नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी व खातेवाटप झाल्यानंतर मंत्र्यांनी मंगळवारी आपापले पदभार स्वीकारले. मोदी मंत्रिमंडळातील ९९ टक्के मंत्री कोट्यधीश असून त्यांची सरासरी संपत्ती १०७.९४ कोटी रुपये आहे, असे ‘एडीआर’च्या अहवालातून उघड झाले आहे. यात सहा मंत्र्यांची संपत्ती १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.
दूरसंचार व ईशान्य भारत विभागाचे मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची संपत्ती ४२४.७५ कोटी असून त्यात ६२.५७ कोटी चल व ३६२.१७ कोटी अचल संपत्ती आहे. अवजड व पोलाद मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची २१७.२३ कोटी संपत्ती असून त्यात १०२.२४ कोटी चल व ११५ कोटी अचल संपत्ती आहे. रेल्वे व माहिती-प्रसारण, आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांची ११४.१२ कोटी संपत्ती असून त्यात १४२.४० कोटींची चल तर १.७२ कोटींची अचल संपत्ती आहे.
राव इंद्रजीत सिंह हे सांख्यिकी व नियोजन खात्याचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) आहेत. त्यांची संपत्ती १२१.५४ कोटी आहे. त्यामध्ये ३९.३१ कोटींची चल तर ८२.२३ कोटींची अचल संपत्ती आहे. वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांची ११०.९५ कोटी संपत्ती असून त्यात ८९.८७ कोटींची चल तर २१.०९ कोटींची अचल संपत्ती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात एकूण ७१ मंत्र्यांचा समावेश आहे. त्यापैकी बहुतांश मंत्री आर्थिकदृष्ट्या मालामाल आहेत.
पेम्मासानी सर्वात श्रीमंत मंत्री
ग्रामविकास राज्यमंत्री डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी हे सर्वात श्रीमंत मंत्री असून त्यांची संपत्ती ५,७०५.४७ कोटी रुपये आहे. त्यांच्याकडे ५,५९८.६५ कोटींची चल तर १०६.८२ कोटींची अचल संपत्ती आहे.