संपादकीय

ट्रम्प पर्वाचे प्रश्नोपनिषद!

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला आहे. अतिशय स्फोटक अशी प्रतिमा असलेले ट्रम्प पुन्हा सत्तेत का आले? सत्ताधारी कमला हॅरिस यांचा पराभव का झाला? ट्रम्प यांची ध्येयधोरणे काय असतील? आगामी काळात भारतासह जगभर काय परिणाम होतील? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

नवशक्ती Web Desk

देश-विदेश

भावेश ब्राह्मणकर

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला आहे. अतिशय स्फोटक अशी प्रतिमा असलेले ट्रम्प पुन्हा सत्तेत का आले? सत्ताधारी कमला हॅरिस यांचा पराभव का झाला? ट्रम्प यांची ध्येयधोरणे काय असतील? आगामी काळात भारतासह जगभर काय परिणाम होतील? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

जगातील बलाढ्य राष्ट्र असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प पुन्हा विराजमान होणार आहेत. अमेरिकनांनी दिलेला कौल स्पष्ट झाला आहे. सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाला जनतेने नाकारले आहे. ट्रम्प पुन्हा सत्तेत आले आहेत. ट्रम्प का आले, हॅरिस का पराभूत झाल्या, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

ट्रम्प यांना २९४ (५०.८ टक्के) तर हॅरिस यांना २२३ (४७.५ टक्के) इलेक्ट्राेरल मते मिळाली आहेत. विजयासाठी २७० मतांची आवश्यकता होती. हॅरिस यांच्यापेक्षा ३.२ टक्के अधिक मते मिळवून ट्रम्प यांनी परिवर्तन घडवून आणले आहे. सत्ताधारी पक्षाला पराभवाची धूळ का चाखावी लागली, याची अनेक कारणे आहेत. राष्ट्राध्यक्ष बायडन यांची प्रतिमा, त्यांचे वयोमान, त्यांचा कारभार हे सारे आहेच. पण अमेरिकेचे अध्यक्ष कमकुवत असल्याने त्याचे प्रचंड परिणाम अमेरिकन जनतेला भोगावे लागले, हे ठसविण्यात ट्रम्प यशस्वी ठरले. बायडेन यांनी पुन्हा उमेदवार म्हणून उभे राहण्याचा घेतलेला निर्णयही पक्षाच्या अंगलट आला. बायडन यांनी शेवटच्या क्षणी माघार घेत हॅरिस यांना चाल दिली. पण, ती बाब फारशी योग्य ठरली नाही. कमी कालावधीत स्वतःला सिद्ध करणे हॅरिस यांच्यासाठी अवघड बनले. विशेष म्हणजे, ट्रम्प हे गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने सत्ताधाऱ्यांवर आगपाखड करत असतानाच राष्ट्राध्यक्षपदासाठी आपण कसे योग्य आहोत, हे ठसविण्याचा प्रयत्न करत होते. अमेरिकन जनतेच्या भावना, अडी-अडचणींना साद घालतानाच जणू काही मी जादूची कांडी फिरवून सारे काही सूतासारखे सरळ करेन, हे सुद्धा त्यांनी बिंबविले. अमेरिकानांच्या रोजगारावर होत असलेला परिणाम, आक्रमण आणि वाढती महागाई यामुळे जनतेने ट्रम्प यांच्या पारड्यात मताचे दान टाकले. तसेच, ट्रम्प यांच्यावर झालेला जीवघेणा हल्ला हा सुद्धा कलाटणी देणारा ठरला. ट्रम्प यांच्या कानाला बंदुकीची गोळी लागली. रक्तस्त्राव झाला. कानाला पट्टी बांधलेली आणि त्याच्या आजूबाजूला असलेले रक्त अशा अवस्थेत ट्रम्प जनतेसमोर गेले. त्यांच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली. हॅरिस यांना कुठलीही संधी न देता ते आक्रमकपणे प्रचार करीत राहिले. हॅरिस या बाहेरच्या आहेत हे अमेरिकनांवर बिंबविणारी त्यांची खेळी परिवर्तन घडविणारी ठरली.

ट्रम्प यांच्या विजयाने अमेरिकनांचे सर्व प्रश्न चुटकीसरशी निकाली निघतील असे नाही. कारण, २०१७ ते २०२१ या काळात ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होते. मात्र, ट्रम्प यांच्या ध्येयधोरणांचा आणि निर्णयांचा मोठा परिणाम तेथे होणे अपेक्षित आहे. किंबहुना त्याचे धक्के देशोदेशी बसणार आहेत. अमेरिकेत रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. बाहेरच्या देशातील व्यक्ती येतात आणि स्थानिकांचा रोजगार हिसकावतात, हा तिथला कळीचा मुद्दा आहे. एच१बी व्हिसाद्वारे बाह्य देशातील कुशल कामगार, तंत्रज्ञ, इंजिनिअर, कर्मचारी हे अमेरिकेत वास्तव्य करतात. हाच मुद्दा अमेरिकेत आता पुन्हा एकदा ऐरणीवर येणार आहे. ट्रम्प यांनी यासंदर्भात कठोर निर्णय घेतला तर भारतासह अनेक देशातील तरुणांवर संक्रांत ओढावण्याची चिन्हे आहेत. केवळ नव्याने अमेरिकेत येणाऱ्यानांच नाही तर सध्या याच व्हिसावर तेथे वास्तव्य करत असलेल्यांवरही मायदेशी परत जाण्याची नामुष्की ओढावू शकते. महागाईने अमेरिकेला ग्रासले आहे. मिळकतीपेक्षा खर्च अधिक होत असल्याने नागरिकांचे आर्थिक संतुलन बिघडले आहे. परिणामी, आर्थिक आघाड्यांवर कठोर निर्णय ट्रम्प यांना घ्यावे लागतील.

ट्रम्प यांच्या विजयाने पर्यावरण विश्वातही खळबळ उडाली आहे. कारण, जागतिक हवामान बदलाच्या संकटाबाबत झालेला पॅरिस आंतरराष्ट्रीय करार ट्रम्प यांनी लाथाडून लावला होता. विशेष म्हणजे, याच महिन्यात अझरबैजान येथे ‘जागतिक हवामान परिषद’ (कॉप-२९) होत आहे. हवामान बदल ही समस्याच नाही आणि त्यास अमेरिका जबाबदार कशी? अशी ठाम भूमिका ट्रम्प यांनी यापूर्वीच घेतली आहे. त्यामुळे महासत्ता अमेरिकाच या परिषदेतून बाहेर पडली तर सारेच बारगळल्यात जमा होणार आहे. ही बाब वैश्विक पातळीवर चिंता वाढवणारी आहे. कारण, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अनेक अहवालांनी हवामान बदलाच्या तीव्रतेची आणि त्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची वेळ निघून गेल्याचे स्पष्ट केले आहे.

ट्रम्प यांच्या विजयाने सर्वात मोठा झटका बसला आहे तो चीनला. त्यांना याचा अंदाज आलाच होता. कारण, चिनी उत्पादनांसाठी अमेरिका ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती करायची असेल आणि स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून द्यायची असेल तर बाहेरच्या देशातून येणाऱ्या उत्पादनांना लगाम घालण्याचाच पर्याय उरतो. याच धोरणानुसार ट्रम्प यांनी चिनी उत्पादनांवर कठोर आयात शुल्क लावले तर ते चीनसाठी अवघड असेल. ही बाब लक्षात घेऊनच भारतीय बाजारपेठेत अधिकाधिक शिरकाव करण्यासाठी चीनने भारतासोबतचा सीमाप्रश्न तात्पुरता निकाली काढला आहे. सध्या चीनमध्ये महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराचा प्रश्न उग्र झाला आहे. ट्रम्प यांच्या धडाकेबाज निर्णयांनंतर चीन आणखी संकटात जाऊ शकतो.

ट्रम्प यांच्या ध्येय-धोरणांचा भारतावरही मोठा परिणाम अपेक्षित आहे. सद्यस्थितीत भारत-अमेरिका यांच्यात २०० अब्ज अमेरिकन डॉलर एवढा व्यापार होतो. अमेरिकन उत्पादनांवर भारताने लावलेले आयात शुल्क कमी करावे, अशी भूमिका ट्रम्प यांनी घेतली तर भारताला मोठ्या महसुलावर पाणी सोडावे लागू शकते. त्याचा परिणाम देशातील विकासकामे आणि विविध घटकांवर होणार आहे. अमेरिकन उत्पादनांच्या मूल्यावर परिणाम झाल्याने देशांतर्गत उद्योग आणि व्यवसायालाही फटका बसणार आहे. संरक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान आदी क्षेत्रात भारताला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत.

रशिया-युक्रेन, इस्रायल विरुद्ध हमास, लेबनॉन, इराण या युद्धांना पूर्णविराम देण्याचे आश्वासन ट्रम्प यांनी दिले आहे. त्यात ते यशस्वी होतात की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे. तसेच ट्रम्प गर्भपातावर बंदी घालण्याचीही शक्यता आहे. त्यावेळी तिथल्या स्त्रीवादी चळवळीची भूमिका काय असेल, हा प्रश्न आहेच.

ट्रम्प यांच्या विजयानंतर देशोदेशीच्या शेअर बाजारांवर परिणाम दिसून आला आहे. यापुढील काळात ट्रम्प हे रौद्र रूप दाखवितात की दूरगामी विचार करून निर्णयांचे बीज रोवतात हे लवकरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, देशाला पहिली महिला अध्यक्ष देण्याची, इतिहास घडविण्याची संधी अमेरिकनांनी गमावली आहे.

bhavbrahma@gmail.com

लेखक संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी व पर्यावरणाचे अभ्यासक असून मुक्त पत्रकार आहेत.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या