मत आमचेही
केशव उपाध्ये
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा एक भाग असलेली स्वदेशी चळवळ स्वातंत्र्य मिळाल्यावर मात्र पार निस्तेज झाली होती. आता नव्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा नारा दिल्यावर देशात एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले आहे.
भारताचा अन्यायकारी व्हाईसराय लॉर्ड कर्झन याने केलेल्या बंगालच्या फाळणीला विरोध करण्यासाठी भारतीय नागरिकांनी ७ ऑगस्ट १९०५ रोजी सुरू केलेली स्वदेशीची चळवळ ही ब्रिटिश राजवटीविरुद्धची सर्वात यशस्वी चळवळ होती. पण भारतीय स्वत्व टिकवून ठेवणाऱ्या स्वदेशीचे महत्त्व स्वातंत्र्योत्तर काळात सत्तेवर आलेल्या सरकारला का वाटले नाही? शतकापूर्वीच्या त्या चळवळीची देशाला आजही तितकीच गरज आहे, याचे भान त्या सरकारला राहिले नाही. काँग्रेसच्या काळात देशात येणारे सारे मार्ग तस्करीवाटे येणाऱ्या विदेशी मालासाठी कायम खुलेच राहिले आणि स्वदेशी मालाला नेहमीच दुय्यम स्थान मिळत राहिले. परिणामी भारतीय उत्पादक मात्र अपयशी ठरत आपला आत्मविश्वास गमावत राहिले.
राख जमलेल्या स्वदेशीच्या प्रेरणेवरील राख फुंकून त्यात प्राण ओतण्याचे काम आता मोदी सरकारने केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उपसलेल्या निर्यात शुल्काच्या अस्त्राच्या पार्श्वभूमीवर गेल्या ऑगस्ट महिन्यात वाराणसी येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने स्वदेशीचा बिगुल फुंकला तो समयोचित ठरला. ट्रम्प यांनी भारतीय आणि रशियन अर्थव्यवस्थांना मृत अर्थव्यवस्था म्हटले त्याचा वचपा घेताना भारताने निर्यातशुल्काची कोणतीही तमा आणि भय बाळगले नाही. त्यामुळे अमेरिकेसारख्या महासत्तेलाही आपण स्वदेशीचा मंत्र जपत तोडीस तोड उत्तर देऊ शकतो, असा विश्वास देशवासीयांमध्ये निर्माण झाला आहे.
जागतिक अस्थिरतेमध्ये स्वदेशीचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले की आपले शेतकरी, लघु उद्योग, आपल्या तरुणांचा रोजगार आणि त्यांचे हित हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी नागरिक, राजकीय पक्ष, उद्योग आणि व्यावसायिक जगताला ‘वोकल फॉर लोकल’ आणि ‘मेक इन इंडिया’चा प्रचार करण्याचे आवाहन केले. त्यांनी लोकांना केवळ असाच ऐवज खरेदी करण्याचे आवाहन केले ज्यात भारतीयांनी घाम गाळला आहे. त्यांनी व्यापाऱ्यांनाही केवळ स्वदेशी वस्तू विकण्यास सांगितले. कोविड महामारीच्या काळातही त्यांनी स्वावलंबी भारत आणि स्वदेशी उत्पादनांच्या खरेदीवर भर दिला होता.
