संपादकीय

अध्यात्माचा खरा अर्थ!

अध्यात्माच्या नावाने केवळ अंधश्रद्धाच पसरवल्या जातात असे नाही, तर त्याचा व्यापार मांडून श्रद्धांनाही वेठीस धरले जाते. अध्यात्माचा संकुचित विचार करून समाजविघातक गोष्टी घडवून आणल्या जातात. अध्यात्म या शब्दाचे समाजाचे आकलन कमी आहे. म्हणूनच अध्यात्माचा खरा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे.

नवशक्ती Web Desk

भ्रम -विभ्रम

डॉ. अस्मिता बालगावकर

अध्यात्माच्या नावाने केवळ अंधश्रद्धाच पसरवल्या जातात असे नाही, तर त्याचा व्यापार मांडून श्रद्धांनाही वेठीस धरले जाते. अध्यात्माचा संकुचित विचार करून समाजविघातक गोष्टी घडवून आणल्या जातात. अध्यात्म या शब्दाचे समाजाचे आकलन कमी आहे. म्हणूनच अध्यात्माचा खरा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे.

अध्यात्म ही मन शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे. खरे पाहता अध्यात्म ही एक वैश्विक संकल्पना असून कोणत्याही एका धर्म किंवा पंथाशी ती संबंधित नाही. अनेक लोक देव-धर्म आणि अध्यात्म यात गफलत करतात. ‘अध्यात्म’ या शब्दाची फोड अधि म्हणजे शरीर व त्यात वास असणाऱ्याचे अयन करणे म्हणजे शिकणे ते अध्यात्म. म्हणजे स्वतःला जागृत करून ‘स्व’ला जाणून घेण्याची ही प्रक्रिया आहे. स्वतःमधील दोष-विकार निघून जावेत आणि नैतिक गुण उजळावेत यासाठी साधना करणे म्हणजे अध्यात्म. भौतिक सुखाच्या पलीकडे खरे जीवन आहे, जे अनंत पटीने मोलाचे आहे. सर्वच धर्म हे आपल्याला माणुसकी, सदाचार, संयम, करुणा, दया यांची शिकवण देतात. म्हणून विनोबा भावे म्हणतात की, सर्व धर्माचे अध्यात्म एकच आहे.

अनेकजण अध्यात्माचा हेतू हा ईश्वराची प्राप्ती हा आहे, असे मानतात. मग तो ईश्वर आपल्या अंतर्मनातला असेल, निसर्गामधील असेल किंवा तो जनतेत म्हणजे जनतारूपी पण असू शकतो. माणसाला संवेदनशील माणूस बनवणे, दैनंदिन जीवनात होणाऱ्या कष्टांपासून आराम मिळून जीवन आनंदमयी करणे हे अध्यात्माचे उद्दिष्ट असते. निसर्गातील प्रत्येक प्राणिमात्रात, सजीवात, जीवसृष्टी यामध्येही ईश्वर आहे. विनोबाजी म्हणतात की, “मी १२ वर्षे संपूर्ण भारतात दोन वेळा पदयात्रा केली. त्यामुळे मला जनताजनार्दनाच्या रूपातील ईश्वराचे दर्शन झाले. अन्यथा माझी आध्यात्मिकता अपूर्ण राहिली असती.”

आजकाल आपल्याला असे अनेक लोक भेटतात ज्यांच्यासाठी अध्यात्म म्हणजे कोणत्याही एका देवाचे नाव घेणे असते. मात्र त्याचा आपल्या दैनंदिन जीवनात कुठेही उपयोग न करता, चांगल्या विचारांचा वापर न करता फक्त थोडासा वेळ आध्यात्मिक पुस्तक वाचणे, एखादा मंत्र १०० वेळा लिहिणे किंवा म्हणणे, एखादे व्रत स्वतः करून पुढे पाचजणींना ते करण्यास प्रवृत्त करणे, एवढ्यापुरतेच अध्यात्म मर्यादित असते. अध्यात्माचा चुकीच्या पद्धतीने वापर करून मनःशांती मिळवण्याचा हा एक ढोंगीपणा आहे.

अध्यात्माचा वापर आधुनिक काळात व्यक्तिमत्त्व विकासासाठी, सकारात्मक विचार, मानवता व प्रेमाचा संदेश देण्यासाठी, करुणा-दया-क्षमा-शांती यांचा प्रचार व प्रसार करून समाजातील, देशा-देशातील तंटे सोडवण्यासाठी होऊ शकतो. परंतु अनेकदा अध्यात्माचा अत्यंत संकुचित विचार करून चुकीच्या आणि समाजविघातक गोष्टी घडवून आणल्या जातात. मन:शांतीसाठी लोक अध्यात्माचा आधार घेतात इथपर्यंत ठीक आहे. परंतु प्रत्येक प्रश्नावर अध्यात्म हे काही उत्तर नाही. पण ते वर सांगितल्याप्रमाणे करायला सोपे असल्याने आणि तो शॉर्टकट वाटत असल्याने अनेकजण एकीकडे असंख्य पापे करून दुसरीकडे पळवाट म्हणून आध्यात्मिक असल्याचे नाटक करतात. याने मूळ प्रश्न सुटत नाहीत आणि मन:शांती तर अजिबात मिळत नाही. अनेकजण पूजाअर्चा-व्रत-मंत्र या अध्यात्माच्या चुकीच्या कल्पनेत इतके गुरफटून जातात की, ते मानसिक रुग्ण बनतात. याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे दिल्ली, बुरारी येथील एकाच कुटुंबातील ११ जणांनी केलेली सामूहिक आत्महत्या.

अनेक बुवा-बाबा अध्यात्माच्या नावावर देव-धर्म याचाच बाजार मांडतात. मग त्यांचे फोटो, पुस्तके, माळा, कपडे, इत्यादींचे दुकानही तिथे तयारच असते. वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा-दीक्षा-दर्शन इत्यादीसाठी वेगवेगळे दर ठरवले जातात. एक प्रकारे आर्थिक पिळवणूकच होत असते. जर जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी देव आहे, तर आपण आपल्या कामातच देव पाहिला पाहिजे, निसर्गात देव पाहिला पाहिजे, माणसात देव पाहिला पाहिजे. मात्र काही लोक सगळी कामं आणि जबाबदाऱ्या सोडून फक्त अध्यात्माच्या मागे लागतात. अशा वेळी त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबीयांचे हाल होतात.

अध्यात्म हे आपणास भौतिक सुखाच्या मागे लागू नका, असे सांगते. पण आपण पाहतो की, आध्यात्मिक कार्यक्रम घेणारे अनेक बाबा-माता सुंदर महागडी वस्त्रे घालत असतात, पंचपक्वान्नाचे जेवण जेवत असतात, संगमरवरी महालात राहत असतात, विमानाने फिरत असतात, कोट्यधीश असतात. अध्यात्माचे व धर्मभावनेचे व्यापारीकरण, बाजारीकरण, विकृतीकरण व राजकारण करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू असतो. अनेकदा अध्यात्माचा वापर करून धार्मिक कट्टरता वाढवली जाते, विचारात एककल्लीपणा निर्माण करून अंधभक्त निर्माण केले जातात. मन:शांतीसाठी कोणत्याही नवग्रह यंत्र, पिरामिड, कुंडलिनी योग, सुदर्शन क्रिया, नाम-जप याची अजिबात गरज नसते. गरज असते तर ती विवेकाधिष्ठित नीतीने जगण्याची. आध्यात्मिक बुवाबाजी चालू राहण्यासाठी प्रत्यक्षात एका बाजूला माणसाचा विवेक हरवणे आणि दुसऱ्या बाजूला एक कडवे शिस्तबद्ध, आक्रमक संघटन उभे करणे असा एक व्यूह तयार केला जातो. याचा ना अध्यात्माशी संबंध असतो, ना माणसाच्या मानसिक विकासाशी संबंध असतो.

सध्याच्या काळात आधुनिकता, विज्ञान प्रसार यांना अजिबात न जुमानता समाजात विविध प्रकारच्या अंधश्रद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. मग दीडशे लोक चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेली ती हाथरसची दुर्घटना असो किंवा कुंभमेळ्यात चिरडून मृत्युमुखी पडलेले नागरिक असोत. दरवर्षी अशा कित्येक घटना आपण पाहतो. पण तरीही अशा घटनेतून आपण काहीही शिकत नाही आणि पुन्हा पुन्हा असे लोक बळी जात राहतात.

अध्यात्माच्या नावे अनेक भ्रामक कल्पना रुजवल्या जातात. चुकीच्या लोकांना आध्यात्मिक मानले जाते. अध्यात्म या शब्दाचे समाजाचे आकलन अपुरे आहे, हे यातून दिसून येते. सध्या आध्यात्मिक गुरू म्हणून प्रचलित असणाऱ्या अनेक लोकांचे वागणे अतिशय आलिशान असते. प्रचंड मालमत्ता जमा झालेली असते. ती पद्धतशीरपणे अगदी मूठभर व्यक्तींच्या हातात केंद्रित झालेली असते. अगदी थोडी समाजोपयोगी कामे करून जणू काही फार मोठी सत्कृत्ये केल्याचे दावे ही मंडळी करत असतात. समाज व्यवस्थेतील परिवर्तनाबद्दल ते कधीही काहीही बोलत नाहीत. बेकारी, महागाई, भ्रष्टाचार, जातीयता, धर्मांधता, विषमता, स्त्रीभ्रूण हत्या हे त्यांचे विषयच नसतात.

याउलट भारतात महात्मा गांधी, विनोबा भावे, राष्ट्रसंत गाडगेबाबा अशा खऱ्याखुऱ्या आध्यात्मिक लोकांची परंपरा दिसून येते. महात्मा गांधी म्हणायचे, मी सनातन हिंदू आहे. पण त्यांनी जाती-धर्मावरून समाजात कधीही भांडणे लावली नाहीत. सामाजिक शांतता, सलोखा, बंधुभाव, प्रेम, अहिंसा इत्यादी गोष्टींची शिकवण त्यांनी दिली. याउलट आता स्वतःला आध्यात्मिक म्हणवून घेणारे अनेक लोक जाती-धर्मात तेढ निर्माण करून सामाजिक शांतता भंग करतात. त्यामुळे अध्यात्माचा खरा अर्थ समजून घेऊया आणि विवेकी जीवन जगूया.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या

SRA चा कॉर्पस फंड १ लाख! झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचा प्रस्ताव; इमारतींच्या उंचीप्रमाणे रकमेत होणार वाढ

डायग्नोस्टिक लॅब्ससाठी नवीन कायदा; चाचण्यांची अचूकता व विश्वासार्हता राखण्यासाठी सरकारचे पाऊल

...तर ओला, उबरवर कारवाई

‘सावरकर सदन’ला वारसा स्थळाचा दर्जा; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश

एलॉन मस्क यांची संपत्ती ५०० अब्ज डॉलरवर; जगातील पहिलेच उद्योगपती ठरले