महाराष्ट्रनामा
गिरीश चित्रे
सत्तेच्या हव्यासापोटी मुंबईकरांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होणं ही आजची कटू वस्तुस्थिती आहे. तब्बल नऊ वर्षांनंतर झालेल्या महापालिका निवडणुकांनंतर नव्या सत्तेकडून आता मुंबईकरांना केवळ राजकारण नव्हे, तर ठोस उपायांची अपेक्षा आहे.
मुंबई महानगरपालिकेत गेल्या तीन दशकांहून अधिक काळ ठाकरेंच्या सेनेची सत्ता होती. तीन दशकाच्या काळात ठाकरे सेनेबरोबर भाजपही सत्तेमध्ये वाटेकरी होता. राजकारणातील दोन मित्रपक्ष, बदलले सत्तेचे समीकरण यामुळे आज राजकीय शत्रू झाले आहेत. त्यामुळे लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध ठाकरे सेना सामना रंगला होता. तर त्यानंतर १५ डिसेंबर २०२५ रोजी मुंबई महापालिकेसह राज्यातील २९ महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले. तब्बल ९ वर्षांनंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या. निवडणुकीत जय- पराजय हे ठरलेले असतात. मात्र मतदान करणाऱ्या मुंबईकरांचे काय, त्यांच्या समस्यांचे काय, मुलभूत सुविधा मिळणार का, याच माफक अपेक्षा मुंबईकरांच्या असतात. त्यामुळे मुंबईत सत्तासमीकरण बदलले असले तरी समस्या आजही कायम आहेत. लोकशाहीच्या उत्साहात मतदाराचा एक दिवस असतो आणि पाच वर्षे ही राजकीय पक्षाची असतात. त्यामुळे सत्तेसाठी राजकारण करणे हा राजकीय पक्षांचा अजेंडा असला तरी मुंबईकरांच्या समस्यांचे निवारण करणे हीदेखील लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे.
आपल्या प्रभागातील समस्यांचे निवारण होईल या आशेने मतदार राजा मोठ्या विश्वासाने लोकप्रतिनिधींची निवड करत मुंबई महापालिकेत पाठवतो. विजयाची माळ गळ्यात पडली की, काही दिवस लोकप्रतिनिधी मतदार राजाचे गुणगान गातो. मात्र जसे दिवस पुढे सरकतात तसा लोकप्रतिनिधींना मतदार राजाचा विसर पडल्याचे दिसून येते. सुरळीत पाणीपुरवठा, खड्डे मुक्त रस्ते, अतिधोकादायक इमारतींतील रहिवाशांचे पुनर्वसन, आगीच्या घटनांपासून मुंबईकरांचे संरक्षण, कचरा मुक्त मुंबई या सुविधा उपलब्ध करणे राज्यकर्त्यांची जबाबदारी असते. सत्ता येते, जाते, पण नेते मंडळी 'अर्थपूर्ण' राजकारणातचं व्यस्त असतात. खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण, अतिधोकादायक इमारतींतील रहिवाशांचा जीव टांगणीला, आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा, २४ तास पाणी योजना कागदावर या समस्यांचा सामना नेहमीच मुंबईकरांना करावा लागतो. त्यामुळे सत्तेत कोणी विराजमान झाले, तरी मुंबईकरांच्या समस्या कायमच राहतात. परंतु २०२६ मध्ये मुंबई महानगरपालिकेत नव्या पर्वाचा उदय झाला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर पालिकेतील सत्ताधारी असो वा विरोधक मुंबईकरांना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तत्परता दाखवतील, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
२४ तास पाणी, दर्जेदार आरोग्य सेवा, खड्डेमुक्त रस्ते, पालिका शाळांतील विद्यार्थ्यांची गळती थांबवत शिक्षणाचा दर्जा वाढवणे या गोष्टींची अंमलबजावणी करणे मुंबई महापालिका प्रशासनाची जबाबदारीच आहे. तर पालिका प्रशासनाच्या कामकाजावर लक्ष ठेवत त्या सुविधा करदात्या मुंबईकरांना मिळतात का हे पहाणे सत्ताधारी व विरोधी पक्षनेत्यांचे कर्तव्य. मात्र मुंबईकर असुविधांच्या बोजाखाली दबला जात असून नेतेमंडळी अर्थपूर्ण राजकारण करत मुंबई महापालिकेतील सत्ता काबीज करण्यात धन्यता मानतात. एकूणच सत्तेत कोणी विराजमान झाले तरी मुंबईकरांच्या समस्या कायमचं राहणार आहेत, यात दुमत नाही.
मुंबई महापालिका आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून जगभरात ओळखली जाते. त्यामुळे मुंबई महापालिकेतील सत्तेचा उपभोग घेण्यास कुठलाही राजकीय पक्ष नकार देईल असा विचार ही मनात येणे शक्य नाही. मुंबई महापालिकेचा डोलारा उभा आहे, तो करदात्या मुंबईकरांच्या कर रुपातून मिळणाऱ्या पैशामुळे. करदात्या मुंबईकरांना सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाच्या मदतीला लोकप्रतिनिधी असतातच. मात्र गेल्या काही वर्षांपासून मुंबई महापालिकेत अर्थपूर्ण राजकारणाला पसंती दिली जात आहे. त्यामुळे एखाद्या कामाची घोषणा करायची, काम अंतिम टप्प्यात येईपर्यंत खर्चात वाढ करायची, असा कारभार सुरू आहे. मुंबईकरांना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे ही जबाबदारी लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासनाची असते. मात्र सध्या सुरू असलेल्या अर्थपूर्ण राजकारणात कचरा मुक्त मुंबई, खड्डे मुक्त रस्ते हे अडकलेत हे वास्तव आहे.
नगरसेवक हा तळागाळापर्यंत काम करणारा असतो आणि आपल्या प्रभागातील समस्यांचा चांगला अभ्यासक असतो. संसाराचा गाडा हाकण्यासाठी दोन चाके असणे गरजेचे असते. मुंबईकरांना सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पालिका प्रशासनाला लोकप्रतिनिधींची मदत ही फार महत्त्वपूर्ण असते. मात्र गेल्या काही वर्षांत ८० टक्के राजकारण व २० टक्के समाजकारण सुरु आहे. समाजकारण व राजकारण यात आता लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय अधिकारीही राजकारणाला पसंती देत आहेत. त्यामुळे नेते मंडळींसारख्या घोषणा करायच्या पण काम पूर्णत्वास नेईपर्यंत कोट्यवधी रुपयांचा चुराडा करायचा असे काही से चित्र मुंबई महापालिकेच्या कारभारात पहावयास मिळत आहे. परंतु तब्बल ९ वर्षांनंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या असून मुंबईत नवीन वर्षांत नवीन सरकार सत्तेत बसले आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या आशा पल्लवित झाल्या असून मुंबईकरांना दर्जेदार सुविधा मिळणार का..? याकडे लक्ष लागले आहे.
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नसून, ती राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारी महत्त्वाची लढत मानली जाते. यंदाच्या निवडणुकीत तर राजकीय खेळ मांडला गेला असून, अनपेक्षित युती, आरोप–प्रत्यारोप आणि सत्तासमीकरणांनी राजकारणाचा नवा पट उघडला आहे. सत्ताधारी महायुतीत भाजप, शिंदे गटाची शिवसेना, मनसे व ठाकरे सेना हे एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. वैचारिक मतभेद असूनही सत्तेसाठी आणि मुंबईवरील प्रभाव कायम राखण्यासाठी ही जवळीक निर्माण झाल्याचे चित्र होते. एकेकाळी परस्परांवर टीकेची झोड उठवणारे हे पक्ष आता ‘मुंबईसाठी एकत्र’ अशी भूमिका मांडत होते. यामुळे मतदारांमध्ये संभ्रम तर निर्माण झालाच आहे, पण राजकारणात तत्वांपेक्षा संधी महत्त्वाची ठरत असल्याचे अधोरेखित झाले आहे. दुसरीकडे, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती सामाजिक न्याय, वंचितांचे प्रश्न आणि महागाई, बेरोजगारी यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले गेले. अल्पसंख्याक, दलित आणि झोपडपट्टीवासीय मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्नही झाला. ठाकरे बंधूंच्या भूमिकेने या निवडणुकीत वेगळेच कुतूहल निर्माण केले होते.
या सगळ्या राजकीय हालचालींमध्ये आरोप–प्रत्यारोपांची मालिकाही सुरु होती. भ्रष्टाचार, विकास रखडल्याचे आरोप, सत्तेचा गैरवापर, प्रशासकीय अपयश अशा मुद्द्यांवरून राजकीय नेते एकमेकांवर टीका करत होते. मात्र हे आरोप किती अर्थपूर्ण आहेत आणि त्यातून मुंबईकरांच्या प्रश्नांना कितपत उत्तर मिळते, हा खरा प्रश्न आहे. एकूणच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खेळ मांडला गेला. युती–आघाड्या, वैचारिक तडजोडी आणि सत्ताकांक्षा यामुळे राजकारण रंगतदार झाले असले, तरी मुंबईकरांना अपेक्षा आहे ती पाणी, रस्ते, आरोग्य, वाहतूक आणि पारदर्शक प्रशासनाची. प्रशासनावर अंकुश ठेवणे, वेळोवेळी सहकार्य करणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी. त्यामुळे आता मुंबई महापालिकेत नवा अध्याय सुरु झाला असून मुंबईचा विकास, मुंबईकरांना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे यावर भर दिला जाईल, हीच मुंबईची माफक अपेक्षा आहे.
gchitre4@gmail.com