स्वदेशीचा मंत्र आणि आत्मनिर्भरतेचा हा नारा भारताला भविष्यात महासत्तेकडे नेणारा ठरणार आहे. याची चुणूक दिसायला सुरुवातही झाली आहे. यंदाच्या दिवाळीत स्वदेशी वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री झाली हा त्याचाच परिपाक आहे. यावेळी भारतीयांनी चिनी वस्तूंऐवजी ‘मेड इन इंडिया’ वस्तूंना अधिक पसंती दिल्याचे बाजारपेठेचे आकडे सांगत आहेत. हे आकडे अन्य कुणाचे नसून ‘द कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’च्या अहवालानुसार तब्बल ५.४० लाख कोटी रुपयांच्या स्वदेशी वस्तू भारतात विकल्या गेल्या, तर स्वदेशी सेवांमुळे ६५०० कोटी रुपयांची उलाढाल झाली. दिवाळी सणातील ही भरघोस उलाढाल भारताची आर्थिक ताकद आणि स्वदेशीची भावना सिद्ध करते. विशेष म्हणजे सणासुदीच्या काळातील भारताच्या व्यवसाय इतिहासातील ही सर्वाधिक उलाढाल आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे हा संशोधन अहवाल राज्यांच्या राजधान्या आणि दुसऱ्या तसेच तिसऱ्या स्तरातील शहरांसह साठ प्रमुख वितरण केंद्रांमध्ये केलेल्या व्यापक देशव्यापी सर्वेक्षणावर आधारित आहे.
मोदी सरकारच्या स्वदेशी जागरणामुळे झालेला बदल हा ग्राहक आणि व्यापारी-उद्योजक यांच्या प्रतिसादामुळे घडला आहे. खऱ्या अर्थाने ही स्वदेशी दिवाळी साजरी झाली म्हणावयास हरकत नाही. कारण ७८ टक्के ग्राहकांनी विदेशी वस्तूंपेक्षा भारतीय बनावटीच्या वस्तूंना प्राधान्य दिले. परिणामी चिनी वस्तूंच्या मागणीत लक्षणीय घट झाली. हा परिणाम कायम राहणार आहे. इतकेच नव्हे, तर दिसामाजी वाढीस लागणार आहे, हे निश्चित.
ही चळवळ केवळ बाजारपेठेपर्यंतच मर्यादित नाही, तर तिच्या कक्षा अतिशय विस्तृत आहेत. संरक्षण विभागातही स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर संरक्षण संशोधन, विकास संस्था आणि संरक्षण उत्पादन विभाग यांच्या नेतृत्वाखालील स्वदेशीकरणाच्या धोरणांमुळे वेगाने वाढत आहे. यात क्षेपणास्त्रे, विमाने, इलेक्ट्रॉनिक युद्धप्रणाली, रडार आणि इतर अनेक उपकरणांचा समावेश आहे. त्यासाठी तंत्रज्ञान विकास निधीसारख्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले जात आहे.
‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’ने अग्नी आणि पृथ्वी मालिकेतील क्षेपणास्त्रे, ॲस्ट्रा क्षेपणास्त्रे, एलसीए तेजस विमान, ब्रह्मोस क्षेपणास्त्र आणि मारिचसारखी अनेक यशस्वी स्वदेशी उत्पादने तयार केली आहेत. स्वदेशी तंत्रज्ञानाच्या विकासावर आणि उत्पादन करण्याच्या क्षमतेवर लक्ष केंद्रित करणे, याचाच अर्थ परदेशी तंत्रज्ञानावरील अवलंबित्व कमी करणे, असा आहे. स्वदेशी तंत्रज्ञानावर भर देताना सरकारी ईमेल ‘झोहो’ या भारतीय डोमेनवर हलवण्यात येत आहेत. स्वदेशी तंत्रज्ञानाचा हा वापर नक्कीच उत्साहवर्धक आहे. अराट्टई (Arattai) च्या रूपाने व्हाॅट्सॲपलाही स्वदेशी पर्याय उभा राहतो आहे.
स्वदेशी चळवळीच्या रूपाने सर्वच क्षेत्रात होणारे हे बदल भारतीयांचा आत्मविश्वास एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारे आहेत. देशाला तिसरी महासत्ता करण्याच्या दिशेने होणारे हे प्रयत्न देशवासीयांसाठी खचितच उत्साहवर्धक असून त्यांच्यात स्वदेशीचे स्फुल्लिंग चेतवणारे आहेत.
मुख्य प्रवक्ते, प्रदेश भाजप