दृष्टिक्षेप
उत्तम जोगदंड
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर धर्मनिरपेक्षतेचे महत्त्व अधिक जाणवते, कारण विविधतेने नटलेल्या आपल्या देशात ते सामाजिक सलोखा, बंधुता आणि समानतेचे आधारस्तंभ ठरते.
'आम्ही भारतीय लोक' उत्सवप्रेमी असल्याने आपण नुकताच आपल्या देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन नेहमीच्या उत्साहात साजरा केला. ब्रिटिशांची सत्ता घालवून स्वातंत्र्य मिळवल्यावर संविधान स्वीकारून ज्या दिवशी आपण ते अंमलात आणले त्या दिवसाची स्मृती जागवणारा हा उत्सव.
आपल्या देशात असंख्य धार्मिक आणि सामाजिक उत्सव, सण, परंपरेनुसार वर्षानुवर्षे साजरे केले जातात. प्रत्येक सण-उत्सवामागे काही ना काही इतिहास किंवा कथा-दंतकथा असते. काळानुसार त्यात बरे-वाईट बदल होतात. ‘हल्ली सण-उत्सवांचा आत्माच हरवलाय...’ अशी खंत ज्येष्ठ नागरिक व्यक्त करतात आणि सणावारांचे महात्म्य सांगतात. प्रजासत्ताक दिन अन्य सणांच्या मानाने अगदीच नवखा असला तरी जे संविधान या दिवशी अंमलात आले त्या संविधानातील मूल्यांची आजच्या परिप्रेक्ष्यात चिकित्सा करणे एक जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य ठरते. त्या संवैधानिक मूल्यांपैकी एक अत्यंत महत्त्वाचे मूल्य आहे धर्मनिरपेक्षता.
धर्मनिरपेक्षता (Secularism) हे अत्यंत महत्त्वाचे मूल्य असण्याचे कारण आहे आपल्या देशातली धार्मिक, सांस्कृतिक, भाषिक, वांशिक, जातीय, प्रांतीय विविधता आणि या विविधतेला धक्का न लावता ते सर्वांना एका धाग्यात गुंफून ठेवते. आपले संविधान सर्व नागरिकांना कलम २५ ते २८ अनुसार धार्मिक स्वातंत्र्य बहाल करतानाच अल्पसंख्यांकांना आपली संस्कृती जतन करण्यासाठी कलम २८ आणि २९ अनुसार विशेष तरतूद करते. त्याचवेळी स्वतः सरकार मात्र या विविधतेपासून अलिप्त असते, म्हणजे सरकारचा स्वतःचा कोणताही धर्म-पंथ किंवा जात वगैरे नसते. तसेच सरकारची भूमिका यांपैकी कोणाच्याही बाजूने किंवा विरोधात नसते. संविधान अंमलात आले तेव्हा ते राबवण्यासाठी देशाला लाभलेले समर्थ आणि प्रामाणिक नेतृत्व तसेच लोकांची त्यांना लाभलेली साथ यामुळे देशाची एक खराखुरा धर्मनिरपेक्ष देश म्हणून वाटचाल सुरू झाली. परंतु गेल्या काही वर्षांपासून मतांच्या राजकारणासाठी धर्माचा वापर करून या मूल्यावर जे प्रहार केले जात आहेत ते देशाच्या ऐक्यासाठी घातक ठरत आहेत. ते पाहून देशात ‘धर्मनिरपेक्षतेचं काय झालं?’ असा प्रश्न पडतो. आपल्या धर्माव्यतिरिक्त जे काही असेल ते सारे धर्मविरोधी आणि म्हणून थेट देशद्रोही असा विचार ठसवला गेला आहे. अल्पसंख्यांक लोकांना वेगळे पाडून त्यांचे अस्तित्वच नाकारणे किंवा त्यांना दुय्यम दर्जा देणे हे धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात जाणारे आहेच. परंतु, बंधुता हे मूल्य देखील पायदळी तुडवून सामाजिक सद्भावास सुरुंग लावणारे आहे. हे ध्रुवीकरण किती खालच्या पातळीवर गेले आहे ते नुकत्याच पार पाडलेल्या नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकीत दिसून आले. सत्ताधारी पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने, विरोधक निवडून आल्यास मुंबईचा महापौर ‘खान’ होऊ शकतो, असे धक्कादायक आणि द्वेषपूर्ण वक्तव्य प्रचारादरम्यान केले होते. भारतीय संविधानानुसार आपल्या देशातील सर्वच धर्मांच्या नागरिकांना मतदानाचा आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. एकदा निवडून आल्यावर संविधानानुसार धर्मनिरपेक्ष राहूनच त्या व्यक्तीस काम करायचे आहे. असे असताना ‘खान’ अडचणीचा का वाटतो?
निवडणूक झाल्यावर काही ठिकाणी परस्परविरोधी विचारधारेच्या पक्षांमध्ये युत्या, आघाड्या झाल्या. त्यांची अभद्र युत्या/आघड्या अशी संभावना केली जात आहे आणि धर्मनिरपेक्षतेचे अधिक धिंडवडे निघत आहेत. प्रत्येक पक्षाची स्वतंत्र विचारधारा असू शकते आणि तो संबंधित पक्षांचा अधिकार आहे हे मान्य. परंतु स्थापित व्यवस्थेत संविधानानुसारच कारभार करणे आवश्यक असताना मते मिळवण्यासाठी वापरलेली विचारधारा आडवी कशी काय येऊ शकते? याचा अर्थ स्पष्ट आहे की, ही विचारधारा प्रशासनात देखील उतरवली जाईल याची दोन्ही परस्परविरोधी पक्षांना खात्री असते. कारण तसे झाल्याचे वर्तमानात दिसत आहे. लोकांनी निवडून दिलेल्या सरकारने धर्मनिरपेक्ष न राहता शपथविधीपासून नंतरच्या विविध सरकारी कार्यक्रमांमध्ये, कार्यालयांमध्ये धार्मिक विधीस महत्त्व देणे, या कार्यक्रमात धार्मिक गुरू, बुवा-बाबांना बोलावून त्यांच्यासमोर संवैधानिक पदावरील व्यक्तीने झुकणे, लैंगिक गुन्ह्यात शिक्षा झालेल्या आपल्या धर्मातील गुन्हेगार बाबांना वेळोवेळी पॅरोल मिळवण्यास आणि त्यांचे कैदेतील जीवन सुसह्य करण्यास सरकारी माध्यमांतून मदत करणे हे प्रकार धर्मनिरपेक्षता धुडकारणारे आणि देशाला धार्मिक राष्ट्राच्या मार्गावर नेणारे आहेत. प्रजासत्ताक दिनी सार्वजनिक सत्यनारायण पूजा घालून अनेक ठिकाणी दिनास धार्मिक रंग देण्याचे आणि संविधानास मागे सारण्याचे काम करून अनेक नागरिक त्यात भर घालीत आहेत.
धार्मिक राष्ट्राच्या मार्गाने जाणाऱ्या देशांची कशी वाताहत होते हे आपल्या शेजारचे पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान हे देश तसेच इराण, इराक, सीरिया इत्यादी देशांच्या उदाहरणांवरून दिसून येते. धार्मिकतेने देशाचा ताबा घेतल्यावर धार्मिक आतंकवादाचा शिरकाव व्यवस्थेत होऊन आतंकवाद्यांच्या हाती त्या देशाची सूत्रे कधी आणि कशी गेली आणि त्यात तिथली व्यवस्था, जनता कशी होरपळून निघत आहे हे आपण पाहत आहोत. विशेष म्हणजे या देशांमध्ये आपल्या देशासारखी विविधता देखील नाही. मग, आपला विविधतेने नटलेला देश धर्मनिरपेक्षता सोडून धार्मिकतेच्या मार्गाने गेल्यास काय अनर्थ होईल याची कल्पना करवत नाही. खलिस्तान आंदोलनाच्या वेळी देशाने याची अत्यंत कडवट चव चाखलेली आहे आणि त्याची भयानक किंमत देशाला चुकवावी लागलेली आहे. आज पुन्हा देश त्या मार्गाकडे वळत असताना सर्व समजदार, देशप्रेमी नागरिकांनी याकडे डोळेझाक न करता धर्मनिरपेक्षतेचे रक्षण केले पाहिजे. मग, ‘धर्मनिरपेक्षतेचं काय झालं’, हे विचारायची वेळ येणार नाही.
uttamjogdand@gmail.com