संपादकीय

साने गुरुजी : अश्रूंचे अंगार

साने गुरुजींचे अश्रू असाह्यतेचे, अगतिकतेचे नव्हते तर दुसऱ्याच्या दुःखाशी, वेदनेशी एकरूप झालेल्या मानवतावादी संताचे ते अश्रू होते. त्यामुळे त्यांच्या अश्रूंचे अंगार झालेले नंतर अनेकदा त्यांच्या आयुष्यात आपल्याला पाहायला मिळतात!

नवशक्ती Web Desk

शिक्षणनामा

शरद जावडेकर

साने गुरुजींचे अश्रू असाह्यतेचे, अगतिकतेचे नव्हते तर दुसऱ्याच्या दुःखाशी, वेदनेशी एकरूप झालेल्या मानवतावादी संताचे ते अश्रू होते. त्यामुळे त्यांच्या अश्रूंचे अंगार झालेले नंतर अनेकदा त्यांच्या आयुष्यात आपल्याला पाहायला मिळतात! सध्याच्या आत्मकेंद्रित, चंगळवादी, असंवेदनशील, व्यक्तिवादी, भांडवलशाही व्यवस्थेत ‘माझ्या मना बन दगड’ अशी परिस्थिती असल्यामुळे साने गुरुजी ही एक अख्यायिका आहे असे वाटावे, अशी स्थिती आहे!

मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदू ऐसे॥ विनोबांनी साने गुरुजींना महाराष्ट्राच्या ज्ञानेश्‍वर, तुकाराम या संतपरंपरेच्या मांदियाळीतच समाविष्ट केले आहे. भावनाप्रधान, अति संवेदनशील व रडके व्यक्तिमत्त्व म्हणून महाराष्ट्रातल्या तथाकथित विद्वानांनी त्यांची हेटाळणी केली होती; पण म. गांधी जसे म्हणतात की, ‘माझी अहिंसा शूराची आहे, भ्याडाची नाही.’ तसेच साने गुरुजींचे अश्रू असाह्यतेचे, अगतिकतेचे नव्हते तर दुसऱ्याच्या दुःखाशी, वेदनेशी एकरूप झालेल्या मानवतावादी संताचे ते अश्रू होते. त्यामुळे त्यांच्या अश्रूंचे अंगार झालेले नंतर अनेकदा त्यांच्या आयुष्यात आपल्याला पाहायला मिळतात! सध्याच्या आत्मकेंद्रित, चंगळवादी, असंवेदनशील, व्यक्तिवादी, भांडवलशाही व्यवस्थेत माझ्या मना बन दगड अशी परिस्थिती असल्यामुळे साने गुरुजी ही एक अख्यायिका आहे असे वाटावे अशी स्थिती आहे!

मुलांसाठी गोड गोष्टी व गाणी लिहिणाऱ्या ‘या’ माणसाने विल ड्युरांटच्या दि स्टोरी ऑफ फिलॉसॉफी, हेन्री थॉमस याच्या द हिस्ट्री ऑफ मेनकाइंड किंवा टॉलस्टॉय यांच्या व्हॉट इज आर्ट यांसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या पुस्तकांचे सुलभ मराठीत भाषांतर केले. अशा माणसाच्या वैचारिकतेबद्दल शंका घेणे संपूर्ण अयोग्यच होते. गुरुजींकडे उच्च कोटीची भावनाप्रधानता व तितकीच उच्च कोटीची वैचारिकता होती! माणूस हा भावना व विचार, बुद्धी याचे मिश्रण असते. याचा समतोल गुरुजींनी साधला म्हणूनच त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनात स्थान मिळवले! त्यांच्या भावनाप्रधानतेचा वैचारिक पक्का पाया होता म्हणूनच त्यांनी शेतकरी, कामगारांचे वर्ग लढे उभे केले. जातीव्यवस्थेला उघड आव्हान दिले, धर्माची धर्मनिरपेक्ष व्याख्या करायचा त्यांनी प्रयत्न केला, अहिंसा व हिंसा याच्या तात्त्विक व व्यावहारिकतेबद्दल त्यांनी भाष्य केले आहे! साने गुरुजींच्या अश्रूंचे निखारे झाले व ते नंतर पेटवा पेटवीचीच भाषा करतात. ते म्हणतात,

आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान किंवा

येथून तिथून सारा पेटू दे देश। किंवा

अडवणूक करणाऱ्यांची उडवू दाणादाण।

या भावनाप्रधान माणसाने आपल्या आयुष्यात लाखो लोकांची मने चेतवली व अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी त्यांना निर्भयपणे उभे केले.

