शेतकऱ्यांचा आसूड रिपब्लिकन पक्षाच्या हाती 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
संपादकीय

शेतकऱ्यांचा आसूड रिपब्लिकन पक्षाच्या हाती

महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या रिपब्लिकन पक्षाला संविधानासोबत महात्मा फुले यांच्या शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ मार्गदर्शक वारसा म्हणून लाभला आहे. संविधानासोबत शेतकऱ्यांचा आसूड रिपब्लिकन पक्षाने आता हाती घेतला पाहिजे.

नवशक्ती Web Desk

विशेष

हेमंत रणपिसे

महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या रिपब्लिकन पक्षाला संविधानासोबत महात्मा फुले यांच्या शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ मार्गदर्शक वारसा म्हणून लाभला आहे. संविधानासोबत शेतकऱ्यांचा आसूड रिपब्लिकन पक्षाने आता हाती घेतला पाहिजे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाची स्थापना ३ ऑक्टोबर १९५७ रोजी नागपूर येथे झाली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या खुल्या पत्रावर रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्यात आली. सर्व जातीधर्मीयांचा सर्वसमावेशक, व्यापक, प्रबळ असा राष्ट्रीय पक्ष स्थापन करण्याची संकल्पना रिपब्लिकन पक्षाच्या रूपाने साकार व्हावी, अशी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी होती. रिपब्लिकन पक्षाची स्थापना होऊन आता ६९ वर्षे झाले. या काळात रिपब्लिकन पक्षाने काय कमावले आणि काय गमावले यावर खूप चर्चा झालेली आहे. ३ ऑक्टोबर १९५७ रोजी नागपूर येथे रिपब्लिकन पक्षाच्या स्थापना सोहळ्यात देशभरातून आठ लाख लोक एकत्र आले होते. सुरुवातीला रिपब्लिकन पक्षाचे नऊ खासदार संसदेत निवडून गेले होते. त्यानंतर मात्र रिपब्लिकन पक्षाला बेकीची घरघर लागली. फाटाफुटीमुळे रिपब्लिकन पक्ष विखुरला गेला. तरीही शोषित, पीडित, दलित, गोरगरीब समाज रिपब्लिकन पक्षाच्या पाठीशी कायम राहिला.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वात कसेल त्याची जमीन, नसेल त्याचे काय असा प्रश्न विचारत भूमिहीनांसाठी प्रचंड मोठे जेलभरो आंदोलन उभारले. त्यामुळे हजारो दलित भूमिहीनांना जमिनीचे पट्टे मिळाले. ग्रामीण भागात भूमिहीनांसाठी आणि शहरी भागात झोपडीवासीयांच्या न्याय हक्कासाठी रिपब्लिकन पक्षाने सातत्याने आंदोलन करून या दुर्बल समाजघटकांना ताकद दिली. कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनंतर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कायम भूमिहीनांसाठी आणि झोपडपट्टीवासीयांना न्याय देण्याचे काम केले आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये रामदास आठवले समाजकल्याण विभागाचे कॅबिनेट मंत्री असताना त्यांनी भूमिहीनांना गायरान जमिनीचे पट्टे मोफत नावावर करण्याचा ऐतिहासिक निर्णय १४ एप्रिल १९९० रोजी घेतला होता. १९९० ते २०११ पर्यंतच्या झोपड्या पात्र करण्याचा निर्णय हा रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाने वेळोवेळी केलेल्या आंदोलनामुळे झालेला आहे.

भूमिहीनांसाठी, झोपडीवासीयांसाठी, दलितांसाठी रिपब्लिकन पक्षाने सातत्याने आंदोलने उभारून या समाज घटकांचे प्रश्न सोडविले. त्यातून रिपब्लिकन पक्षाची प्रतिमा दलितांचा पक्ष अशीच झाली. प्रदीर्घ चाललेला मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा आणि बौद्धांच्या सवलतींचा प्रश्न यामुळे रिपब्लिकन पक्षावर एक जातीय पक्षाचे लेबल लावण्यात आले. रिपब्लिकन पक्षात नेतृत्व म्हणून पुढे आलेले सर्व चेहरे हे बहुतांश बौद्ध होते. एकजातीय चौकटीतून रिपब्लिकन पक्षाला बाहेर काढण्यात काही प्रमाणात रामदास आठवले यांना यश आलेले आहे. शिवशक्ती-भीमशक्ती एकजुटीचा प्रयोग केल्यानंतर रिपब्लिकन पक्ष सर्वांनाच हवाहवासा वाटणारा पक्ष झालेला आहे. सर्व जातीधर्मात आणि समाजाच्या सर्व स्तरापर्यंत रिपब्लिकन पक्ष पोहचविण्यात रामदास आठवलेंना यश आले आहे. रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेपासून ईशान्य भारतात रिपब्लिकन पक्ष पोहचविण्याचे काम कोणीही केले नाही. ते अवघड, अशक्य काम रामदास आठवलेंनी करून दाखवले. नागालँडसारख्या दुर्गम राज्यात रिपब्लिकन पक्षाचे दोन आमदार रामदास आठवलेंनी निवडून आणले. मणिपूरसारख्या संघर्षशील राज्यात १७ टक्के मते घेऊन रिपब्लिकन पक्षाला मान्यता मिळालेली आहे. ईशान्य भारतातील सर्व राज्यांत म्हणजे आसाम, मेघालय, मणिपूर, नागालँड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मिझोरम या सर्व राज्यांत रिपब्लिकन पक्ष निळा झेंडा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ‘जय भीम’ची घोषणा रामदास आठवले यांनी पोहचवली आहे. या कामगिरीचा आठवले गटाच्या कार्यकर्त्यांना अभिमान आहे.

