विशेष
गजेंद्र सिंह शेखावत
एक संघराज्य, जे सामायिक वारसा, इतिहास, परंपरा आणि सांस्कृतिक बंधांनी जोडलेले आहे. आजही भारतात, विविधता वाढत असलेल्या आणि नव्या पिढीच्या आकांक्षा-विचारधारा बदलत असलेल्या काळातसुद्धा, पटेल यांचा तोच विश्वास भारताचा आधारस्तंभ म्हणून टिकून आहे.
दरवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भारतात राष्ट्रीय एकता दिन साजरा होतो. १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशात साधारण ५६० पेक्षा जास्त संस्थाने होती. या सगळ्या संस्थानांचे भारतात विलीनीकरण करून एकसंध राष्ट्र बनवण्याचे महान कार्य सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. अशाप्रकारे, १९४७ नंतर भारताचे एकसंध प्रजासत्ताक उभे करण्यात, पटेल यांच्याइतकी निर्णायक भूमिका खचितच इतर कुणी बजावली असेल.
पटेल यांचा वास्तववादी दृष्टिकोन, संयम आणि दृढनिश्चयाने देशाला फाळणीनंतर विभाजित होण्यापासून वाचवले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर जुनागढ, हैदराबाद आणि जम्मू-काश्मीरसारखी संस्थाने, भारतात सामील व्हावे की स्वतंत्र राहावे, अशा द्विधा मनस्थितीत होती. त्या संस्थानांचे राजे किंवा शासक भारतात विलीन होण्यास तयार नव्हते. पण सरदार वल्लभभाई पटेल यांचे मनधरणीचे राजनैतिक कौशल्य आणि खंबीर निर्धारामुळे, या राज्यांना अखेरीस भारतात सामील व्हावे लागले. सरदार वल्लभभाई पटेल यांनी पुरस्कार केलेले राष्ट्रीय एकतेचे तत्त्वज्ञान म्हणजे एकाच प्रकारचा धर्म, भाषा, संस्कृती किंवा विचारसरणी लादण्याचा प्रयत्न नव्हता. भारताचे सामर्थ्य हे विविधतेतून निर्माण झालेल्या एकतेत आहे, हे त्यांच्या एकतेचे तत्त्वज्ञान होते. मने आणि हृदयांनी जोडलेले संघराज्य या रूपात त्यांनी भारताला पाहिले. एक असे संघराज्य, जे सामायिक वारसा, इतिहास, परंपरा आणि सांस्कृतिक बंधांनी जोडलेले आहे. आजही भारतात, विविधता वाढत असलेल्या आणि नव्या पिढीच्या आकांक्षा-विचारधारा बदलत असलेल्या काळातसुद्धा, पटेल यांचा तोच विश्वास भारताचा आधारस्तंभ म्हणून टिकून आहे.
सरदार पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी करण्याचा, २०१४ मध्ये घेतलेला निर्णय म्हणजे- भारताची एकता ही कायमस्वरूपी टिकणारी वस्तुस्थिती नसून, ती देशाच्या पुनर्निर्मितीसाठी सतत प्रयत्न करावी लागणारी, जपावी लागणारी आणि वाढवावी लागणारी प्रक्रिया आहे, हे सांगणारी भावना आहे. या दिवशी, देशभरातील शाळा, नागरी संस्था आणि नागरिक, राष्ट्रीय एकात्मता जपण्याची शपथ पुन्हा एकदा घेत असतात. ‘रन फॉर युनिटी’ हे एकता दौडीचे कार्यक्रम पटेलांच्या सामूहिक कृतीच्या आवाहनाला मूर्त रूप देतात… देशभक्ती ही केवळ भावना न राहता ती सहभागात रूपांतरित होणे आवश्यक आहे, याची आठवण करून देतात.
यावर्षी १५० वी जयंती साजरी होत असून, पटेल यांच्या राष्ट्र उभारणीच्या वारशाला भव्य आदरांजली अर्पण करणाऱ्या १८२ मीटर उंच ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या एकतेच्या पुतळ्याजवळील एकता नगर येथे विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये सांस्कृतिक संचलन, राज्यांचे चित्ररथ आणि ९०० हून अधिक कलाकारांचे सादरीकरण होणार आहे. भारताची ताकद एका सुरात बोलणाऱ्या त्याच्या अनेक आवाजांमध्ये आहे, या विचाराचा जणू हा सोहळाच असेल.
भारतासारख्या विविध भाषा, धर्म आणि परंपरा एकत्र नांदत असलेल्या देशात, संस्कृती हीच लोकांना एकत्र बांधणारा सर्वात शाश्वत आणि मजबूत दुवा ठरला आहे. प्रादेशिक सांस्कृतिक केंद्रांपासून ते राष्ट्रीय संग्रहालयांपर्यंत, संस्कृती मंत्रालयांतर्गत कार्यरत विविध संस्था, देशाचा सांस्कृतिक वारसा सर्वांसाठी खुला आणि सर्वसमावेशक ठेवण्यासाठी काम करतात. म्हणजेच यामुळे, प्रत्येक प्रदेशाला भारताच्या राष्ट्रीय वाटचालीत आपला सहभाग आणि स्थान निश्चित असल्याची हमी मिळत राहील.
