(Photo- Instagram/@rheakapoor)
फोटो

Sonam Kapoor Photos : कलेचा वारसा अन् फॅशनचा नवा साज; सोनम कपूरच्या लूकमध्ये ९० वर्षांपूर्वीच्या कलाकृतीची झलक

हाताने रंगवलेली शिफॉनची साडी, मखमली कोट आणि तब्बल ४०० कॅरेटहून अधिक वजनाचे पाचूचे दागिने यामुळे तिचा हा लूक विशेष चर्चेत राहिला.

किशोरी घायवट-उबाळे

फॅशनच्या बाबतीत नवनवीन प्रयोग करण्यासाठी अभिनेत्री सोनम कपूर ओळखली जाते. एखाद्या कार्यक्रमात तिचा लूक नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. मुंबईत पार पडलेल्या सहाव्या वार्षिक 'अर्थशॉट प्राईज' सोहळ्यातही सोनमने आपल्या हटके अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

यावेळी तिने नेहमीच्या ग्लॅमरस लूकपेक्षा भारतीय कला आणि इतिहासाशी नाते सांगणारा पोशाख निवडला होता. प्रसिद्ध चित्रकार अमृता शेरगिल यांच्या १९३६ मधील चित्रातून तिच्या या लूकची प्रेरणा घेण्यात आली होती. हाताने रंगवलेली शिफॉनची साडी, मखमली कोट आणि तब्बल ४०० कॅरेटहून अधिक वजनाचे पाचूचे दागिने यामुळे तिचा हा लूक विशेष चर्चेत राहिला.

अमृता शेरगिल यांच्या चित्रातून साकारला खास लूक

या सोहळ्यासाठी सोनमने प्रसिद्ध फॅशन डिझायनर अनामिका खन्ना यांनी डिझाइन केलेला खास पोशाख परिधान केला होता. तिची बहीण रिया कपूर हिने या संपूर्ण लूकची स्टायलिंग केली होती.

या पोशाखाची संकल्पना अमृता शेरगिल यांच्या १९३६ मधील 'सुमैर' या चित्रावर आधारित होती. या चित्रात शेरगिल यांनी त्यांची चुलत बहीण सुमैर अपजित सिंह यांचे व्यक्तिचित्र रेखाटले होते.

या चित्रात सुमैर यांनी गडद हिरव्या रंगाची साडी नेसली असून, त्यांच्या हातात पांढऱ्या फुलांचा गुच्छ दिसतो. भारतीय आणि पाश्चात्त्य संस्कृतींचा संगम या चित्रातून पाहायला मिळतो. याच कलात्मक संकल्पनेला आधुनिक फॅशनची जोड देत सोनमचा हा लूक तयार करण्यात आला.

रिया कपूरने दिलेल्या माहितीनुसार, अमृता शेरगिल यांचा भारतीय आणि हंगेरियन असा मिश्र सांस्कृतिक वारसा होता. त्यांनी पॅरिसमध्ये कलेचे शिक्षण घेतले. मात्र, पुढे भारत हेच त्यांचे घर आणि कलात्मक प्रेरणास्थान बनले.

जवळपास नऊ दशकांपूर्वीच्या चित्रातील रंगसंगती आणि सौंदर्याचा आधार घेत अनामिका खन्ना यांनी सोनमसाठी खास पोशाख तयार केला. सोनमने हिरव्या रंगाच्या विविध छटांनी हाताने रंगवलेली शुद्ध शिफॉनची साडी नेसली होती.

या साडीसोबत तिने सिल्क व्हेल्वेटचा आकर्षक कोट परिधान केला होता. कोटच्या कडांवर केलेले नाजूक जरदोजी नक्षीकाम विशेष लक्षवेधी ठरले. त्यामुळे पारंपरिक साडीला आधुनिक पाश्चात्त्य फॅशनची जोड मिळाली.

४०० कॅरेटच्या पाचूच्या दागिन्यांनी वाढवली लूकची शोभा

सोनमच्या या लूकमध्ये तिच्या साडीइतकेच लक्ष दागिन्यांनीही वेधून घेतले. तिने अंजली भीमराजका फाइन ज्वेल्सचे पारंपरिक भारतीय पोल्की शैलीतील रशियन पाचूचे दागिने परिधान केले होते. या दागिन्यांचे एकूण वजन ४०० कॅरेटहून अधिक असल्याचे सांगितले जाते.

याशिवाय आम्रपाली ज्वेल्सचे कोलंबियन पाचू जडवलेले लटकत्या आकाराचे इअर कफ्स तिने घातले होते. हातातील मोठ्या आकाराच्या पाचूच्या अंगठीनेही तिच्या लूकमध्ये विशेष भर घातली. हिरव्या रंगाच्या साडीशी आणि मखमली कोटशी जुळणारे हे दागिने तिच्या संपूर्ण लूकला राजेशाही थाट देत होते.

साध्या मेकअपमुळे खुलला सोनमचा लूक

दागिन्यांची निवड उठावदार असल्याने सोनमने मेकअप मात्र साधा ठेवला होता. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक देणारा मेकअप, डोळ्यांवर हलकी चमक, गालांवर सौम्य गुलाबी छटा आणि ओठांवर फिकट गुलाबी रंगाची लिपस्टिक असा तिचा मेकअप होता.

तिने केसांचा मधोमध भांग पाडून ते मोकळे सोडले होते. केसांची साधी आणि नीटनेटकी रचना केल्यामुळे तिचे आकर्षक इअर कफ्स आणि पाचूचे दागिने अधिक उठून दिसत होते. पारंपरिक भारतीय कला, कारागिरी आणि आधुनिक फॅशन यांचा सुंदर मेळ साधणारा सोनमचा हा लूक सोहळ्यातील खास आकर्षण ठरला.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

भारतातील युजर्ससाठी Apple Maps चे नवे फीचर्स; आता 3D लँडमार्कसह मराठीतही मिळणार रस्त्यांची माहिती, वाचा सविस्तर

सोनिया गांधींच्या पुस्तकात सावरकरांच्या अपमानाचा दावा; पुस्तकाच्या प्रती फाडत शिंदेंच्या शिवसेनेकडून बंदी घालण्याची मागणी

आई-वडील आक्रोश करत राहिले, पण...; रायगडमध्ये अ‍ॅम्ब्युलन्स वाहतूक कोंडीत अडकल्याने फुगा गिळलेल्या चिमुकल्याचा करुण अंत

मेट्रो-५ च्या कशेळी डेपोत पहिल्या गाडीचे आगमन; ठाणे-भिवंडी-कल्याणच्या प्रवाशांना मिळणार दिलासा

रस्त्यावर पडलेल्या मद्यधुंद तरुणाच्या मदतीसाठी थांबलेल्या लोकांना भरधाव बसने उडवले; अपघात कॅमेऱ्यात कैद - VIDEO