संपादकीय

अस्थिर पाकिस्तान फुटीच्या मार्गावर?

बलुचिस्तान प्रांतात रेल्वेचे अपहरण आणि त्यानंतर पाक लष्करावर झालेला जबर हल्ला यामुळे पाकिस्तानातील अंतर्गत कलह, अस्थिरता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. दारिद्र्य आणि असंख्य समस्यांनी ग्रस्त असलेल्या पाकिस्तानचे विघटन होणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Swapnil S

- देश-विदेश

- भावेश ब्राह्मणकर

बलुचिस्तान प्रांतात रेल्वेचे अपहरण आणि त्यानंतर पाक लष्करावर झालेला जबर हल्ला यामुळे पाकिस्तानातील अंतर्गत कलह, अस्थिरता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. दारिद्र्य आणि असंख्य समस्यांनी ग्रस्त असलेल्या पाकिस्तानचे विघटन होणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

महागाई, दारिद्र्य, बेरोजगारी, निरक्षरता, कुपोषण, पायाभूत सोयीसुविधांचा अभाव, अस्वच्छता या आणि अशा कितीतरी समस्यांनी ग्रासलेल्या पाकिस्तानमध्ये दोन मोठे हल्ले झाले आहेत. त्यानिमित्ताने संपूर्ण जगाचे लक्ष पाककडे वळले आहे. पश्चिम पाकिस्तानातील बलुचिस्तान या प्रांतात हे हल्ले झाले आहेत. इराण आणि अफगाणिस्तानला लागून असलेला बलुचिस्तान हा प्रांत वाळवंटी आणि अत्यल्प सोयीसुविधा असलेला आहे. येथील ‘बलुच लिबरेशन आर्मी’ या बंडखोर गटाने सर्वप्रथम रेल्वेचे अपहरण केले. त्यानंतर पाक लष्कराच्या वाहनावर हल्ला केला. या दोन्ही घटना अतिशय महत्त्वाच्या आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या आहेत. शिवाय इतिहास काय सांगतो ते सुद्धा महत्त्वाचे आहे. त्यामुळे या सर्वाचा साकल्याने विचार होणे आवश्यक आहे.

भारत आणि पाकिस्तान हे देश स्वतंत्र झाले. त्यावेळी बलुच हा प्रांत पाकिस्तानात समाविष्ट होण्यास तयार नव्हता. त्यांना स्वतंत्र राहायचे होते, तर काही जाणकारांच्या मते बलुच प्रांताला भारतात सामील व्हायचे होते. मात्र, बलुच भागातील नागरिकांची मानसिकता, त्यांच्या इच्छा, भविष्यासाठीच्या त्यांच्या योजना यांचा सारासार विचार न करता पाकिस्तानने लष्करी कारवाईद्वारे बलुच प्रांत विलीन करून घेतला. सहाजिकच तेव्हापासून म्हणजेच १९४७ सालापासून बलुच प्रांतातील नागरिक हे असमाधानी आणि आपल्यावर झालेल्या अन्यायामुळे धुमसत आहेत. त्यातच हा प्रदेश वाळवंटी आहे. परिणामी, या भागाकडे पाकिस्तानने फारसे लक्ष दिलेले नाही. त्यामुळेच या भागात पायाभूत सोयीसुविधांचे जाळे घट्ट नाही. शिक्षण, आरोग्य यासह अन्य मूलभूत सेवाही येथे मिळत नाहीत. पाकिस्तानी राज्यकर्ते जाणीवपूर्वक बलुच प्रांताला अन्यायकारक वागणूक देतात, असा ठाम समज तेथील नागरिकांचा आहे. ही बाब तेथे बंडखोर गट स्थापन होण्यास कारणीभूत ठरली. वर उल्लेख केलेली संघटना ही त्यापैकीच एक. बलुच प्रांतात गरिबी, निरक्षरता, बेरोजगारी, महागाई अशा विविध समस्यांची तीव्रता पाकिस्तानातील अन्य प्रदेशांपेक्षा अधिक आहे. सहाजिकच सुजाण आणि आक्रमक बलुच नागरिक हे विविध सरकारी आकडेवारी आणि माहितीची कागदपत्रे सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आणत असतात. यातून पाकच्या सापत्न वागणुकीचे दाखलेही मिळतात. मात्र, या बंडखोरांना दाबून टाकल्याने सर्व काही ठीक होईल असा होरा पाकिस्तानी सत्ताधारी आणि लष्कराचा आहे. परंतु, विज्ञानाचा नियम काय सांगतो त्याकडेही पहायला हवे. स्प्रिंगसारखी एखादी वस्तू दाबली तर तिच्यावरील दबाव सोडल्यानंतर ती आधीपेक्षा अधिक मोठी होते किंवा उसळी घेते. बलुचिस्तानात सध्या तसेच घडते आहे.

जाफरा एक्स्प्रेसवर बलुच लिबरेशन आर्मीने (बीएलए) केलेला हल्ला आणि अपहरण हे काही एका रात्रीत घडलेले नाही. त्यामागे अत्यंत सुनियोजित तसेच अचूक अशी रणनीती आहे. हे अपहरण कसे घडले, त्यात किती जण मारले गेले यासह अन्य बाबींचे वृत्त प्रसारित झाले आहे. मात्र, पाक लष्कराला रेल्वेपर्यंत सहज पोहचता येऊ नये, अशा ठिकाणाची निवड बीएलएने केली होती. तसेच, बीएलएने या अपहरण आणि अन्य स्वरूपाचे जे व्हिडीओ प्रसारित केले त्यावरून कितीतरी बाबी स्पष्ट होत आहे. याउलट पाककडून दिल्या जाणाऱ्या माहितीचे समर्थन करणारे अधिकृत व्हिडीओ किंवा फोटो प्रसारित झालेले नाहीत. त्यामुळे या अपहरणात बीएलएला अधिक यश मिळाल्याचे सांगितले जाते. तसेच, या अपहरणनाट्याला काही दिवस उलटत नाही तोच बीएलएने पाक लष्कराच्या वाहनावर हल्ला केला. या हल्ल्यात पाक लष्कराचे जवळपास ९० जवान ठार झाल्याचे सांगितले जाते. अर्थात पाकने हे फेटाळून लावले आहे. मात्र, नक्की किती सैनिक ठार झाले ते सुद्धा जाहीर केलेले नाही. यावरून संशयाला प्रचंड वाव आहे.

अत्यंत कमी कालावधीत झालेले हे दोन आघात पाकिस्तान सरकार आणि लष्कर यांचे वाभाडे काढणारे आहे. मुस्कटदाबी करून राज्य चालविता येत नाही आणि असंतोषाचा स्फोट होतोच हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मुळात पाक सरकार आणि लष्कर यांना बलुच प्रांतात फारसे स्वारस्य नाही, असे बोलले जाते. वास्तविक पश्चिमेकडील हा प्रांत इराण आणि अफगाणिस्तान यांना जोडणारा आहे. त्याकडे जर दुर्लक्ष होत असेल तर देशाची सुरक्षा आणि स्वातंत्र्य यासाठी ती अधिक गंभीर बाब म्हणावी लागेल. अमेरिकन शस्त्रास्त्रे आणि अर्थसहाय्याच्या बळावर आतापर्यंत तगलेले पाकिस्तान आता प्रचंड अडचणीत सापडले आहे. कारण अमेरिकेने सर्व रसद थांबविण्याचे निश्चित केले आहे. ही बाब लक्षात घेत पाकने चीनला अधिक जवळ जाण्याची धडपड चालवली आहे. मात्र, चीनने बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत पाकमध्ये केलेली गुंतवणूक फारशी फलद्रुप ठरत नसल्याचे लक्षात येताच स्थगितीचे हत्यार उपसले आहे. ग्वादार बंदराच्या ठिकाणी चीनने कोट्यवधी रुपये ओतले आहेत आणि याच परिसरात बलुच बंडखोर सक्रिय आहेत. त्यांचा बीमोड करणे पाक लष्कराला अद्याप शक्य झालेले नाही. त्यातच बलुच बंडखोरांनी चिनी अभियंत्यांवरही हल्ले केले. त्यांना ठार केले. हे चीनच्या जिव्हारी लागले आहे. त्यामुळेच प्रधानमंत्री शाहबाज शरीफ यांना चीन दौऱ्यात खडेबोल ऐकावे लागले होते. आता बलुच बंडखोरांचा बीमोड करण्यासाठी चीनने लष्करी मदत करावी, अशी विनंती पाकने केल्याचे बोलले जात आहे. तसे झाले तर पाक लष्कराची नाचक्की तर होईलच, पण चीन त्याबदल्यात पाककडून काय वसूल करेल हे सांगता येत नाही. कदाचित बलुच प्रांतावर चीन कब्जा मिळवू शकतो. त्यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळण्याची चिन्हे आहेत.

पाकिस्तानी राज्यकर्ते आणि वरिष्ठ लष्करी अधिकारी यांचे मनसुबे देशहिताचे आहेत की, स्वहिताचे, असा प्रश्न पाकमधील जाणकार विचारत आहेत. लष्कराला आपल्या हातचे बाहुले असलेले सरकार हवे आहे, तर राज्यकर्त्यांना देशाऐवजी स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे, अशा प्रकारचे थेट भाष्य करणाऱ्या पोस्ट आता पाक नागरिकांकडून सोशल मीडियावर टाकल्या जात आहेत. पाकव्याप्त काश्मीर असो की खैबर पख्तुनख्वा, कुठेही आलबेल नाही. शिवाय ज्या दहशतवादी संघटनांना पाकने आजवर बळ दिले तेच आता त्यांना लक्ष्य करत आहेत. तालिबानचे उदाहरण तर सर्वांसमोरच आहे. पाकिस्तानमध्ये ठिकठिकाणी होणारे बॉम्ब हल्ले नित्याचेच झाले आहेत, तर बंडखोर गटांनी पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेला मोठे भगदाड पाडल्याचे सांगितले जाते. हे जर खरे असेल तर या सगळ्या पाकिस्तान फुटीच्या ठिणग्या ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. बलुच बंडखोरांनी आक्रमक हल्ले करून त्यास प्रारंभ केला आहे, असे म्हणता येईल. बलुच बंडखोरांना भारताची फूस आहे किंवा भारत हे घडवून आणतो आहे, असा आरोप पाक करीत असला तरी त्याचे कुठलेही पुरावे त्यांना देता आलेले नाहीत. बंडखोरांचा बीमोड करण्याची मानसिक तयारीही पाक लष्कर आणि सत्ताधाऱ्यांमध्ये नाही. त्यामुळे आगामी काळ पाकसाठी अतिशय कठीण राहण्याची शक्यता आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय पातळीवरही या सगळ्याचे काय पडसाद उमटतात, ते पाहणेही आवश्यक आहे. पाकिस्तानातील या सर्व बाबींकडे भारताला डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागेल. कारण, त्याचा परिणाम भारतावरही येनकेन प्रकारे होणारच आहे.

bhavbrahma@gmail.com

संरक्षण, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि पर्यावरणाचे अभ्यासक.

महादेवी हत्तीणीच्या स्थलांतराचे उच्च न्यायालयाचे आदेश; "क्रूर आणि निर्दय वागणूक" असल्याचे निरीक्षण

त्याने बोलावल्यावर हॉटेलमध्ये का जायचीस? रेपचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टाने फटकारले

जुनाट शस्त्रांनी आजची युद्धे कशी जिंकणार? आयात तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे धोक्याचे: CDS अनिल चौहान यांचे परखड मत

बुमराहने चौथी कसोटी खेळावी! संघाला गरज असताना विश्रांती घेणे चुकीचे; माजी क्रिकेटपटूंचे स्पष्ट मत

मंदिरात चोरी करायला गेला...पण, झोपेने घात केला! पुढे जे झालं ते...VIDEO व्हायरल