मत आमचेही
रघुनाथ पांडे
ज्याचे राजकीय आयुष्य संपल्यागत बोलले जायचे, तोच कॅप्टन झाला आणि आजपासून नवा अध्याय सुरू झाला. कॅप्टन मंत्री झाला. प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून गेली सव्वादोन वर्षे कॅप्टन पक्षबांधणीसाठी राज्यभर वणवण फिरला. अविश्रांत. चंद्रशेखर बावनकुळे नावाचा कार्यकर्ता, नेता घडला आणि मंत्रीपदाची वाटचाल सुरू झाली....
कॅप्टनने महाधिवेशनात सळसळती घोषणा दिली. स्थळ होते, पुण्याचे बालेवाडी स्टेडियम. 'या तो हम जीतते है, या सीखते है!'... विधानसभा निवडणूक सुरू झाली. कॅप्टन प्रत्येक अर्जाला नमन करत त्यावर सही करायचा. उमेदवारी अर्जासोबत या कॅप्टनची सही असलेला 'ए बी फॉर्म' जोडला जायचा. आजपासून नवा अध्याय सुरू झाला. कॅप्टन मंत्री झाला. गेला आठवडा एका रोमहर्षक चित्रपट कथेसारखा गेला.
पाच तारखेच्या आझाद मैदानातील शानदार शपथ सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मंत्रीमंडळाची उत्सुकता कमालीची वाढली. थंडीने वातावरण गारेगार होत असताना.. राजकारणात ५० डिग्रीपार पारा चढला होता. रविवारी पहाटे नागपूरचा पारा ७ अंशाजवळपास होता.. आणि डोळ्यासमोर दिसत होते ते नागपूरचे राजभवन. तो क्षण आला. खरं तर ही एक दैवदुर्लभ गोष्ट आहे. सामान्य कार्यकर्त्याला प्रेरणा देणारी. जिचे तात्पर्य आहे : संयम, निष्ठा, अविश्रांत कष्ट, सूक्ष्म. राजकीय मांडणी आणि अभूतपूर्व समर्पण! या गोष्टीचे कॅप्टन चंद्रशेखर बावनकुळे.
हे विशेषण नव्हे, तर सन्मान आहे आणि, तो दिला आहे, रामासारखे सतत त्यांच्या पाठीशी उभे राहणारे नेते देवेंद्र फडणवीस यांनी. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या सूचना, आदेश, सल्ला आणि मार्गदर्शनाने, चंद्रशेखर बावनकुळे नावाचा कार्यकर्ता, नेता घडला आणि आजपासून मंत्रीपदाची वाटचाल सुरू झाली. मोदी व शाह या दोन नेत्यांनी दाखवलेला मार्ग माझ्यात ऊर्जा संचारणारा आहे, असे बावनकुळे यांचे म्हणणे आहे. मंत्री म्हणून रेकॉर्डब्रेक कामगिरी केल्यावरही भाजपने त्यांना उमेदवारी नाकारली. सामाजिक जीवनाला विलक्षण कलाटणी देणारा हा राजकीय आघात होता. मनाला खिळखिळा करणाऱ्या या धूर्त क्षणाला अविरत हा कॅप्टन संयम ठेवून वागला. म्हणाला, 'भारतीय जनता पार्टीला जे वाटले तो निर्णय घेतला; पार्टी माझी आई आहे, ही भावना कायम राहील..'काळाच्या कसोटीवर उत्तरे सोडून दिवस पुढे निघाले. कॅप्टन शांत.. कर्तव्यपथावर अग्रेसर. उत्तरे मिळू लागली.
पार्टीने प्रदेश सरचिटणीस केले. यासोबतीने त्यांच्यावर भारतीय जनता युवा मोर्चा प्रभारी म्हणून जबाबदारी दिली. त्यांनी युवा मोर्चा सक्रिय केला. राज्य पिंजून काढले. लाखो तरूण जोडले. आंदोलने सुरू झाली. महाविकास आघाडीला हैराण करून सोडले. लोकांच्या प्रश्नावर आंदोलने करून त्यांनी जीवाचे रान केले. सक्रिय सहभाग हाच त्यांचा पिंड. विजेच्या चपळाईने त्यांनी प्रवास केला. युवांचा मनात आत्मविश्वास निर्माण करत राजकीय पकड मजबूत केली. कोरोनाच्या भयंकर काळात ते मदतीसाठी पुढे होते.
२०२२चा ऑगस्ट.! कॅप्टन एकदिवस कार्यकर्त्यांसमवेत प्रवासावर असताना मोबाइल खणखणतो. बावनकुळेजी, नड्डाजी कॉल पर है.. आपसे बात करेंगे !! प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून गेली सव्वादोन वर्षे कॅप्टन पक्षबांधणीसाठी राज्यभर वणवण फिरला. अविश्रांत. किती बैठकी घेतल्या असतील.. किती लोकांशी बोलला असेल. किती अवहेलना सहन केली असेल. विरोधक किती बेलगाम बोलले असतील याचा काही हिशेबच नाही. नेकी कर, दर्या में दाल!! कोणी काही म्हणो आपण चालत राहायचे.थांबायचे नाही, हा शिरस्ता. तीनवेळा संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला. खेडोपाडी, तालुके, मोठी शहरे सर्वच ठिकाणी पार्टीचे जाळे विणले. मजबूत केले.
२०२४... संपूर्ण वर्ष निवडणुकांचे. कॅप्टन राज्यभर फिरला. छोट्या सभा. बैठका आणि कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात. शाबासकी. लोकसभा निवडणूक झाली. हताश न होता नव्या उमेदीने पुन्हा विधानसभेची तयारी सुरू झाली. पार्टीचे कार्यक्रम, अधिवेशने, नावीन्यतम योजना, फेरमांडणी, व्यूहरचना असे सगळे. नियती सतत संयमाची परीक्षा घेत असते. ज्याचे राजकीय आयुष्य संपल्यागत बोलले जायचे तोच कॅप्टन झाला. त्याच्या सहीने अनेकांचे भाग्य लिहिले गेले. महाराष्ट्राच्या इतिहासातील हा राजकीय चमत्कार आहे. दुर्मिळ घटना होती. भगवान शंकराचे एक नाव चंद्रशेखर आहे. शंकराने हलाहल पचविले आणि सृष्टीला नवजीवन मिळाले. असेच झालेही. महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व उमेदवारांचे अर्ज या कॅप्टनच्या सहीने निवडणूक आयोगाने स्वीकारले.
नियती अशी असते.. ज्या कॅप्टनची उमेदवारी पक्षाने नाकारली होती. आणि, याविषयीचे कोणतेही कारण त्यांनी पार्टीला विचारलेले नाही. भारतीय जनता पार्टीने आज अभूतपूर्व यश संपादन केले. या यशाच्या पायरीत या कॅप्टनचे अमर्याद कष्ट आहेत. हा कॅप्टन कर्तव्यकठोर आहे आणि, देवेंद्र यांच्या शब्दाबाहेर नाही. ऊर्जामंत्री असताना या कॅप्टनला भेटायला काही लोक आली. ते सगळे मुंबईपासून जवळच असलेल्या पण उजेडापासून दूर असलेल्या एलिफंटा लेणीचे होते. ही लेणी म्हणजे, जागतिक वारसा लाभलेल्या भारतातील १७ सौंदर्य स्थळांपैकी एक. याठिकाणी स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांत प्रथमच वीज पोहोचवण्यास ऊर्जा विभाग यशस्वी झाला तो बावनकुळे यांच्या अभ्यासूवृत्तीने व कल्पकतेने! देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी या बेटावर वीज पोहोचवण्याचा निश्चय केला आणि तेव्हाचे ऊर्जामंत्री असलेल्या या कॅप्टनने त्या दिशेने यशस्वी प्रयत्न केले. समुद्राखाली सात किलोमीटर केबल टाकण्याचा पर्याय अंतिम झाला. या बेटावरील ९५० लोकांना वीज पुरवठा शक्य झाला. त्यांच्या घरात पहिल्यांदा जेव्हा दिवा झगमगला त्यावेळी त्यांना दिवाळी असल्याचे वाटले.
असाच एक प्रसंग मेळघाटातील दुर्गम भागातील अनेक गावात वीज पोचविण्याचा. प्रसिद्ध समाजसेवक डॉ. रवींद्र कोल्हे यांनी या कॅप्टनला पत्र लिहिले की, वन्य जनावरांच्या तावडीतून सुटकेसाठी तसेच मेळघाटातील गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वीज मिळावी. केवळ पाच ओळीचे ते पोस्टकार्ड होते. बावनकुळे नावाच्या या कॅप्टनने आपली संपूर्ण यंत्रणा आदिवासी विभागात पाठवली.. मेळघाटचा वीज पुरवठा प्लॅन तयार झाला. पण हा भाग इतका अरण्याने व्यापला आहे की, त्यातून वीजतारा नेण्यास वन व पर्यावरण विभाग राजी नाही, हे लक्षात आले. या उत्तराने हा कॅप्टन व्यथित झाला. स्वतः पाहणी दौरा केला आणि मेळघाटात मध्यप्रदेशातून वीज पुरवठा सुरु झाला. विजेचे जाळे विणले गेले. आजचा झगमगता मेळघाट हा बावनकुळे यांच्या अभ्यासाचे फलित आहे. अशा अनेक घटनांचा पुंज या कॅप्टनचे क्षितिज विस्तारतो आणि मग नियती नावाच्या दृष्टांताचा अभ्यास करावा, असे घडते. हा कॅप्टन शांत.. स्थिर आहे. पक्षनिष्ठेला हिमालयाची उंची देणारी.. सर्व राजकारण्यांना व राजकारणात येवू पाहणाऱ्यांसाठी ही एक बोधकथा आहे. म्हणूनच देवेंद्र यांनी त्यांचा कॅप्टन म्हणून सन्मान केला. आणि कॅप्टन मंत्री झाला...
(लेखक महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष यांचे माध्यम प्रमुख आहेत.)