बाहेरून शाळा, कॉलेज : एक आत्मघातकी संस्कृती 
संपादकीय

बाहेरून शाळा, कॉलेज : एक आत्मघातकी संस्कृती

विद्यार्थ्यांमध्ये बाहेरून शाळा-कॉलेज करण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढतो आहे. परीक्षा देऊन फक्त मार्क्स मिळवणे हेच उद्दिष्ट ठरत असून, व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिकता, सांस्कृतिक सहभाग गमावत आहेत.

Swapnil S

विशेष

अजय पाटील

विद्यार्थ्यांमध्ये बाहेरून शाळा-कॉलेज करण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढतो आहे. परीक्षा देऊन फक्त मार्क्स मिळवणे हेच उद्दिष्ट ठरत असून, व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिकता, सांस्कृतिक सहभाग गमावत आहेत.

सध्या शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांमध्ये एक भयानक ट्रेंड दिसून येतो आहे. शाळा- कॉलेजमध्ये वर्षभर न जाता थेट परीक्षेच्या वेळी हजेरी लावायची, परीक्षा देऊन पास व्हायचे आणि पुढच्या वर्गात प्रवेश घ्यायचा.

हा ट्रेंड अचानक आलेला नाही. सर्वप्रथम तो फक्त ज्युनिअर कॉलेजमध्ये दिसला. अकरावी-बारावीला कॉलेजमध्ये न जाता बाहेर क्लास लावायचे आणि थेट परीक्षा द्यायची. आम्ही जेव्हा २००० साली ज्युनिअर कॉलेजला जात होतो, तेव्हा कॉलेजचेच क्लासेस असायचे, प्रायव्हेट क्लासेस नव्हते; मात्र त्यानंतर प्रायव्हेट क्लासेसचा फॅड झपाट्याने वाढला. परिणामी कॉलेजला जाण्यापेक्षा बाहेरून कॉलेज करून फक्त क्लासेस लावण्याचा ट्रेंड तयार झाला. ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक अक्षरशः फुकट पगार घेऊ लागले. त्यांना केवळ प्रॅक्टिकल्स घ्यायचे काम उरले. कोणत्याही ज्युनिअर कॉलेजमध्ये नियमित लेक्चर्स व्हायचे नाहीत. विशेषतः सायन्स फॅकल्टीत हा ट्रेंड जास्त दिसून आला. बारावीत चांगले मार्क्स मिळावेत आणि नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा, या कारणासाठी पालकांनी मुलांना कॉलेजमध्ये पाठवणे बंद केले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध क्लासेस लावले गेले.

जवळपास कोरोना काळापर्यंत हा ट्रेंड केवळ ज्युनिअर कॉलेजपुरता मर्यादित होता, तेही मुख्यतः सायन्समध्ये. मात्र कोरोनानंतर हा ट्रेंड झपाट्याने सीनिअर कॉलेजेसमध्येही पसरला. सीनिअर कॉलेजेस विद्यार्थ्यांविना ओस पडू लागली. जास्तीत जास्त विद्यार्थी बाहेरून ॲडमिशन घेणाऱ्या कॉलेजमध्ये जाऊ लागल्याने रेग्युलर लेक्चर्स घेणाऱ्या कॉलेजेसमध्ये प्रवेश कमी झाले आणि अशा चांगल्या कॉलेजेसना देखील हा ट्रेंड स्वीकारावा लागला.

शहरांपेक्षा खेड्यांत हा ट्रेंड अधिक भयानक पद्धतीने पसरतो आहे. कुठल्या तरी लांबच्या कॉलेजमध्ये नाव नोंदवायचे आणि फक्त परीक्षेच्या वेळी जायचे- हेच आता विद्यार्थ्यांचे वास्तव झाले आहे. गावातील तरुण मंडळी दिवसभर स्मार्टफोनवर टाइमपास करताना दिसतात.

