मत आमचेही
ॲड. हर्षल प्रधान
महाराष्ट्राच्या आजच्या राजकारणाला अगदी अलीकडच्या घडामोडींना पाहिल्यावर ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?’ या गीतातील ओळींचा मतितार्थ तंतोतंत लागू पडतो. भाजपच्या आजपर्यंतच्या राजकीय वाटचालीत त्यांनी असेच अनेक पहिली हळी देणाऱ्यांचाच बळी घेतला आहे. सत्ता मिळवण्यासाठी साम, दाम, दंड, भेद सर्व काही वापरले. ‘स्वार्थासाठी वापरा आणि त्याचे काम संपले की फेकून द्या’, हेच या भाजपचे राजकारण असल्याचे इतिहासात डोकावले की सहज जाणवेल.
देई कोण हळी त्याचा, पडे बळी आधी,
म्हणती हे वेडे पीर, तरी आम्ही राजे!
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?
साधारण १९७४ च्या कालावधीत आलेला विजय तेंडुलकर यांची पटकथा व संवाद असलेला आणि जब्बार पटेल यांच्या पहिल्यावहिल्या दिग्दर्शनातला ‘सामना’ हा मराठी सिनेमा आज किती लोकांच्या स्मरणात असेल? त्याच सिनेमातील “कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे” ही आरती प्रभू यांची कविता आज आठवली. भास्कर चंदावरकर यांच्या संगीताने त्या सिनेमातील सगळीच गाणी अजरामर केली होती. त्या कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे गाण्यातील या दोन ओळी आठवल्या, “देई कोण हळी त्याचा, पडे बळी आधी, म्हणती हे वेडे पीर, तरी आम्ही राजे!” महाराष्ट्राच्या आजच्या राजकारणाला या अगदी अलीकडच्या घडामोडींना पाहिल्यावर त्या ओळीतील मतितार्थ तंतोतंत लागू पडतो. भाजपच्या आजपर्यंतच्या राजकीय वाटचालीत त्यांनी असेच अनेक पहिली हळी देणाऱ्यांचाच बळी घेतला आहे.
भारतीय जनता पक्ष खऱ्या अर्थाने अस्तित्वात आल्यापासून म्हणजे १९८०पासून आज २०२४ पर्यंत त्यांना पूर्ण बहुमत असे फार कमी राज्यात मिळाले. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. पण त्यांनी चिकाटीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने छोटी-छोटी राज्ये हस्तगत करत हळूहळू आपला भारतातील प्रत्येक राज्यावर राजकीय पगडा तयार केला. त्यासाठी त्यांनी साम, दाम, दंड, भेद सर्व काही वापरले. प्रसंगी त्यांच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येकाला बाजूला सारले नव्हे अक्षरशः चिरडले, असे म्हटले तर वावगे ठरू नये. या चार दशकात भाजपने ना आपल्या कार्यकर्त्यांचा विचार केला ना त्यांना मदत करणाऱ्या इतर पक्षातील सहकाऱ्यांचा. वापरा आणि फेका हीच त्यांच्या राजकीय व्यूहरचनेतील एक प्रमुख नीती राहिली. फक्त सत्ता हेच एक मुख्य लक्ष समोर ठेवून त्यांनी सत्ता हस्तगत करण्यासाठी वाट्टेल ते केले आणि त्यात ते यशस्वीही झाले. या काळात किती मारुती कांबळेंचा बळी गेला आणि किती मास्तरांना लढा द्यावा लागला हे अतिशय रंजक असल्याचे भाजपच्या इतिहासात डोकावले की सहज लक्षात येईल.
भाजप आणि सहयोगी पक्षांचा युतीचा इतिहास बघता शिवसेना व अकाली दल वगळता इतर सर्व पक्ष भाजपची केंद्रातली सत्ता गेल्यावर भाजपला सोडून गेले. शिवसेना भाजपसोबत सत्ता नसतानाही राज्यात, केंद्रात सोबत होती. याउलट भाजपचा इतिहास पाहिला, तर भाजपप्रणीत ‘एनडीए’तून २००२ ते २०१४ या १२ वर्षांच्या काळात काही मतभेदांमुळे १४ पक्ष बाहेर पडले. एनडीएत आजघडीला १७ पक्ष असले, तरी त्यापैकी किती पक्षांना भाजप किंमत देते हा संशोधनाचा विषय आहे. इतकेच नव्हे, तर भाजपमध्ये असलेल्या भाजपच्या नेत्यांना तरी आज कुठे महत्त्व आहे? ना बोलण्याचे स्वातंत्र्य ना विचार करण्याचे. नुसते ‘हो ला हो’ करणारेच आज पुढे आहेत.
जिसको लिया साथ उसकाही किया सुपडा साफ
नरेंद्र मोदी गुजरातमध्ये केशुभाई पटेलांना गुरू म्हणत, महाराष्ट्रात आले की शरद पवारांना गुरू म्हणत. केशुभाई पटेल यांचे मुख्यमंत्रीपद मोदींनी घालवले, शंकरसिंह वाघेला, संजय जोशी आणि केंद्रात लालकृष्ण अडवाणी अशी भाजपअंतर्गत अनेक नावे आहेत ज्यांना मोदींनी अडगळीत टाकले. मोदींचे राजकीय यश त्यांच्या अनेक वर्षांच्या त्याग आणि मेहनतीवर उभे आहे. ज्यांनी पक्ष आणि विचारांसाठी हालअपेष्टा सहन केल्या आणि पक्ष वाढवला मोदींनी त्यांनाच बाजूला केले. प्रवीण तोगडिया हे त्यापैकीच एक नाव जे राजकारणापासून लांब होते. स्वत:च्या उत्कर्षात जो कोणीमध्ये आला त्या प्रत्येकाला मोदींनी कटकारस्थान करून बाजूला केले. पटेल समाजाचे नेतृत्व बाजूला केले म्हणून मोदींनी काँग्रेस विचारधारेच्या सरदार वल्लभभाई पटेलांचा राजकीय वापर केला. थोडक्यात काय, तर जे मोदी भाजपच्या निष्ठावानांचे झाले नाहीत, स्वत:च्या राजकीय गुरूंचे, सहकारी बांधवांचे झाले नाहीत, संघाचे झाले नाहीत, ते इतरांना देशभक्तीविषयी सांगतात. मोदी भाजपचे नाहीत, तर भाजप मोदींचा झाला आहे.
भाजपचा फसवणुकीचा इतिहास
म. गोमांतक पक्ष, मेहबूबा मुफ्ती, मायावती, ममता बॅनर्जी, नितीशकुमार, हरयाणा बिश्नोई, कर्नाटक कुमारस्वामी अशा अनेकांशी भाजपने युती केली. पासवान यांच्या मुलाची फसवणूक करून २०१४च्या लोकसभा निवडणुकीत युती केली; मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युती तोडली. २०१९मध्ये शिवसेनेला निवडणुकीनंतर सत्तेत समसमान वाटा देण्याचे शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत आश्वासन देण्यात आले. शिवसेना आणि अकाली दल जुने सहकारी असूनही पाठीत वार केले. २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पाडली, चिन्ह गोठवले. अकाली दल १९९८ ते २०२० दरम्यान भाजपबरोबर एनडीएचा भाग होता. कृषी कायद्यांविरोधात अकाली दल बाहेर पडला. आपल्याच मित्रांना केले साफ हाच आहे भाजपचा इतिहास. भाजपचा इतिहासच ज्याची गरज त्याला प्राधान्य असा राहिला आहे. भाजपसोबत जे-जे गेले त्यांना संपवण्याचा कार्यक्रम भाजपने राबवला. ‘गरज सरो वैद्य मरो’, ‘स्वार्थासाठी वापरा आणि त्याचे काम संपले की फेकून द्या’, हेच या नव्या भाजपचे राजकारण असल्याचे इतिहासात डोकावले की सहज जाणवेल. आजपर्यंत भाजपसोबत युती केलेले पक्ष पाहा आणि आठवा ते सध्या कुठे आहेत.
