै तो तेरे पास में, ना मंदिर में, ना मज्जिद में, ना काबे कैलास में! मै तो तेरे पास में!’’ हे लिहिण्याचे कारण की, हल्ली भावी नगरसेवक किंवा भावी आमदार यांची निवडणुकीची अशी रणनीती झाली आहे की, मतदार संघातल्या मतदारांना मोफत देवदर्शनाला, अष्टविनायक, पंढरपूर, बालाजी, शिर्डी इ फिरवून आणायचे म्हणजे निवडून येण्याची खात्री तयार होते.

भारतीय संविधानाने जनतेला धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे, पण शासन धर्मनिरपेक्ष असले पाहिजे असे संविधान म्हणते. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन समाजात वाढवणे हे शासनाचे कर्तव्य मानले गेले आहे, पण जनतेच्या धर्मभावना निवडणुकीच्या राजकारणासाठी वापरण्याचे सोपी पद्धत भारतात गेली ३०-३५ वर्षे विकसित केली जात आहे. त्यासाठी मंदिर-मस्जीद वाद केला जातो, धार्मिक उत्सव रस्त्यावर आणले जात आहेत व शासन धार्मिक उत्सव पुरस्कृत करत आहे. राम मंदिराचे उद्घाटन हा त्यातलाच एक भाग होता! फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्राला त्याची लागण झाली आहे व ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ हा त्याचाच एक भाग आहे! ज्या महाराष्ट्रात शासनाने फुले-शाहू-आंबेडकर, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांच्या नावाने शिक्षणसंस्था काढल्या तेच शासन मोफत तीर्थदर्शनाची योजना अमलात आणून फुले-शाहू-आंबेडकर विचाराची पताका स्वकर्तृत्वाने उंच फडकवित आहेत.

महाराष्ट्रातील दिवंगत ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील असे म्हणाले होते की, मी जर कुलगुरू झालो तर माझ्या विद्यापीठातील विज्ञानाच्या प्राध्यापकांनी जर घरी सत्यनारायण केला तर मी त्यांची विज्ञानाची पदवीच काढून घेईन! पण हा काळ आता मागे पडला आहे.

या तीर्थ दर्शन योजनेतून एकूण १३९ तीर्थस्थानांना शासन ज्येष्ठांना दर्शन घडवणार आहे. त्यासाठी ज्येष्ठांवर रु. तीस हजारपर्यंत खर्च केला जाईल व वार्षिक रुपये २.५ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या व ६० वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला याचा लाभ घेता येईल! विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठांना दिलेली ही लाचच आहे!

येत्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रति व्यक्ती रुपये तीस हजार खर्च करायला शासन तयार आहे; पण शिक्षणहक्क कायद्यानुसार जे सामाजिक व आर्थिक वंचित घटकातील मुलांना २५ टक्के आरक्षण आहे त्यासाठी खर्च करायची शासनाची तयारी नाही. या कायद्यानुसार शुल्क प्रतिपूर्ती करण्याचे अंदाजे रुपये २४०० कोटी शासनाने थकवले आहेत. या कायद्यानुसार प्रति विद्यार्थी शुल्क प्रतिपूर्ती सुमारे १८ हजार आहे. हे पैसे द्यायला लागू नयेत म्हणून प्रवेश प्रक्रियेत शासनाने बदल केले होते. या संदर्भात पालकांना उच्च न्यायालयात दाद मागावी लागली होती. शिक्षणखर्चात काटकसर व तीर्थयात्रेच्या खर्चासाठी हात मोकळा अशी शासनाची भूमिका आहे. याचे कारण उघड आहे; निवडणुकीच्या राजकारणात लहान मुलांचे मूल्य शून्य आहे कारण, ते मतदार नाहीत; पण मतदार म्हणून ज्येष्ठांचे मूल्य मोठे आहे! त्यामुळे फुले-शाहू-आंबेडकरांची परंपरा सांगणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात शासनाचा धार्मिक कारणांवरचा खर्च वाढत आहे. ही गोष्ट दीर्घ मुदतीत स्वागतार्ह नाही तर सर्वच धर्मांबद्दल शासनाने तटस्थ राहणे भारतीय संविधानाला अपेक्षित आहे. गाडगेबाबा म्हणतात की, ‘‘देवासाठी पैसे खर्च करु नका. तोच पैसा शिक्षणाला द्या. मंदिराची भर करु नका. जो विद्यार्थी हुशार आहे, तो पैसा त्याला द्या. धर्मकृत्य करण्यासाठी नाही. विद्या घेण्यासाठी पैसे खर्च करा. शाळेहून थोर मंदिर नाही. उदार देणगी शाळेला द्या. भक्तीचा प्रसार नाही श्रेयसकर, शिक्षण प्रसार सर्वश्रेष्ठ’’ पण भारतात वाढत असलेली बुवाबाजी, अंधश्रद्धा, कर्मकांड इत्यादीबद्दल कुसुमाग्रजांनी उद्विग्नतेने म्हटले आहे, ‘‘व्यर्थ गेला तुका, व्यर्थ ज्ञानेश्‍वर । संतांचा गजर व्यर्थ गेला ॥

कार्याध्यक्ष, अ. भा. समाजवादी शिक्षण हक्क सभा

sharadjavadekar@gmail.com

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला