मुंबईत ८२ अतिधोकादायक इमारती; म्हाडाकडून जुन्या इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे दक्षिण मुंबईतील जुन्या व मोडकळीला आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे.
मुंबईत ८२ अतिधोकादायक इमारती; म्हाडाकडून जुन्या इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण
मुंबईत ८२ अतिधोकादायक इमारती; म्हाडाकडून जुन्या इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण
Published on

मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे दक्षिण मुंबईतील जुन्या व मोडकळीला आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये ८२ इमारती अतिधोकादायक आढळून आल्या आहेत. यामध्ये मागील वर्षी अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या ४३ इमारतींचा समावेश आहे.

दक्षिण मुंबईतील उपकर प्राप्त इमारतींचे सर्वेक्षण दरवर्षी करण्यात येते. त्यानुसार यंदाही या इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले. यामधील अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींमध्ये २ हजार २५६ निवासी व ४८० अनिवासी असे एकूण २ हजार ७३६ भाडेकरू, रहिवासी आहेत. मंडळातर्फे १७६ निवासी गाळेधारकांना गाळे खाली करण्याकरिता नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीस बजावलेल्या भाडेकरू, रहिवासी यांच्यापैकी २९ निवासी भाडेकरू, रहिवासी मंडळाच्या संक्रमण शिबिरामध्ये स्थलांतरित झाले आहेत तर ३६ जणांनी स्वतःची निवाऱ्याची इतरत्र पर्यायी व्यवस्था केली आहे. उर्वरित इमारतींमधील भाडेकरू, रहिवासी यांना निष्कासनाच्या सूचना देण्यात आल्या असून गाळे खाली करवून घेण्याची कार्यवाही मंडळातर्फे सुरू आहे.

मुंबईत ८२ अतिधोकादायक इमारती; म्हाडाकडून जुन्या इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण
Mumbai : जुन्या इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना दिलासा; तक्रार निवारण व्यवस्थापन प्रणाली विकसित

२ हजार १०२ भाडेकरू, रहिवाशांची संक्रमण शिबिरात व्यवस्था करावी लागणार असल्याने मंडळातर्फे त्याबाबत कार्यवाही सुरू आहे. या अतिधोकादायक इमारतीमधील रहिवाशी, भाडेकरू यांना आवश्यकतेनुसार मंडळाकडून जागा रिकाम्या करण्याच्या नोटीस देण्यात येतील व त्यांची पर्यायी व्यवस्था संक्रमण शिबिरात करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

म्हाडाचे आवाहन

अतिधोकादायक इमारतींतील भाडेकरू/रहिवाशांनी मंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना इमारती रिकाम्या करण्याकामी सहकार्य करावे व त्यांच्या व आपल्या नातेवाईकांच्या सुरक्षेकरिता मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, जेणेकरून अपघात होऊन होणारी जीवित व वित्तहानी टाळता येईल, असे आ‌वाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे.

नियंत्रण कक्ष

  • मुंबई इमारत दुरुस्ती पुनर्रचना मंडळाचा नियंत्रण कक्ष

  • रजनी महल, पहिला मजला, ८९-९५,ताडदेव रोड, ताडदेव, मुंबई-३४. दूरध्वनी क्रमांक - २३५३६९४५, २३५१७४२३.

  • भ्रमणध्वनी क्रमांक - ९३२१६३७६९९

मुंबई महापालिकेचा नियंत्रण कक्ष

  • पालिका मुख्यालय, फोर्ट,

  • दूरध्वनी क्रमांक - २२६९४७२५/२७

logo
marathi.freepressjournal.in