राष्ट्रपदीपदाच्या निवडणुकीस अवघे काही दिवस उरले असताना महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना आपला पाठिंबा दिल्याने गेल्या काही दिवसांपासून यासंदर्भात जे संभ्रमाचे वातावरण होते, त्यावर आता पडदा पडला आहे. या आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आयोजित केलेल्या बैठकीस उपस्थित राहून शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी, विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना आपल्या पक्षाचा पाठिंबा देऊ केला होता; पण त्यादरम्यान राज्यात झालेले सत्तांतर, राजकीय घडामोडी लक्षात घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना कोणाच्या मागे उभी राहणार याकडे सर्वांचे लक्ष होते. उद्धव ठाकरे यांच्यासमवेत असलेल्या शिवसेनेच्या खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, यासाठी पक्षप्रमुखांवर दबाव आणला असल्याच्या बातम्यांचीही माध्यमांमध्ये चर्चा होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन, आपला पक्ष द्रौपदी मुर्मू यांना का पाठिंबा देत आहे, यासंदर्भात खुलासा केला. तसेच या निर्णयासाठी आपल्यावर कसल्याही प्रकारचा दबाव नव्हता, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. आदिवासी समाजाच्या अनेक नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे फोन आल्याने त्यांच्या प्रेमाच्या आग्रहाखातर आपण मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, असे पक्षप्रमुखांनी घोषित केले. महाराष्ट्रात सुरू असलेले सध्याचे राजकारण पाहता राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपतीपदासाठीच्या उमेदवारास पाठिंबा देण्यास विरोध करायला हवा होता; पण राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने नेहमीच वेगळी भूमिका घेतली आहे. आताही मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. योग्य व्यक्तीच्या समर्थनासाठी शिवसेनेने यापूर्वी प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा देऊ केला होता. राष्ट्रपतीपदावर योग्य व्यक्ती स्थानापन्न व्हावी, यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी पक्षभेद बाजूला ठेवून त्यांना पाठिंबा दिला होता. द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाच्या आहेत. एका आदिवासी महिलेस राष्ट्रपती होण्याची संधी मिळत आहे, हे लक्षात घेऊन त्यांना पाठिंबा देण्याचा जो आग्रह झाला, त्यामुळे शिवसेनेने त्यांना पाठिंबा देऊ केला, हे पक्षप्रमुखांनी स्पष्ट केले. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी, मुर्मू यांना पाठिंबा म्हणजे भाजपला पाठिंबा नव्हे, असे म्हटले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत असताना यापूर्वीही शिवसेनेने त्या आघाडीच्या उमेदवाराऐवजी प्रतिभा पाटील यांना, प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता, असे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले. शिवसेनेची असे निर्णय घेण्याची परंपरा आहे, हेही राऊत यांनी निदर्शनास आणून दिले; पण शिवसेनेने महाविकास आघाडीत असताना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल काँग्रेस पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेच्या या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. शिवसेना हा महाविकास आघाडीचा घटक असल्याने अशा काही प्रस्तावासंदर्भात शिवसेनेने मविआ नेत्यांशी चर्चा करायला हवी होती, असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. राज्यातील सरकार गैरलोकशाही मार्गांचा वापर करून ज्या प्रकारे उलथवून टाकण्यात आले आणि शिवसेनेच्या अस्तित्वालाच आव्हान दिले गेले, त्या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेने घेतलेला निर्णय अनाकलनीय वाटतो, हे सांगण्यास बाळासाहेब थोरात विसरले नाहीत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी, ठाकरे यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. भाजपला नव्हे, तर एका आदिवासी महिलेला पाठिंबा दिला असल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले आहे, तसेच शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेमुळे मविआमध्ये काही दुही निर्माण होणार नाही, असेही राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केले आहे. राष्ट्रपतीपदासाठीची लढत ही एक वैचारिक लढाई आहे. लोकशाही आणि घटना वाचविण्यासाठी जो संघर्ष सध्या सुरू आहे त्याचा हा भाग आहे. ही लढाई स्त्री-पुरुष किंवा आदिवासी-बिगरआदिवासी यांच्यातील नाही, हे काँग्रेसने निदर्शनास आणून दिले. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येत्या १७ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात एका बैठकीचे आयोजन केले आहे. मविआच्या आमदार, खासदारांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. त्या बैठकीस यशवंत सिन्हा उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यावेळी, सिन्हा यांच्या मागे मविआमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हेच उभे असल्याचे चित्र दिसणार आहे.