म. गो. पक्ष युती, मेहबूबा मुफ्ती यांच्याशी युती, मायावतींच्या पक्षाशी युती, ममता बॅनर्जींशी युती, नितीशकुमार यांच्याशी युती, हरयाणात बिश्नोई यांच्याशी युती, कर्नाटकात एच. डी. कुमारस्वामी यांची फसवणूक करणारी युती, पासवान यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाची फसवणूक, खासदार चिंतामण वनगा, खासदार मनोहर पर्रिकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या परिवाराची वाताहत करणारी भाजपच होती. मग बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर ते उद्धव ठाकरेंना कसे सोडतील; मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यांचा डाव ओळखला आणि धोबीपछाड दिला, म्हणून त्यांच्याच शिलेदारांना फोडून उन्मत्तपणे ‘आम्ही बदला घेतला’ अशी विधाने करणारी ही भाजप पाहिली की त्यांच्या कार्यपद्धतीबाबत कोणतीही शंका राहत नाही. बाळासाहेब असेपर्यंत अतिशय गोड वागणारे भाजपचे नेते बाळासाहेब कैलासवासी झाल्यावर मात्र एकदम पलटले, शिवसेना संपवा आणि महाराष्ट्र काबीज करा या हेतूने झपाटले आणि त्यातूनच पुढील कारवाया झाल्या. २०१४ लोकसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेशी युती केली, मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युती तोडली. त्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी एकट्याच्या जीवावर ६३ आमदार निवडून आणले, तेव्हा भाजपला जाणवले की उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे खरे वारसदार आहेत आणि महाराष्ट्रात जनता उद्धव ठाकरे यांनाच महत्त्व देत आहे. कदाचित तेव्हाच हा उद्धव ठाकरे यांचे महत्त्व कमी करण्याचा डाव आखला गेला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेला निवडणुकीनंतर सत्तेत समसमान वाटा देण्याचे आश्वासन दिले गेले आणि नंतर त्याला सोयीस्कर वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्या. शिवसेना, भाजप आणि सहयोगी पक्षांचा युतीचा इतिहास बघता शिवसेना व अकाली दल वगळता इतर सर्व पक्ष भाजपची केंद्रातली सत्ता गेल्यावर भाजपला सोडून गेले. सत्ता नसतानाही शिवसेना भाजपसोबत राहिली होती. शिवसेनेने भाजपची साथ सोडली तेव्हा भाजपकडे अनेक राज्यांत सत्ता आणि केंद्रात सत्ता होती. मायावती, जयललिता, ममता बॅनर्जी, एच. डी. कुमारस्वामी, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष अशी अनेक उदाहरणे देता येतील.
मारुती कांबळेचे काय झाले?
राजकीय भ्रष्टाचार आणि सामाजिक शोषणाच्या धाडसी शोधासाठी सामना हा सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीत अजरामर झाला. सहकारी साखर लॉबीच्या राजकारणाचे आणि ग्रामीण महाराष्ट्रातील उपेक्षित समुदायांचे शोषण या चित्रपटात दाखवले गेले. चित्रपटाचे दमदार संवाद, निळू फुले आणि श्रीराम लागू यांच्या दमदार अभिनयाची खूप प्रशंसा झाली. मारुती कांबळेचे काय झाले? हा प्रश्न याच चित्रपटापासून प्रसिद्ध झाला. आजही एखादा क्लिष्ट विषय समोर असला की, त्याबाबतीत मारुती कांबळेचे काय झाले? असे विचारले जाते. सध्याच्या परिस्थितीत भाजपच्या राजकारणाची पद्धत पाहता त्यांनी असे कितीतरी मारुती कांबळे गायब केले असतील. महाराष्ट्रातील राजकीय अडचणींचे मूळ, “देई कोण हळी त्याचा, पडे बळी आधी, म्हणती हे वेडे पीर, तरी आम्ही राजे!” या दोन ओळींमध्येच दडले आहे. म्हणूनच आज कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? हा प्रश्न जनसामान्यांना सतावत आहे.
लेखक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख आहेत.