१९३८ मध्ये साने गुरुजींनी खान्देशात गिरणी कामगारांचा संप घडवून आणला होता व तो त्यांनी यशस्वी करून दाखवला होता. १९३७ मध्ये प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुका झाल्या होत्या व त्यात कापड गिरणी कामगारांच्या वेतनाच्या प्रश्‍नाच्या संदर्भात शिफारशी करण्यासाठी समिती नेमली जाईल, असे आश्‍वासन देण्यात आले होते. त्यानुसार तेव्हा प्रांतिक काँग्रेस सरकारने तशी समिती नेमली होती व समितीने गिरणी कामगारांच्या वेतनात १२ टक्के पगारवाढ द्यावी, अशी शिफारस केली होती. मुंबई, अहमदाबाद, सोलापूर येथील गिरणी मालकांनी कुरकुर करत या शिफारशी स्वीकारल्या होत्या, पण खान्देशातील गिरणी मालक पगारवाढ द्यायला तयार नव्हते. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष होता. साने गुरुजींनी गिरणी कामगारांना संघटित केले व एप्रिल १९३८ मध्ये सार्वत्रिक संप करायचा निर्णय घेण्यात आला. गुरुजींनी उपोषणही सुरू केले. वातावरण तापत गेले, प्रांतिक काँग्रेस सरकारचे नेते गुरुजींवर नाराज झाले होते. गुरुजींनी सर्व दडपणे झुगारून दिली होती. शेवटी खान्देश गिरणी मालकांनी माघार घेतली. ८ एप्रिल १९३८ रोजी मागण्या मान्य झाल्यामुळे संप मागे घेण्यात आला. गुरुजींच्या नेतृत्वाखालचा हा पहिला लढा होता!

५ सप्टेंबर १९३८ मध्ये अंमळनेर येथील न्यू प्रताप मिल बंद केल्याचे मिल मालकाने जाहीर केले व या संदर्भात कामगारांबरोबर कोणतीही चर्चा करण्यास त्यांनी नकार दिला. गुरुजींनी धुळे शहरात कामगारांचा मोठा मोर्चा काढला व कामगार, नागरिकांची सभा झाली व त्यात सत्याग्रहाचा निर्णय जाहीर करण्यात आला. कामगारांच्या वतीने गुरुजींनी चार मागण्या केल्या व आपले उपोषण जाहीर केले, तसेच मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर तापी नदीत जलसमाधी घेण्याचे गुरुजींनी जाहीर केले. गुरुजींच्या या दोन्ही कृतींमुळे कामगार चळवळीला एक धार आली. सेनापती बापट या लढ्यात उतरले. कामगारांच्या प्रचंड शक्तीमुळे वाटाघाटी सुरू झाल्या. गुरुजींचे उपोषण चालूच होते. त्यांची प्रकृती खालावली व मिल मालकांवर दडपण वाढत गेले व यशस्वीरीत्या आंदोलन संपले. सध्या महामार्गावरच्या टोलवरून बरीच आंदोलने होताना दिसतात; पण साने गुरुजींनी १९३८ मध्ये अंमळनेर म्युनिसिपालिटीने त्यांच्या हद्दीत येणाऱ्या बैलगाड्यांवर टोल टॅक्स लावला होता. हा भुर्दंड शेतकऱ्यांना बसत होता. साने गुरुजींनी शेतकऱ्यांची बाजू घेऊन मे १९३८ मध्ये प्रचंड मिरवणूक काढली. म्युनिसिपालिटीने श्रीमंतांच्या घरावर जादा घरपट्टी आकारावी. पण शेतकऱ्यांना छळू नये, असे गुरुजी म्हणाले. याबद्दल गुरुजींनी सत्याग्रह, निदर्शने सुरू केली. गुरुजींनी बेमुदत उपोषणाची घोषणा केली, म्युनिसिपालिटीवर दडपण वाढत गेले. टोल रद्द करण्यापलीकडे कोणतीही तडजोड करायला गुरुजी तयार नव्हते. जुलै १९३८ मध्ये म्युनिसिपालिटीने जादा सभा भरवून टोल रद्द करण्याचा निर्णय घेतला. गुरुजी कामगारांचे, शेतकऱ्यांचे नेते म्हणून पुढे आले.

