विशेष
डॉ. राजेंद्र बगाटे
केवळ भारतच नव्हे, तर जगातील अनेक देश दहशतवादाच्या समस्येचा सामना करीत आहेत. डिजिटल युगात अफवा पसरवून किंवा जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात बसून दहशतवादी कारवाया करता येऊ शकतात. त्यामुळे दहशतवादाचा मुकाबला एकटादुकटा देश करू शकत नाही.
दहशतवाद व त्या माध्यमातून घडवली जाणारी हिंसा ही भारताकरिता जुनी डोकेदुखी आहे. भारताचे माजी पंतप्रधान राजीव यांची २१ मे १९९१ रोजी तमिळनाडूमधील श्रीपेरंबुदूर येथे निवडणूक प्रचारसभेदरम्यान झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला होता. त्या घटनेनंतर भारत सरकारने समाजात दहशतवाद आणि हिंसाचाराविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी २१ मे हा दिवस ‘दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिन’ म्हणून घोषित केला. ऐंशीच्या दशकापासून देशात दहशतवादाने डोके वर काढले. खलिस्तानवादी चळवळीने पंजाबमध्ये अनेक निरपराध व्यक्तींची हत्या केली. काश्मीरमध्ये वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांच्या माध्यमातून हिंसाचार घडवण्याची पाकिस्तानची खोड जुनीच आहे. श्रीलंकेतील एलटीटीईने राजीव गांधी यांची हत्या केली, तर खालिस्तानवादी दहशतवादातून इंदिरा गांधी यांना आपण गमावले.
मानवजातीच्या इतिहासावर दृष्टिक्षेप टाकला असता संघर्ष, युद्धे आणि हिंसा यांचे अनेक संदर्भ आढळतात. प्राचीन काळात भूभाग विस्तारासाठी युद्धे केली जात होती. मध्ययुगात धर्माच्या नावाखाली रक्तपात झाला. आधुनिक युगात राष्ट्रवाद, आर्थिक विषमता, राजकीय स्वार्थ, धार्मिक कट्टरता आणि जातीयवादामुळे हिंसाचाराला खतपाणी मिळाले. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने जगाला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेले असले, तरी मानवी मनातील द्वेष, सूडभावना आणि असहिष्णुता पूर्णपणे नाहीशी झालेली नाही. उलट आधुनिक तंत्रज्ञानामुळे दहशतवाद अधिक संघटित, आक्रमक आणि घातक बनला आहे. आज दहशतवादी संघटना इंटरनेट, सोशल मीडिया, आर्थिक नेटवर्क आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या मदतीने जगभरात भयाचे वातावरण निर्माण करत आहेत. त्यामुळे दहशतवाद हा केवळ एका देशापुरता मर्यादित प्रश्न राहिलेला नसून संपूर्ण मानवजातीसमोरील गंभीर आव्हान बनला आहे.
दहशतवाद म्हणजे राजकीय, धार्मिक, सामाजिक किंवा वैचारिक उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी हिंसा, भीतीचा वापर करणे होय. दहशतवादी संघटना समाजामध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी निरपराध नागरिकांना लक्ष्य करतात. बॉम्बस्फोट, आत्मघाती हल्ले, गोळीबार, अपहरण, रेल्वे किंवा विमानांवरील हल्ले, धार्मिक स्थळांवरील आक्रमणे आणि सायबर हल्ले अशा विविध मार्गांनी दहशतवादी कारवाया घडवून आणल्या जातात.
भारत हा विविध धर्म, भाषा, संस्कृती आणि परंपरांनी नटलेला देश आहे. विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट्य मानले जाते. मात्र, काही विघातक शक्तींनी या विविधतेचा गैरफायदा घेऊन देशामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वातंत्र्यानंतर भारताने अनेक दहशतवादी घटनांचा सामना केला आहे. पंजाबमधील अतिरेकी चळवळी, जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद, ईशान्य भारतातील फुटीरतावादी कारवाया, नक्षलवाद आणि महानगरांमधील बॉम्बस्फोट अशा अनेक घटनांनी देश हादरून गेला. १९९३ मधील मुंबई बॉम्बस्फोट, २००१ मधील भारतीय संसदेवरील हल्ला, २००८ मधील मुंबईवरील २६/११ चा दहशतवादी हल्ला आणि पुलवामा हल्ला अशा घटनांमध्ये शेकडो निरपराध नागरिक, सैनिक आणि पोलीस शहीद झाले. या घटनांमुळे समाजामध्ये भीती, असुरक्षितता आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले.
दहशतवादाची कारणे अनेक प्रकारची आहेत. गरिबी, बेरोजगारी, अशिक्षितता, सामाजिक अन्याय, धार्मिक कट्टरता, जातीय भेदभाव, राजकीय अस्थिरता आणि परकीय हस्तक्षेप ही दहशतवाद वाढण्याची प्रमुख कारणे मानली जातात. समाजातील काही युवक जेव्हा स्वतःला उपेक्षित समजू लागतात, तेव्हा त्यांच्या मनामध्ये असंतोष निर्माण होतो. काही अतिरेकी संघटना अशा युवकांना आपल्या जाळ्यात ओढतात. धर्म, राष्ट्रवाद किंवा स्वातंत्र्याच्या नावाखाली त्यांचे ब्रेनवॉश केले जाते. काही वेळा आर्थिक आमिष दाखवूनही युवकांना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी केले जाते. सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून अतिरेकी विचारसरणीचा प्रचार मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे युवकांमध्ये विवेकशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावादी मूल्ये विकसित करणे अत्यंत आवश्यक आहे.
दहशतवादाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवरही गंभीर परिणाम होतो. एखाद्या मोठ्या हल्ल्यानंतर पर्यटन, उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक यांवर विपरीत परिणाम होतो. सरकारला सुरक्षा व्यवस्थेसाठी प्रचंड खर्च करावा लागतो. विकासकामांसाठी वापरला जाणारा निधी सुरक्षेसाठी खर्च होतो. त्यामुळे देशाच्या आर्थिक प्रगतीचा वेग मंदावतो. दहशतवादी घटनांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा प्रभावित होऊ शकते. त्यामुळे दहशतवाद हा केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न नसून राष्ट्रीय विकासासाठीही मोठे आव्हान आहे. आजच्या डिजिटल युगात सायबर दहशतवाद हे नवे संकट बनले आहे. इंटरनेट आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून सरकारी यंत्रणा, बँकिंग व्यवस्था आणि संप्रेषण प्रणालीवर हल्ले केले जाऊ शकतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवणे, धार्मिक तेढ निर्माण करणे आणि समाजात अस्थिरता निर्माण करणे हे प्रकार वाढले आहेत. काही वेळा खोटी माहिती आणि द्वेषपूर्ण संदेशांमुळे दंगली आणि हिंसाचार भडकतो. त्यामुळे डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांनी कोणतीही माहिती तपासल्याशिवाय पुढे पाठवू नये. डिजिटल साक्षरता ही आजच्या काळाची गरज बनली आहे.
दहशतवाद आणि हिंसाचार रोखण्यासाठी शिक्षण अत्यंत प्रभावी माध्यम ठरू शकते. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच शांतता, सहिष्णुता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांची जाणीव निर्माण केली पाहिजे. शिक्षणामुळे विवेकशीलता विकसित होते आणि युवक चुकीच्या प्रवृत्तींपासून दूर राहतात. महात्मा गांधीजींच्या मते हिंसा तात्पुरता विजय मिळवून देऊ शकते; परंतु दीर्घकालीन शांतता आणि मानवतेचे रक्षण केवळ अहिंसेतूनच शक्य आहे. आजच्या काळात गांधीजींचे विचार अधिक महत्त्वाचे वाटतात. हिंसेला हिंसेने उत्तर दिल्यास द्वेष वाढतो; परंतु संवाद, सहकार्य आणि समजूतदारपणातून समाजात सलोखा निर्माण होतो. कुटुंब व्यवस्थेची भूमिकाही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मुलांमध्ये नैतिक मूल्ये, सहनशीलता, परस्पर आदर आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे कार्य कुटुंबातूनच सुरू होते.
माध्यमांची जबाबदारी देखील अत्यंत महत्त्वाची आहे. वृत्तपत्रे, दूरदर्शन, रेडिओ आणि सोशल मीडिया यांच्या माध्यमातून समाजात जागरूकता निर्माण करता येते. मात्र, काही वेळा सनसनाटी वृत्तांकनामुळे समाजात भीती आणि तणाव वाढतो. त्यामुळे माध्यमांनी जबाबदारीने आणि संवेदनशीलतेने बातम्या सादर करणे आवश्यक आहे. समाजात शांतता, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पोहोचविणे ही माध्यमांची सामाजिक जबाबदारी आहे. भारत सरकार आणि विविध सुरक्षा यंत्रणा दहशतवाद रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. सैन्यदल, पोलीस, गुप्तचर संस्था आणि राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा देशाच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र कार्यरत असतात. सीमावर्ती भागांमध्ये सुरक्षा मजबूत करण्यात आली आहे. दहशतवादी कारवायांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर कायदे करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरही विविध देश एकत्र येऊन दहशतवादाविरोधात सहकार्य करत आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाने दहशतवादाला जागतिक शांततेसाठी गंभीर धोका मानले आहे.
धर्म हा मुळात प्रेम, करुणा आणि मानवतेचा संदेश देतो. कोणताही धर्म हिंसा शिकवत नाही. परंतु काही कट्टरवादी शक्ती धर्माचा चुकीचा अर्थ लावून लोकांना भडकवतात. त्यामुळे धार्मिक सहिष्णुता आणि परस्पर आदर वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. विविध धर्मांचे लोक एकत्र येऊन शांतता आणि बंधुभावाचा संदेश देतील, तर समाज अधिक मजबूत होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधानाने सर्व धर्मांना समान आदर दिला आहे. ‘सर्वधर्मसमभाव’ ही भारतीय संस्कृतीची परंपरा आहे. या मूल्यांचे जतन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
महिलांची भूमिकाही शांतता प्रस्थापित करण्यात अत्यंत महत्त्वाची आहे. आई, शिक्षिका, समाजकार्यकर्त्या आणि नेतृत्वकर्त्या म्हणून महिला समाजात संवेदनशीलता आणि सहकार्याची भावना निर्माण करू शकतात. महिलांना शिक्षण, स्वावलंबन आणि निर्णयप्रक्रियेत समान सहभाग मिळाल्यास समाज अधिक स्थिर आणि प्रगत होतो.
(लेखक समाजशास्त्राचे अभ्यासक आहेत)
bagate.rajendra5@gmail.com