राजकीय

भाजप मित्रपक्षांना वापरून फेकून देते; बच्चू कडूंचा आरोप

Swapnil S

मुंबई : भाजप आपल्या मित्रपक्षांना वापरते आणि योग्य वेळी त्यांना संपवून टाकते, असा आरोप भाजपच्या अनेक मित्रपक्षांनी यापूर्वी केला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार यांनी असा आरोप यापूर्वी अनेकदा केला आहे. त्यातच राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनीही भाजप लहान पक्षांचा वापर करते, त्यानंतर त्यांना फेकून देते. त्यांच्याकडे मोठी माणसे आली की त्यांना छोट्या माणसांची काही गरज नसते. भाजपा आणि काँग्रेसची अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची पद्धत आहे, अशी टीका केली. त्यालाच प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख बच्चू कडू यांनीही सहमती दर्शवली.

महादेव जानकर जे काही बोलत आहेत, तसा अनुभव मलाही येऊ लागला आहे, असे वक्तव्य प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. बच्चू कडू म्हणाले, “महादेव जानकर बोलले, त्यातला थोडा अनुभव मलाही आता येत आहे. एखाद्या पक्षाला सोबत घ्यायचे आणि नंतर ठेचून काढायचे, असे राजकारण भाजपकडून सुरू आहे. हे चालतेय तोवर असेच चालत राहणार आहे.”

बच्चू कडू हे गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. पिकांना हमीभाव मिळावा या प्रमुख मागणीसह इतर काही मागण्या घेऊन दिल्लीच्या सीमेजवळ आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवरील लाठीहल्ल्यावरून बच्चू कडू यांनी केंद्रातल्या मोदी सरकारवर टीका केली होती. पंजाब आणि हरयाणातील शेतकरी आंदोलन करण्यासाठी दिल्लीच्या दिशेने जात आहेत. परंतु, शेतकऱ्यांचा हा मोर्चा रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर पोलिसांनी बळाचा वापर केला. पोलिसांनी दिल्लीच्या सर्व सीमांवर बॅरिकेड्स लावले आहेत. या बॅरिकेड्सना न जुमानता शेतकरी पुढे चालू लागले त्यामुळे पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीहल्ला केला, तसेच जमाव पांगवण्यासाठी अनेकवेळा अश्रुधुराचा मारा मारा केला. या घटनेचा देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. आमदार बच्चू कडू यांनीदेखील याप्रकरणी केंद्र सरकारचा निषेध नोंदवला.

दरम्यान, बच्चू कडू म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक गोष्टींची गॅरंटी देत आहेत. मग ते पिकांना हमीभाव देण्याची गॅरंटी का देत नाहीत? केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव द्यावा. मी या एनडीए सरकारमध्ये असलो तरीदेखी मी हेच म्हणेन की, शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठलीही चांगली योजना केंद्र किंवा राज्य सरकारने आणलेली नाही. दोन-तीन गोष्टी सोडल्या तर चांगल्या योजना आणण्यात सरकार अपयशी ठरले आहे.”

राज्य सरकारच्या धर्तीवर ‘ड्युटी पॅटर्न’ राबवा; परिचारिकांच्या शेकडो रिक्त पदांमुळे कामाचा ताण

"उद्धव ठाकरेंना १९९९मध्ये मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडू लागली होती म्हणून...", देवेंद्र फडणवीस यांचा दावा

चेन्नईसाठी करो या मरो; प्ले-ऑफमधील प्रवेशासाठी राजस्थान रॉयल्सविरुद्ध विजय आवश्यक

ज्योतिषानं काढली भाजप-काँग्रेसची कुंडली अन् थेट सांगितला लोकसभेचा निकाल; नेटकरी घेतायेत मजा

मोदींनंतर अमित शहा पंतप्रधान! मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दावा