‘एक भारत, श्रेष्ठ भारत’सारखे उपक्रम देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना संस्थांच्या माध्यमातून एकमेकांशी परस्पर जोडतात. त्यामुळे त्यांच्यातील भाषा, खाद्यसंस्कृती, कला आणि परंपरांची देवाणघेवाण होऊन परस्पर सामंजस्य, ऐक्य आणि आपुलकी अधिक दृढ होते. महाराष्ट्रातील विद्यार्थी जेव्हा ‘बिहू’ शिकतात किंवा आसाममधील तरुण कलाकार पुण्यात ‘लावणी’ सादर करतात, तेव्हा ते वल्लभभाई पटेल यांच्या, एकमेकांना जाणून घेणे आणि समजून घेणे हेच एकतेकडे जाणारे पहिले पाऊल आहे, या विचाराची प्रत्यक्ष अंमलबजावणी करतात.
पर्यटन देखील एकसंधतेचे-एकोपा जपण्याचे एक माध्यम आहे. ‘देखो अपना देश’ मोहीम (आपला देश पहा-उपक्रम) आणि नव्या स्वरूपात विकसित केलेला ‘इनक्रेडिबल इंडिया’ हा डिजिटल मंच, नागरिकांना आपल्या देशाची विविधता जाणून घेण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी उद्युक्त करतो- मग ते पंजाबमधील सुवर्ण मंदिर असो, केरळची शांत बॅकवॉटर (पाणथळ कालवे) असोत, आसाममधील चहाचे हिरवे मळे असोत किंवा राजस्थानचे विशाल वाळवंट असो. एकट्या २०२४ या वर्षातच, देशातील विविध भागांना भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या २९४ कोटींहून अधिक झाली. ही बाब, भारतीय नागरिकांमध्ये आपल्या देशाबद्दलची वाढती जिज्ञासा आणि अभिमान दर्शवते.
‘स्वदेश दर्शन’ आणि ‘प्रसाद’ (PRASHAD-Pilgrimage Rejuvenation and Spiritual, Heritage Augmentation Drive) सारखी तीर्थक्षेत्र आणि आध्यात्मिक पर्यटन विकास योजना, या योजना फक्त पर्यटनविषयक पायाभूत सुविधा उभारण्यापुरत्या मर्यादित नसून, त्या स्थानिक लोकांसाठी रोजगार आणि उदरनिर्वाहाच्या नव्या संधी निर्माण करतात. जेव्हा नागालँडमधील एखादी महिला गुजरातमधील पर्यटकांसाठी होमस्टे, ही पर्यटकांसाठी घरगुती निवास व्यवस्था चालवते किंवा जोधपूरमधील एखादा कारागीर तमिळनाडूमधील प्रवाशांना हस्तकला उत्पादने विकतो, तेव्हा अशा देवाणघेवाणीच्या वेळी लोक फक्त वस्तूंचे आदानप्रदान करत नाहीत, तर ते असे अनुभव देखील एकमेकांना देतात जे परस्पर सामंजस्य आणि जिव्हाळा वाढवून आपल्या प्रजासत्ताकाला अधिक एकसंध, घट्ट बांधून ठेवतात.
सरदार पटेल यांनी शिकवलेली एकता ही एक वेळची गोष्ट नसून, प्रत्येक पिढीने सतत जपायची आणि पुनरुज्जीवित करायची जबाबदारी आहे. अनास्था, अज्ञान आणि प्रादेशिकतेसारख्या समाजाचे तुकडे करणाऱ्या प्रवृत्तींपासून त्या एकतेचे रक्षण केले पाहिजे. ‘आझादी का अमृत महोत्सव’मधील ‘पंच प्राण’ म्हणजेच पाच संकल्प, भारत २०४७ मधील स्वातंत्र्याच्या शताब्दीकडे वाटचाल करत असताना, राष्ट्रीय एकात्मतेची शपथ त्या प्रवासाच्या केंद्रस्थानी ठेवतात. थोडक्यात एकता ही या नवीन भारतनिर्मितीच्या प्रयत्नांची मुख्य प्रेरणा आहे.
भारत, २०२५ मध्ये सरदार पटेल यांची दीडशेवी जयंती साजरी करत असताना, या लोहपुरुषाला वाहायची खरी आदरांजली म्हणजे त्यांच्या स्मारकांची उभारणी… त्यांच्या स्मृती जतन करणे नव्हे, तर देशातील प्रत्येक नागरिकाला- मग तो कोणत्याही प्रांत, भाषा किंवा समाजातील असो- भारताच्या एकत्रित राष्ट्रीय प्रवासाचा अविभाज्य भाग असल्याची जाणीव निर्माण करून देणे, ही आहे. कोणतीही कृती- मग ती सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेणे असो, संग्रहालयाला भेट देऊन आपल्या वारशाचा अनुभव घेणे असो किंवा विविध राज्यांमध्ये प्रवास करून वेगवेगळ्या संस्कृती जाणून घेणे असो- अशा प्रत्येक सहभागामुळे भारताच्या या प्राचीन संस्कृतीला जोडून ठेवणारे, मनांना एकत्र बांधणारे अदृश्य बंध अधिक मजबूत होतात.
सरदार पटेल यांच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास आणि पंतप्रधान मोदींनी केलेल्या या शब्दांच्या पुनरुच्चारणात म्हटल्याप्रमाणे, ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेतच भारताच्या नियतीचे खरे सार सामावले आहे- कारण ‘एकता’ ही केवळ या संकल्पनेचे ध्येयच नव्हे, तर ही संकल्पना साध्य करण्याचे माध्यमही आहे.
(लेखक केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री आहेत)