संपादकीय

‘ब्रॅण्ड’चा ‘बँड’ कोणी वाजवला?

उद्धव ठाकरे यांनी ‘ठाकरे ब्रॅण्ड’ संपवण्यासाठी बँड वाजवले जात असल्याचा आरोप केला. परंतु उद्धव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा उतरता आलेख सुरू झाला. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेवर उभा असलेला ‘ब्रॅण्ड’ उद्धव ठाकरेंच्या निर्णयांमुळे आणि भाजपशी ताटातूट केल्यामुळे कमजोर झाला.

नवशक्ती Web Desk

मत आमचेही

केशव उपाध्ये

उद्धव ठाकरे यांनी ‘ठाकरे ब्रॅण्ड’ संपवण्यासाठी बँड वाजवले जात असल्याचा आरोप केला. परंतु उद्धव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा उतरता आलेख सुरू झाला. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेवर उभा असलेला ‘ब्रॅण्ड’ उद्धव ठाकरेंच्या निर्णयांमुळे आणि भाजपशी ताटातूट केल्यामुळे कमजोर झाला.

भारतीय जनता पक्षाचे पूर्वाश्रमीचे मित्र श्रीमान उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच ‘ठाकरे ब्रॅण्ड’ संपवण्यासाठी काही बँड वाजत आहेत, अशा आशयाचे विधान आपल्या मुखपत्राला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. ‘उबाठां’ना कोट्या करण्याची विलक्षण हौस आहे. या कोट्या तिरकस, अर्थपूर्ण, मार्मिक असतात असं फक्त त्यांनाच वाटते. या हौसेपोटी त्यांनी ‘ब्रॅण्ड’ला बँडची जोड दिली आहे. मराठीच्या मुद्द्यावरून अलीकडेच झालेल्या मनोमिलन मेळाव्यात याच ‘उबाठां’नी ‘आमच्यातला अंतरपाट देवेंद्र फडणवीसांनी दूर केला’, असे वक्तव्य केल्यामुळे अनेकांना भोवळ आली होती. मराठी अस्मितेसाठी घेतलेल्या मेळाव्यात आपण भावाबरोबरच्या मनोमिलनासाठी अंतरपाट दूर झाला, यासारखे शब्दप्रयोग करून ‘उबाठां’नी त्यांच्या भाषा ‘प्रबोधना’साठी एखाद्या मराठी प्राध्यापकाची गरज आहे, हेच दाखवून दिले होते. असो. मुद्दा होता तो ‘उबाठां’च्या स्वयंघोषित ‘ब्रॅण्ड’चा.

वंदनीय बाळासाहेब ठाकरे हा जगन्मान्य ‘ब्रॅण्ड’ होता. वंदनीय बाळासाहेबांच्या बेधडक, स्पष्टवक्त्या स्वभावामुळे आणि ज्वलंत हिंदुत्वाशी कदापि तडजोड न करण्याच्या वृत्तीमुळे हा ‘ब्रॅण्ड’ तयार झाला होता. १९८०च्या दशकात वंदनीय बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा प्रखर पुरस्कार करत शिवसेनेचा राज्यभर प्रसार केला. राममंदिर आंदोलन, अयोध्येतील कारसेवा, त्यानंतर मुंबईत झालेले दंगे, १९९३ चे बॉम्बस्फोट या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर वंदनीय बाळासाहेबांचा ज्वलंत हिंदुत्वाचा ‘ब्रॅण्ड’ झळाळून उठला. या ‘ब्रॅण्ड’च्या झंझावातामुळे काँग्रेसच्या बेगडी धर्मनिरपेक्षतेची लक्तरे निघाली. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेतील युतीमागे हिंदुत्वाचा समान धागा होता. १९९२-१९९३ मध्ये मुंबईत झालेल्या दंगलीवेळी वंदनीय बाळासाहेबांनी घेतलेली निर्भीड भूमिका ‘सामना’च्या त्यावेळच्या अंकातून प्रकट झाली होती. १९९५ मध्ये भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत आले. भाजप-शिवसेना युतीच्या यशासाठी वंदनीय बाळासाहेबांनी महाराष्ट्रभर हिंडून जाहीर सभांच्या माध्यमातून झंझावात निर्माण केला होता.

श्रीमान उद्धव ठाकरे हे आपल्या पिताश्रींनी प्रचंड परिश्रमाने बांधलेल्या संघटनेत १९९५-१९९६ नंतर सक्रिय झाले. वंदनीय बाळासाहेब शिवसेना उभारणीसाठी आणि मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देत असताना उद्धव ठाकरे शिवसेनेत सक्रियही नव्हते. २००२-२००३ मध्ये उद्धवरावांनी संघटनेची सूत्रे स्वतःकडे ओढून घेतली. तेव्हापासून शिवसेनेच्या प्रभावाला ओहोटी लागली. बाळासाहेबांचा ‘ठाकरे ब्रॅण्ड’ तयार झाला तो त्यांच्या विश्वासार्हतेमुळे. १९९६ नंतर भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीची निर्मिती केली. देशभरातील अनेक प्रादेशिक पक्ष त्यात सहभागी झाले होते. बाळासाहेबांनी केंद्रातील सत्तेसाठी भाजप नेतृत्वाची कधीच अडवणूक केली नाही. बाळासाहेबांनी एखादा शब्द दिल्यावर त्यापासून ते मागे फिरत नसत. २००७ च्या आणि २०१२ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असूनही वंदनीय बाळासाहेबांनी प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना जाहीर पाठिंबा दिला. भारतीय जनता पार्टीच्या विरोधात भूमिका घेऊनही भाजप-शिवसेना युती कायम राहिली. याचे कारण बाळासाहेबांनी प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा देण्याबाबतची भूमिका अत्यंत स्पष्टपणे भाजप नेतृत्वाला कळवली होती. वंदनीय बाळासाहेब हयात असताना निवडणुकातील जागावाटपावरून त्यांचे भाजप नेतृत्वाशी काहीवेळा मतभेदही झाले. मात्र हे मतभेद तुटेपर्यंत न ताणण्याचा धोरणीपणाही बाळासाहेबांकडे होता.

या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या राजकीय कारकीर्दीकडे नजर टाकल्यावर काय दिसते? २००४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासून पक्षाची सर्व सूत्रे ‘उबाठां’कडे एकवटली. १९९० ते २००४ पर्यंत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनेचा संयुक्त प्रचार होत असे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे एकत्रित मेळावे होत असत. उद्धव ठाकरेंनी ही प्रथा बंद केली. तेव्हापासून शिवसेनेच्या उतरत्या भाजणीला सुरुवात झाली. २००५ मध्ये नारायण राणे यांच्यासारखा मोहरा जय महाराष्ट्र करीत शिवसेनेपासून विभक्त झाला. २००५ मध्ये दस्तुरखुद्द राज ठाकरे हेही शिवसेनेतून बाहेर पडले. या दोघांच्याही शिवसेनेतून बाहेर पडण्यास ‘उबाठा’च कारणीभूत होते. २००९ मध्ये ‘उबाठां’च्या नेतृत्वाखाली शिवसेनेला १६० पेक्षा अधिक जागा लढवूनही फक्त ४४ जागा मिळाल्या होत्या, तर ११७ जागा लढवून भारतीय जनता पार्टीने ४६ जागा जिंकल्या होत्या. त्या निवडणुकीत ‘उबाठां’च्या शिवसेनेला १६ टक्के, तर भाजपला १४ टक्के मते मिळाली होती. शिवसेनेची सूत्रे स्वतःकडे घेतल्यानंतर उद्धवरावांनी भाजप नेतृत्वाशी असलेले संबंध बिघडवून टाकले होते. केवळ वंदनीय बाळासाहेबांच्या आदरापोटी भाजप नेतृत्वाने या प्रकरणांशी जाहीर वाच्यता कधीच केली नाही.

२०१४ मध्ये १५-२० जागांसाठी ‘उबाठां’नी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीबरोबरची प्रदीर्घ युती संपुष्टात आणली. युती संपुष्टात आणून भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वावर सातत्याने असभ्य भाषेत टीका करणे चालू ठेवले. हे वर्तन सहन करून हिंदुत्वासाठी भाजप नेतृत्वाने शिवसेनेबरोबर सहकार्याचा प्रस्ताव ठेवला. तो प्रस्ताव मान्य करून राज्य सरकारमधल्या सत्तेत सहभागी झालेल्या उद्धव ठाकरेंनी भाजप नेतृत्वावर आणि केंद्र-राज्य सरकारविरोधात भूमिका घेणे चालूच ठेवले. बाळासाहेबांनी आपल्या हयातीत असा दुटप्पीपणा कधीच केला नव्हता. म्हणून त्यांच्या ‘ठाकरे ब्रॅण्ड’ला किंमत होती.

२०१९ मध्ये एकत्रित निवडणुका लढवूनही ‘उबाठां’नी विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीचा विश्वासघात करत राज्यातील सत्ता मिळवली. ही सत्ता आयुष्यभर आहे, असा भ्रम बाळगलेल्या ‘उबाठां’ना अडीच वर्षांत मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. बाकी कुणी बँड वाजवण्याऐवजी, खुद्द ‘उबाठा’ हेच ठाकरे ब्रॅण्डचे कर्दनकाळ ठरले आहेत, अशीच नोंद इतिहासात होईल.

मुख्य प्रवक्ते, प्रदेश भाजप

2006 Mumbai Local Train Blasts : हायकोर्टाच्या निर्णयाला महाराष्ट्र शासनाचे सुप्रीम कोर्टात आव्हान; २४ जुलैला सुनावणी

‘...तर तुमची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करू’; अमेरिकन सिनेटरचा भारताला इशारा, चीन आणि ब्राझिललाही धमकी

Kalyan : ''तुम्ही जरा थांबा'' बोलल्याने परप्रांतिय तरुणाकडून मराठी मुलीला बेदम मारहाण; शिवगाळ करत विनयभंग| Video

जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत कोण? 'ही' नावे चर्चेत, महाराष्ट्रातील नेत्याचं नावही आघाडीवर

दिव्या देशमुख, कोनेरू हम्पीची ऐतिहासिक भरारी! महिलांच्या विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत भारताकडून पहिल्यांदाच 'अशी' कामगिरी