कामगारांच्या प्रश्‍नाबरोबर गुरुजींनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नात लक्ष घातले होते. १९३८ मध्ये पूर्व खान्देशात अतिवृष्टीमुळे पिके बुडाली होती. शेतकऱ्यांची आर्थिक दैना झाली होती व या परिस्थितीत गुरुजींनी शेतसारा माफ करण्याची मागणी केली! यासाठी पायाला चाके लावून गुरुजी खान्देशभर फिरले. लोक जागृती केली. कामगार-किसान परिषद जळगाव येथे त्यांनी घेतली व शेतकऱ्यांचा संघटित आवाज सरकारच्या कानावर घातला. कलेक्टरच्या बंगल्यावर प्रचंड मोर्चा नेण्याचे ठरवले गेले. पण म. गांधींनी कलेक्टरच्या घरावर असा मोर्चा नेऊ नये अशी तार गुरुजींना पाठवली व गुरुजींनी मोर्चाचा कार्यक्रम रद्द केला व जळगावला ५०,००० शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मोठी सभा झाली. पण शेतसारा माफीचा प्रश्‍न अपेक्षेप्रमाणे सुटला नाही. प्रांतिक काँग्रेसच्या आपल्याच सरकारविरुद्ध गुरुजींना संघर्ष करावा लागला. तेव्हाच्या प्रस्थापित काँग्रेस नेतृत्वाला गुरुजींचा हा लढाऊपणा मान्य होत नव्हता. म्हणून त्यांच्यावर दोषारोप करण्यात आले. पण शेतकरी कामगारांचे लढाऊ नेते म्हणून गुरुजींनी केलेले काम अनमोल आहे. गुरुजींच्या आयुष्यातील अत्युच्च क्षण म्हणजे मंदिर प्रवेशाचा संघर्ष! गुरुजींनी शेतकरी कामगारांचे लढे लढवले. पण आर्थिक समतेमुळे सामाजिक समता आपोआप येईल ही भूमिका गुरुजींना मान्य नव्हती. सामाजिक समतेसाठी स्वतंत्र प्रयत्न केले पाहिजेत हे लक्षात घेऊन गुरुजींनी मंदिर प्रवेशाचा मुद्दा, पंढरपूरचे विठोबाचे मंदिर दर्शनासाठी सर्वांना खुले व्हावे म्हणून नोव्हेंबर १९४६ मध्ये प्राणांतिक उपोषणाचा निर्धार जाहीर केला. वैशाख शुद्ध एकादशी १ मे १९४७ ही उपोषणाची तारीख त्यांनी जाहीर केली. मधल्या काळात सारा महाराष्ट्र त्यांनी या प्रश्‍नावर पिंजून काढला. लोकांच्या सद्सद्विवेकबुद्धीला गुरुजींनी आवाहन केले. हिंदू धर्मातील उदार परंपरा ते लोकांसमोर मांडून निरनिराळ्या विसंगतीवर शाब्दिक प्रहार करत होते. मशिदीत सारे समान असतात, देवळात सारे समान कधी होतील, याचा ध्यास गुरुजींनी घेतला होता!

गुरुजींचा अट्टाहास सवर्णांच्या हृदय परिवर्तनाचा होता. या संघर्षात कोणतीही किंमत मोजायला गुरुजी तयार होते. प्रसंगी म. गांधींचेही आदेश त्यांनी झुगारून दिले व प्राणांतिक उपोषण चालू ठेवले. पंढरपूरची सनातनी मंडळी साने गुरुजींची मागणी मान्य करायला तयार नव्हती व त्यांनी चर्चेमध्ये अनेक तांत्रिक मुद्दे उपस्थित केले. परंतु समतेचा प्रश्‍न गुरुजींनी मानवतावादाच्या पातळीवर नेऊन समाजाची नैतिक उंची वाढवण्याचा प्रयत्न केला व संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी ढवळून काढला! १ मे रोजी सुरू केलेले उपोषण गुरुजींनी १० मे रोजी सोडले व राजकीय स्वातंत्र्याबरोबर सामाजिक स्वातंत्र्य व समता ही मूल्ये स्वातंत्र्यात केंद्रस्थानी आणली आणि सवर्णांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली हे गुरुजींचे योगदान अनन्यसाधारण आहे! साने गुरुजींनी आयुष्यभर कृतिशील लोकशिक्षकाची भूमिका यशस्वीरीत्या पार पाडली. गुरुजींचे हे कष्ट महाराष्ट्रात पालथ्या घड्यावरचे पाणी ठरले आहे. म्हणूनच विवेकाचा जागर करणाऱ्या नरेंद्र दाभोलकरांना आपला जीव गमवावा लागला! आज गुरुजी असते व येथून तेथून सारा पेटू दे देश असे त्यांनी म्हटले म्हणून ते अर्बन नक्षलवादी ठरवले गेले असते व कोणतेही आरोपपत्र दाखल न करता त्यांना तुरुंगात टाकले गेले असते! पण गुरुजींचे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे किंवा लोक हसणाऱ्या मुलाला पटकन उचलतात; पण खरी गरज असते रडणाऱ्या मुलाला उचलण्याची हा धर्माचा, समाजवादाचा साधा सोपा अर्थ कालातीत आहे. म्हणूनच म. गांधी, साने गुरुजी मरत नसतात! ते अमर होतात. योद्धा साने गुरुजींचे स्मरण सद्य परिस्थितीत जास्त महत्त्वाचे आहे.

लेखक अ. भा. समाजवादी शिक्षण हक्कसभेचे कार्याध्यक्ष आहेत.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत