लाल नाही तर पिवळं कलिंगड चर्चेत! 'आरोही'ची खासियत काय? जाणून घ्या सविस्तर  सर्व छायाचित्र : संदीप (दिपू) ओरोसकर
फोटो

लाल नाही तर पिवळं कलिंगड चर्चेत! 'आरोही'ची खासियत काय? जाणून घ्या सविस्तर

पिवळ्या गराच्या ‘आरोही’ कलिंगडाची सध्या चर्चा वाढत आहे. बाहेरून हिरवं दिसणारं हे कलिंगड आतून पिवळं असतं आणि चवीला अधिक गोड, रसाळ व मऊ असल्याचं सांगितलं जातं. याची वैशिष्ट्यं, पोषणमूल्ये, लागवड पद्धत आणि शेतकऱ्यांचा अनुभव जाणून घ्या.

Mayuri Gawade

कलिंगड म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते लालभडक, रसाळ आणि गोड फळ… उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारं सगळ्यांचंच आवडतं फळ. बाजारातही आपल्याला नेहमी लाल गराचं पारंपरिक कलिंगडच दिसतं. पण आता या नेहमीच्या चित्रात थोडा बदल दिसतोय.

बाहेरून अगदी तसंच हिरवं दिसणारं, पण कापल्यावर आतून पिवळा गर असलेलं कलिंगड अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. नेमकं हे पिवळ्या गराचं कलिंगड काय आहे आणि त्यामागचं वेगळेपण काय, हे जाणून घेऊया…

या प्रकारच्या कलिंगडाला 'आरोही' वाण म्हणतात. या कलिंगडाचे बाहेरून साल हिरव्या रंगाचेच दिसते, त्यामुळे ते सामान्य लाल कलिंगडाप्रमाणेच वाटते; मात्र कापल्यावर आतून गडद पिवळा गर दिसतो.

माहितीनुसार, या आरोही वाणाची चव अधिक गोड, रसाळ आणि मऊ असते. यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यास मदत होते. तसेच या कलिंगडात व्हिटॅमिन A आणि C चांगल्या प्रमाणात आढळतात.

पिवळ्या गरामुळे यामध्ये लायकोपीनचे प्रमाण कमी असते, परंतु इतर अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. या फळात बिया तुलनेने कमी असल्याने खाण्यास अधिक सोयीचे ठरते.

या ‘आरोही’ वाणाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सिंधुदुर्गातील कुडाळ येथील शेतकरी संदीप (दिपू) ओरोसकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, यंदा त्यांनी पहिल्यांदाच याची लागवड केली. ते दरवर्षी लाल कलिंगडाचंच उत्पादन घेतात आणि बाजारात विक्री करतात; मात्र यंदा नवा प्रयोग म्हणून पिवळ्या गराच्या कलिंगडाचं पीक घेतलं.

त्यांच्या माहितीनुसार, हे फळ तयार व्हायला साधारण ६५ ते ७० दिवसांचा कालावधी लागतो. त्यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून लागवड सुरू केली होती आणि मार्च अखेर फळं तयार झाली. ही आवक मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

त्यांच्या बागेत या कालावधीत दोन वेळा पीक घेतले गेले आहे. त्यांच्या अनुभवातून कोकण पट्ट्याच्या तुलनेत गोव्यातील पणजी आणि म्हापसा भागातून या पिवळ्या कलिंगडाला अधिक पसंती मिळत असून या भागात आरोही कलिंगडाची मोठ्या प्रमाणात मागणी आहे

लागवडीच्या दृष्टीने पाहिल्यास ‘आरोही’ वाण पारंपरिक कलिंगडाप्रमाणेच घेतले जाते. या पिकासाठी हलकी ते मध्यम, चांगला निचरा होणारी जमीन योग्य ठरते. उष्ण आणि कोरडे हवामान या पिकाच्या वाढीस पोषक असते. बियाणे थेट जमिनीत पेरले जातात आणि रोपांमध्ये साधारण १.५ ते २ मीटर अंतर ठेवले जाते, ज्यामुळे वेलींना वाढीस पुरेशी जागा मिळते.

सुरुवातीच्या टप्प्यात नियमित पाणी देणे आवश्यक असते; मात्र फळधारणेनंतर पाण्याचे प्रमाण नियंत्रित ठेवणे गरजेचे असते, कारण जास्त पाण्यामुळे फळांची गोडी कमी होऊ शकते. सेंद्रिय खतांचा वापर केल्यास उत्पादनाची गुणवत्ता सुधारते.

तसेच फळं जमिनीला लागून खराब होऊ नयेत म्हणून त्याखाली गवत किंवा प्लास्टिक ठेवले जाते. साधारण ६५ ते ७० दिवसांनंतर फळं काढणीस तयार होतात, त्यामुळे योग्य वेळी काढणी करणेही तितकेच महत्त्वाचे ठरते.

पारंपरिक लाल कलिंगडाच्या म्हणजेच ‘ऑगस्टा'च्या तुलनेत पिवळ्या गराचं हे कलिंगड चव, रंग आणि अनुभव या तिन्ही बाबतीत वेगळेपण देतं. नवीनतेमुळे ग्राहकांमध्ये उत्सुकता वाढत असताना शेतकऱ्यांसाठीही हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. बदलत्या बाजारपेठेत अशा नव्या प्रकारांमुळे शेतीत प्रयोगशीलतेला चालना मिळत असल्याचं चित्र दिसून येत आहे.

Mumbai: मध्य रेल्वेकडून १५ डब्यांच्या लोकलची तयारी; टिटवाळा ते वासिंददरम्यान आज रात्री विशेष ब्लॉक

मीरा-भाईंदरचा पाणीपुरवठा २४ तास बंद; पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन

Andhra Pradesh: सेल्फीचा मोह ठरला जीवघेणा; तीन मैत्रिणी धबधब्यात बुडाल्या, Video व्हायरल

ठाण्यात रखडलेल्या प्रकल्पांना मिळणार गती; विकासासाठी पालिकेकडून PPP मार्गाचा अवलंब

कोकणसाठी ४ वातानुकूलित विशेष रेल्वेगाड्या; CSMT आणि मडगाव स्थानकांदरम्यान धावणार