राजकीय

सुधीर मुनगंटीवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल ; म्हणाले, "१९६० पासून शरद पवार..."

नवशक्ती Web Desk

आरक्षणाच्या मुद्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या मुद्यावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. असं असताना आता राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर आरक्षणाच्या मुद्द्यावरून निशाणा साधला आहे.

शरद पवार सरकारमध्ये असताना मराठा समाजाला आरक्षण का मिळालं नाही? असा प्रश्न उपस्थित करत मुनगंटीवार यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

१९६० पासून शरद पवार मराठा आरक्षणाबद्दल आश्वासन देत आहेत. पण त्यांनी सत्तेत असताना आरक्षण दिलेलं नाही. त्यात ते अपयशी झाले म्हणून ते ही आरक्षणाची जबाबदारी आमच्यावर टाकत आहे, अशा शब्दात मुनगंटीवारांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

मुनगंटीवार पुढे बोलताना म्हणाले की, सरकार आणि ओबीसी प्रतिनिधींमध्ये चर्चेतून तोडगा निघेल, असा विश्वास आहे. ओबीसी आंदोलनाबाबत सरकार गंभीर आहे. आज सरकारशी चर्चा केल्यानंतर ओबीसी प्रतिनिधींना मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत स्पष्टता आणि समाधान मिळेल. शरद पवार १९६० पासून मराठा आरक्षणाबाबत आश्वासनं देत आहेत आणि आता ते मराठा आरक्षण देण्यात अपयशी ठरल्याने जबाबदारी आमच्यावर टाकत आहेत. शरद पवार सरकारमध्ये असताना मराठा समाजाला आरक्षण का मिळाले नाही, याचं उत्तर शरद पवार यांनी कधीही दिलं नाही. एका मागणीसाठी शालिनीताई पाटील यांची पक्षातून हकालपट्टी का केली, याचे उत्तर त्यांनी कधी दिले नाही.

महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करण्यासाठी काही राजकीय पक्षांचे नेते पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करत आहेत. कारण अस्थिरतेच्या शिडीवरच आपली ताकद उभी करता येईल, असे त्यांना वाटते. सद्यपरिस्थितीवर लक्ष ठेवून त्यांच्या लक्षात येईल की यावेळी अस्थिरता कोण निर्माण करत आहे? राज्यात इतके उपोषण झाले असताना शरद पवार यांनी कधीही उपोषण केले नाही. शरद पवार कधीच धनगर समाजाच्या उपोषणाला का बसले नाहीत, कारण या सगळ्यातून त्यांना अस्थिरता निर्माण करण्याची संधी आहे हे त्यांना माहीत होते, असा आऱोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल