सह्याद्रीचे वारे
अरविंद भानुशाली
मंत्रालयात न जाणारे उद्धव ठाकरे अखेर दिल्ली, मुंबईतील विद्यार्थी आंदोलनाच्या निमित्ताने रस्त्यावर उतरले आणि वातावरण एकदम पालटून गेले. राजकारणातून हद्दपार होणारी शिवसेना उबाठा यामुळे चर्चेत आली.
उबाठा (शिवसेना) आपल्या राजकीय अस्तित्वाचा संघर्ष करीत असताना वेगवेगळ्या कारणाने त्या पक्षामध्ये जान आली. दिल्ली व मुंबईतील विद्यार्थी आंदोलनाचा फायदा त्यांना झाला. गेले काही दिवस उद्धव ठाकरे हे सक्रिय झाले असून मातोश्रीबाहेर पडल्याने शिवसेना उबाठाने उभारी घेतल्याचे दिसत आहे. हे वातावरण कितपत टिकते हे काळ ठरवील. सहा खासदारांनी केलेल्या पक्षांतरांविरुद्ध केलेली मोर्चेबांधणी, अयोध्येतील दानचोरी व नीट परीक्षा गोंधळावरून पेटलेले विद्यार्थी आंदोलन या काळात उद्धव हे दिल्ली व मुंबईत सहभागी झाल्याने वातावरण फिरल्याचे दिसते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी मनसे व उबाठा यांची युती झाली खरी, पण प्रचारसभांत आणि निकालानंतर उबाठात मरगळ आली होती. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना कुणाची याबाबत सुरू झालेला खटला हाही खास महत्त्वाचा भाग दिसत आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षे मंत्रालयात जाऊ शकले नाहीत. त्यावर उभ्या महाराष्ट्रातून टीकाटिप्पणी झाली होती. खरे पाहिल्यास सत्तेच्या काळात शिवसेनेची वाढ होणे अपेक्षित होते. परंतु झाले उलटेच. सत्ता सोडून मंत्री व आमदारांनी बंड केले. ४० आमदारांचे बंड हे शिवसेनेला घातक ठरले. त्या काळात समझोत्याचे राजकारण न करता उलट संघर्ष पेटवण्याचे प्रयत्न झाल्याने अनेक दृष्टीने शिवसेना खिळखिळी झाली. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाची ताकद वाढवली. अनेक मोहरे ठाकरे यांना सोडून शिंदे गटात सामील झाले. पुढे विधिमंडळाने आणि निवडणूक आयोगाने या बंडाला मान्यता देत बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना एकनाथ शिंदेंच्या दावणीला बांधून टाकली. आमदार, खासदार गेले, सत्ता गेली त्याची कारणमिमांसा करण्याऐवजी रेड्यांचा बळी देण्यासाठी गुवाहाटीला पाठवण्यात आले आहे अशी शेलकी टीका करून हा संघर्ष वाढवला. पुढे-पुढे तर अनेक दिग्गज नेत्यांनी शिवसेनेची (उबाठा) साथ सोडली.
शिवसेनेची स्थापना १९६६ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेत अनेक मोठ्या प्रमाणावर स्थित्यंतरे झाली. सन २०१९ मध्ये भाजप-शिवसेनेने निवडणूक एकत्र लढवली. मात्र त्यानंतर सत्तेकरिता युतीवर विस्तव ठेवल्याने शिवसेनेची वाताहत झाली. पक्षाचे नाव, चिन्ह गेले. नेमकी अशावेळी मुंबईसह १९ महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या. एकेकाळी राज ठाकरे यांच्यावर बेफाम टीका करणारे उद्धव व राज ठाकरे एकत्र आले. मराठीच्या मुद्द्यावर अनेक मंडळींनी शिवसेना उबाठाला पाठिंबा दिल्याने मुंबई महापालिकेत ६५ नगरसेवक निवडून आले. शिवसेनेवर अखंड टीका करणारी मंडळी उबाठाच्या जवळ आली. परंतु मुंबई महापालिका मात्र शिवसेनेला मिळाली नाही. त्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले. मुंबई महापालिकेची निवडणूक ही प्रतिष्ठेची केल्यानंतरही त्यांचा पराभव झाला. १९ महापालिकांपैकी एकही महापालिका उबाठाच्या ताब्यात आली नाही. त्यामुळे उबाठा शिवसेनेच्या अस्ताची चर्चा सुरू झाली. सन २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत उबाठाचा फायदा झाला. परंतु तीन महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्ष पराभूत झाला. पुढे शिंदे यांची शिवसेना वायुवेगाने वाढत गेली. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले शिवसेना उबाठाचे सहा खासदार साथ सोडून एनडीएसोबत गेले. ते लोकांना आवडले नाही. आता त्याचीही लढाई न्यायालयात सुरू आहे.
या आघातानंतर उद्धव ठाकरे हे घराबाहेर पडले. सहा खासदारांच्या मतदारसंघात जाऊन त्यांच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ईशान्य मुंबईच्या मतदारसंघातील दौरा फारसा यशस्वी झाला नाही. मात्र पुढे विदर्भ-मराठवाड्यात त्यांच्या सभांना चांगली गर्दी जमू लागली. यामुळे उबाठा वर्तुळात आशेचा किरण दिसत असताना नीट प्रकरणावरून दिल्ली, मुंबईत झालेल्या आंदोलनाची भर पडली. राम मंदिर दानचोरी प्रकरणातही उबाठाने उडी घेतली. उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरले. अयोध्येतील राम मंदिरातील चोरीवरून त्यांनी मुंबई, महाराष्ट्रातील भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. शिवसेना उबाठाची पहिली जाहीर सभा दादर हनुमान मंदिराच्या परिसरात झाली. त्या सभेने उबाठामध्ये उत्साह निर्माण झाला. पुढे नागपूरमध्ये जाऊन त्यांनी भाजपविरोधात जाहीर सभा घेतल्या. नवी दिल्लीत विद्यार्थी आंदोलन पेटले. ठाकरे हे नवी दिल्लीत जंतरमंतरवर पोहचले. त्यांनी त्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दिला. पुढे मुंबईत मोर्चाची तयारी सुरू केली. परंतु त्या दरम्यान सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण २६ दिवसांनंतर मागे घेतले.
मंत्रालयात न जाणारे उद्धव ठाकरे अखेर या आंदोलनाच्या निमित्ताने रस्त्यावर उतरले आणि वातावरण एकदम पालटून गेले. राजकारणातून हद्दपार होणारी शिवसेना उबाठा यामुळे चर्चेत आली. आता शिवसेना उबाठाने देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जावे असा हेका धरला आहे. फडणवीस हे दिल्लीत गेल्यानंतर महाराष्ट्रात आपला मार्ग मोकळा होईल असे स्वप्न उवाठाचे संजय राऊत यांना पडले आहे. प्रारंभी राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्या जागी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लावली. पुढे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या जागेवर देवेंद्र फडणवीस जाणार अशी भूमिका मांडली. नंतर देवेंद्र हे धर्मेंद्र प्रधान यांच्याकडील शिक्षण खात्याचे मंत्री होणार, असे राऊत बोलू लागले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान यांचा राजीनामा होताच त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी मुंबईच्या शिवाजी पार्कवर ठाकरे बंधू एकत्र आले. यामुळे एक नक्की की शिवसेना उबाठाला राजकीय बळ मिळाले.