केवळ मार्क्स मिळवण्यासाठी आणि पुढच्या वर्गात प्रवेशासाठी परीक्षा द्यायची हा किती संकुचित दृष्टिकोन आहे! खरं तर कॉलेज हे तरुणांचे व्यक्तिमत्त्व घडवण्याचे व्यासपीठ आहे. तिथे त्यांना नवे मित्र-मैत्रिणी भेटतात, त्यांची सर्जनशीलता आणि अभिव्यक्ती विकसित होते. खेळ, सांस्कृतिक उपक्रम, चर्चासत्रं, आंदोलनं, एनसीसी, एनएसएस यामध्ये सहभाग घेऊन व्यक्तिमत्त्वाला नवे पैलू पडतात. गॅदरिंग, युथ फेस्टिवल्समुळे सांस्कृतिक अभिरुची वाढते. विविध जाती, धर्म, प्रांत आणि लिंगाच्या व्यक्तींशी मिसळल्याने सामाजिकता वाढते. पण बाहेरून कॉलेज करण्याच्या ट्रेंडमुळे हे सर्व अनुभव विद्यार्थी गमावत आहेत. त्यातून उथळ, कौशल्यहीन, असामाजिक तरुण तयार होतो आहे. असा तरुण तकलादू मडक्यासारखा असतो, जो थोड्याशा दबावाने फुटतो. वैचारिक दिशा नसलेल्या अशा तरुणांचा वापर अराजक किंवा असामाजिक गोष्टींसाठी करणे सोपे होते.

आता हा ट्रेंड केवळ ज्युनिअर आणि सीनिअर कॉलेजपुरता नाही, तर शाळांमध्येही दिसून येतो आहे. खरं तर बाहेरून कॉलेजची सुविधा अशा लोकांसाठी आहे, जे नोकरी-व्यवसाय करत असूनही शिकण्याची इच्छा बाळगतात किंवा ज्यांचे शिक्षण अर्धवट राहिले आहे. पण सध्या शाळा-कॉलेजच्या वयातली मुलंही बाहेरून शिक्षण घेताना दिसतात. शाळा-कॉलेजमध्ये जसा व्यक्तिमत्त्व विकास होतो, तसा प्रायव्हेट क्लासेसमध्ये होत नाही. पण पालकांना हे पटत नाही. ते केवळ स्पर्धा आणि समाजातील ट्रेंडच्या मागे धावतात.

असे विद्यार्थी शिक्षण केवळ मार्क्स मिळवण्यासाठी घेतात. शिक्षणाची खरी गोडी त्यांना नसते. ते केवळ परीक्षा देऊन, जास्तीत जास्त मार्क मिळवून पुढच्या वर्गात जाण्याच्या भयानक रॅट रेसमध्ये पळतात. यात त्यांच्या भावविश्वाची चिरड होते.

या ट्रेंडमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो आहे. बहुसंख्य विद्यार्थी स्मार्टफोनच्या व्यसनात अडकले आहेत. जास्त मार्क्सच्या दबावामुळे एन्झायटी वाढते आहे. कुटुंबाशी भावनिक नाते कमकुवत होत आहे, तसेच समाजात वावरताना देखील ते कमी पडत आहेत.

बाहेरून शाळा-कॉलेज करण्याच्या या संस्कृतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये भयंकर नकारात्मक बदल होत आहेत. याला पालकांची संकुचित भूमिका जबाबदार आहे.

शाळा-कॉलेज फक्त मार्क्स, डिग्री आणि नोकरीसाठी आहेत का? असा प्रश्न प्रत्येक पालकाने स्वतःला विचारायला हवा. या भयानक ट्रेंडमुळे अनेक चांगल्या शाळा आणि कॉलेजेस बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मी स्वतः चाइल्ड काऊन्सलर म्हणून सांगतो- माझे व्यक्तिमत्त्व घडवण्यात माझ्या शाळा आणि कॉलेजचा सिंहाचा वाटा आहे.

पालकांनो, तुमच्या मुलांना वर्षभर रेग्युलर शाळा आणि कॉलेजमध्ये पाठवा. नाहीतर भविष्यात पश्चात्ताप करण्याची वेळ येणार हे निश्चित.

चाइल्ड काऊन्सलर

लहान मुलांच्या मृत्यूनंतर केंद्र सरकार अलर्ट! ‘कोल्ड्रिफ’ सिरपवर बंदी; नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी

अमेरिकेत आणखी एक भारतीय ठार; डलासमध्ये विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या

महाराष्ट्रात ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; 'या' दिवसांमध्ये बाहेर पडताना घ्या काळजी, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

इटलीतील सुट्टीचा शेवटचा दिवस ठरला आयुष्याचा शेवट! नागपूरच्या हॉटेल व्यावसायिक दाम्पत्याचा अपघातात मृत्यू, तिन्ही मुलं जखमी

'पिंजऱ्याची चंद्रा’ काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन