नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते अशोक चव्हाण यांच्यासह सहा नेत्यांची मंगळवारी महाराष्ट्रातून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. त्यात भाजपचे उमेदवार मेधा कुलकर्णी, अजित गोपचडे यांच्यासह शिवसेनेचे उमेदवार मिलिंद देवरा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हांडोरे यांचाही समावेश आहे. राज्यसभेसाठी झालेल्या अन्य राज्यांतील निवडणुकांचेही काही निकाल मंगळवारी जाहीर झाले असून त्यात राजस्थानमधून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
राज्यसभेच्या १५ राज्यांतील ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी निवडणूक होणार आहे. त्यात उत्तर प्रदेशमधील १०, महाराष्ट्रातील ६, बिहारमधील ६, पश्चिम बंगालमधील ५, मध्य प्रदेशमधील ५, गुजरातमधील ४, कर्नाटकमधील ४, आंध्र प्रदेशातील ३, तेलंगणातील ३, राजस्थानमधील ३, ओदिशातील ३ यांच्याबरोबरच उत्तराखंड, छत्तीसगड, हरयाणा आणि हिमाचल प्रदेशातील प्रत्येकी एका जागेसाठी निवडणूक होणार होती. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख १५ फेब्रुवारी आणि अर्ज मागे घेण्याची तारीख २० फेब्रुवारी होती. अर्ज मागे घेतल्यानंतर जे चित्र स्पष्ट झाले त्यानुसार महाराष्ट्रातील सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.