भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा ८ जून २०२५ रोजी लखनऊमधील सेंट्रुम हॉटेलमध्ये पार पडला.या साखरपुडा समारंभात केवळ ३०० निवडक पाहुणे आमंत्रित होते. या पाहुण्यांमध्ये राजकीय आणि क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजांचा समावेश होता. समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, खासदार डिंपल यादव, ज्येष्ठ अभिनेत्री आणि जया बच्चन, बीसीसीआयचे उपाध्यक्ष आणि काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांच्यासह इतर अनेक उच्चपदस्थ मान्यवर उपस्थित होते. साखरपुड्याचे फोटो आणि बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. रिंकू सिंगने साखरपुड्याच्या आधी आपल्या लहान बहिणीसोबत मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले. देवाचे आशीर्वाद घेऊन रिंकूने आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली. २७ वर्षीय रिंकूने अलिकडच्या काही वर्षांत २ एकदिवसीय आणि ३३ टी-२० सामन्यांत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सचा तो नामवंत खेळाडू आहे. २६ वर्षीय प्रिया ही जौनपूरमधील मछलीशहर मतदारसंघातून पहिल्यांदाच खासदार झाली आहे.१८ नोव्हेंबरला हे जोडपे विवाहबंधनात अडकणार आहे. वाराणसी येथील हॉटेल ताज येथे हा विवाहसोहळा पार पडणार आहे. जागतिक क्रिकेटमधील नामवंत व्यक्ती, बॉलिवूडमधील कलाकार, व्यावसायिक आणि राजकारणी व्यक्ती यांना या सोहळ्याचे आमंत्रण दिले जाणार आहे.