दलितांच्या आणि झोपडीवासीयांच्या मतदानावर रिपब्लिकन पक्ष संसदेत पोहचू शकत नाही. संसदेत जाण्याचा मार्ग हा शेतकऱ्यांच्या बांधावरून जातो. शेतकऱ्यांच्या पाठिंब्याशिवाय भारतात कुणाचेही सरकार स्थापन होऊ शकत नाही. ही बाब रामदास आठवले यांनी चांगली ओळखलेली आहे. ज्या पोटतिडकीने रिपब्लिकन पक्षाने दलितांचे प्रश्न सोडविले त्याच तळमळीने रिपब्लिकन पक्षाने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले पाहिजे. भूमिहीन आणि शेतमजुरांच्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष कायम राहिला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मात्र रिपब्लिकन पक्षाने कधी आवाज बुलंद केलेला दिसला नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा वसा रिपब्लिकन पक्षाने कधी घेतलाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मतदान हे रिपब्लिकन पक्षाला मिळाले नाही. रामदास आठवले या आश्वासक नेतृत्वाने शेतमजुरांसोबत शेतकऱ्यांच्याही दुःखावर मायेची फुंकर मारण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी रामदास आठवले नेहमी प्रयत्नशील राहिलेले आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाने ट्रकभर मदत बीड जिल्ह्यात पाठवलेली आहे.

शेतकऱ्यांच्या पाठिंब्याशिवाय कोणताही राजकीय पक्ष आपले प्रतिनिधी संसदेत निवडून पाठवू शकत नाही. रिपब्लिकन पक्षाला सर्वसमावेशक पक्ष करताना सर्वप्रथम शेतकऱ्यांचा विश्वास रिपब्लिकन पक्षाला जिंकावा लागेल. नागालँडमध्ये रिपब्लिकन पक्षाचे दोन आमदार निवडून आल्यानंतर निवडणूक आयोगाने रिपब्लिकन पक्षाला गन्ना किसान (ऊसधारी शेतकरी) हे निवडणूक चिन्ह दिलेले आहे. हा नियतीने दिलेला संकेत आहे. दलित आदिवासींसोबत शेतकऱ्यांच्या प्रश्नालाही रिपब्लिकन पक्षाने प्राधान्य दिले पाहिजे असाच संकेत रिपब्लिकन पक्षाला मिळालेल्या गन्ना किसान या निवडणूक चिन्हातून मिळालेला आहे.

भारत हा कृषिप्रधान देश आहे. कृषिप्रधान संस्कृती असणाऱ्या भारत देशाच्या संसदेत ज्यांना निवडून जायचे आहे, त्यांनी कृषीविषयीचे आपले ज्ञान वाढवले पाहिजे. शेतकऱ्यांच्या बांधावर गेले पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन सोडवले पाहिजे. संसदेत जाणारा मार्ग शेतकऱ्यांच्या शेतातूनच जातो हे रिपब्लिकन पक्षाने आता ओळखले पाहिजे. गन्ना किसान हे आपले निवडणूक चिन्ह घेऊन रिपब्लिकन पक्ष शेतकऱ्यांच्या जवळ पोहचू शकतो. रिपब्लिकन पक्षाने ६९ वर्षांच्या कालखंडात दलित आदिवासींचे, झोपडीवासीयांचे, महिला वर्गाचे आणि गरीब कामगार कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेतकऱ्यांचा विश्वास रिपब्लिकन पक्षाने जिंकला तर कोणत्याच निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला अपयश येणार नाही.

महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या रिपब्लिकन पक्षाला संविधानासोबत महात्मा फुले यांच्या शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ मार्गदर्शक वारसा म्हणून लाभला आहे. संविधानासोबत शेतकऱ्यांचा आसूड रिपब्लिकन पक्षाने आता हाती घेतला पाहिजे.

प्रसिद्धी प्रमुख रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)

आजचे राशिभविष्य, १४ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

दुष्काळग्रस्त महाराष्ट्र अन् मुंबईचे पाणी नियोजन

राजमा खाण्याचे फायदे माहीत आहेत का? पचनापासून स्नायूंच्या आरोग्यापर्यंत ठरतो उपयुक्त

PCOS Diet Tips : महिलांनो, PCOS मुळे त्रस्त आहात? सकाळी नाश्त्यात खा 'हे' ३ पदार्थ; जाणून घ्या फायदे

Skin Care Tips : पाठीवर हात फिरवताच बारीक पुळ्या जाणवतात? 'या' चुका करत असाल तर वाढू शकतो त्रास