संपादकीय

स्वबळावर लढणे म्हणजे भाजपसाठी दुधारी तलवार

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांनी मुंबईमध्ये स्वबळावर लढण्याबद्दल जे विधान केले त्यावरून सध्या राजकीय वादंग माजले आहे.

नवशक्ती Web Desk

काऊंटर पॉइंट

- रोहित चंदावरकर

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांनी मुंबईमध्ये स्वबळावर लढण्याबद्दल जे विधान केले त्यावरून सध्या राजकीय वादंग माजले आहे. २०२९ मध्ये भाजपला खरेच स्वबळावर लढणे शक्य होणार आहे का? हा प्रश्न आहेच. पण तरीही भाजपने तसे ठरवल्यास त्याचे राजकीय परिणाम काय होतील, याचीच चर्चा सध्या सुरू आहे. यामागचे अमित शहा यांचे राजकारण काय आहे? हाही प्रश्न उपस्थित होत आहे.

महाराष्ट्रातील निवडणुकीच्या तयारीसाठी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेत्यांच्या आता महाराष्ट्र वाऱ्या सुरू आहेत. खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच वारंवार महाराष्ट्रात येताना दिसत आहेत. या आठवड्यात केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बातचीत करताना असे सांगितले की, २०२९ पर्यंत भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीला पोहोचलेला असेल. यामुळे काहीशी खळबळ उडाली. अमित शहा यांनी हे विधान का केले असावे? याबद्दल सगळीकडे चर्चा सुरू आहे.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला २०१४ मध्ये पहिल्यांदा लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळाले. हे बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक घेतली आणि त्यात त्यांनी निवडून आलेल्या खासदारांना असे सांगितले की, तुम्ही सर्वांनी आता आपापल्या राज्यात जाऊन शत-प्रतिशत भाजप या विषयावर काम करायचे आहे. याचा अर्थ मोदी यांनी असे आदेश दिले की, पुढच्या काही वर्षांत भारतीय जनता पक्षाची सत्ता ही एका हाती असली पाहिजे, विविध राज्यात वेगवेगळ्या छोट्या पक्षांबरोबर जी युती करण्यात आली आहे ती भविष्यात फार काळ कायम ठेवली जाऊ नये. पक्षाच्या या कल्पनेनुसार भाजप कार्यकर्ते कामाला लागले आणि २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीतच महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने शिवसेनेबरोबरची आपली युती तोडली. या गोष्टीला आता दहा वर्षे झाली आहेत आणि आता चित्र काय आहे? तर भारतीय जनता पक्षाने केवळ शिवसेनाच नव्हे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशीही युती केली आहे. म्हणजे शत-प्रतिशत भाजप हा अजेंडा काही फारसा यशस्वी झाला नाही, असे दहा वर्षांनी दिसते आहे.

या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात अमित शहा नागपूरला आले असताना त्यांनी सांगितले की, केवळ कमळ नव्हे तर धनुष्यबाण आणि घड्याळ ही सुद्धा आपली चिन्हे आहेत असे मानून कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे. पण पक्षातील तळागाळाच्या कार्यकर्त्यांमध्ये याबद्दल काहीशी अस्वस्थता दिसते आहे. कार्यकर्त्यांमधील ही भावना दिल्लीपर्यंत पोहोचल्यामुळेच या आठवड्यात महाराष्ट्रात झालेल्या आपल्या भाषणात अमित शहा यांनी आपली भूमिका पूर्णपणे बदलून २०२९ मध्ये पक्ष स्वबळावर लढेल अशा तऱ्हेची घोषणा केली. कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यासाठीच ही घोषणा करण्यात आली आहे, हे उघड आहे.

भारतीय जनता पक्ष खरोखरच स्वबळावर लढू शकेल का आणि त्याचे तसे प्लॅनिंग असल्यास आता ज्या मित्रपक्षांना बरोबर घेण्यात आले आहे त्यांची या सगळ्या धोरणाबद्दल काय प्रतिक्रिया असेल, याबद्दल मीडियामध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी दुसऱ्या दिवशी खुलासा केला की, अमित शहा यांनी केलेल्या विधानाचा सहयोगी पक्षांनी वेगळा अर्थ काढू नये आणि त्यांनी तसा तो काढलेलाही नाही. स्वबळावर लढण्याची घोषणा ही कार्यकर्त्यांचे मनोबल उंच ठेवण्यासाठी करण्यात आली होती. यावरून असे स्पष्ट दिसते की, स्वबळावर पक्षाने लढणे ही कल्पना कशी दुधारी तलवारीसारखी असू शकते. एका बाजूला बहुसंख्य कार्यकर्त्यांना निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी पक्षाने स्वबळावर लढण्याबद्दलची भूमिका घेणे ही या तलवारीची एक धार आहे असे मानले तर दुसऱ्या बाजूला मित्रपक्षांमध्ये या भूमिकेवरून नाराजीची भावना पसरणे ही या तलवारीची दुसरी बाजू आहे! म्हणजे कार्यकर्त्यांचे मनोबल उंच ठेवायचे ही एक बाजू की मित्रपक्षांना खूश ठेवायचे ही दुसरी बाजू. या दोन्ही बाजूंमधील तारेवरची कसरत कोणत्याही युतीमध्ये मुख्य पक्षाला करावी लागते.

भारतीय जनता पक्षाच्या जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेण्याबद्दल नाराजी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध असलेल्या काही प्रकाशनांमध्येही भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्याच्या संदर्भात नाराजी व्यक्त केली होती. या विषयावर स्पष्ट भूमिका घेताना गेल्या आठवड्यात अमित शहा यांनी नागपूरमध्ये बोलताना घड्याळ आणि धनुष्यबाण यासाठीही काम करावे असे सांगितले. पण कार्यकर्त्यांमधील नाराजीचा सूर कमी झालेला नाही याची जाणीव आता भाजपच्या नेतृत्वाला झाली आहे.

दुसरा विषय आहे तो हिंदुत्व या मुद्द्यावर किती कट्टर बनायचे हा. गेल्याच आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात १४ जागांवर ‘व्होट जिहाद’चा प्रकार झाला, असे सांगितले. त्यांनी वापरलेल्या या शब्दामुळे बराच वादंग झाला असला तरी त्यांच्या या बोलण्यातून भाजपला आपली कट्टर हिंदुत्वाची भूमिका कायम ठेवायची आहे, हे दिसून येते.

एका बाजूला भाजपने कट्टर हिंदुत्वाची भूमिका कायम ठेवायचे ठरवले असले तरी अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष राज्यातील अल्पसंख्यांक समाजाची मते मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. जिथे जिथे अल्पसंख्यांक मते आहेत त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार उभे करायचे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हिंदुत्वाशी फारशी सलगी नाही. ही स्थिती लक्षात घेता महायुतीमध्ये दोन्ही बाजूंनी राजकीय तणावाचे वातावरण तयार होऊ शकते. एका बाजूला भाजपच्या कार्यकर्त्यांना अजित पवारांच्या पक्षासाठी काम करणे अवघड वाटत आहे, तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांना भाजपची हिंदुत्वाची भूमिका अडचणीची वाटत आहे. अजित पवार यांनी अशी घोषणा केली आहे की, त्यांच्या पक्षातर्फे दहा टक्के जागा अल्पसंख्यांक समाजासाठी दिल्या जातील. अजित पवार यांचा फोकस हा पूर्णपणे अल्पसंख्यांक समाजाची मते मिळवण्यावर आहे. या परिस्थितीत अजित पवार यांचे धोरण आणि भाजपचे हिंदुत्वाचे धोरण यामध्ये विसंगती होणार नाही काय, हा सुद्धा मुद्दा आता चर्चेत आला आहे. शिवाय निवडणुकीची प्रक्रिया पार पडल्यानंतर अजित पवार यांना जर जास्त जागा मिळाल्या तर त्यांची भूमिका काय असेल? असाही प्रश्न चर्चेत आला आहे.

rohitc787@gmail.com

Maharashtra Assembly Elections 2024: जागावाटपापूर्वीच अजितदादांनी १७ जणांना दिले ‘एबी फॉर्म’

Maharashtra Assembly Elections 2024: नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध

विधानसभा निवडणुकीसाठी आज अधिसूचना; उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २९ तारखेपर्यंत मुदत

१ ते १९ नोव्हेंबरदरम्यान एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करू नका; खलिस्तानी दहशतवादी पन्नूची नवी धमकी

मुंबईत शिवसेना ठाकरे गट देणार 'हे' नवे चेहरे; मातोश्रीवर होणार अंतिम निर्णय