राजकीय

संपूर्ण कोस्टल रोड मे नंतरच मुंबईकरांच्या सेवेत, मुख्यमंत्री : थंडानी जंक्शन - वरळी ते मरीन लाइन्स जानेवारी अखेर अंशतः खुला होणार

Swapnil S

मुंबई : संपूर्ण स्वच्छता अभियान मुंबई राबवण्यात येत असून, दररोज एका वॉर्डात स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. स्वच्छता मोहीमेमुळे मुंबईच्या हवेतील गुणवत्ता सुधारली असून, वांद्रे कुर्ला संकुल परिसरातील वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध मरीन ड्राईव्ह परिसर स्वच्छ व धुळ मुक्तीसाठी रोज आवश्यक संख्येने टँकर तैनात करून पाण्याने रस्ता व पदपथ धुवून काढा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे. मे महिन्यानंतर कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत येणार असून, यामुळे वेळ व इंधनाची बचत होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. स्वच्छता मोहिमेमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली, हे या मोहिमेचे यश दाखवणारे प्रतीक आहे. आता मुंबई सोबतच ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी अशा मुंबई प्रदेशातील आसपासच्या शहरांमध्ये स्वच्छता मोहिमेला वेग दिला जात आहे. लवकरच राज्यभरात ही मोहीम विस्तारलेली असेल, असेही शिंदे यांनी यावेळी नमूद केले.

मागील काही आठवड्यांपासून सातत्याने मुंबईमध्ये संपूर्ण स्वच्छता मोहीम म्हणजे डीप क्लिनिंग ड्राईव्ह टप्प्या-टप्प्याने व सातत्याने राबविण्यात येत आहे. एकाचवेळी मोठ्या प्रमाणात पालिकेचे स्वच्छता कर्मचारी, कामगार तसेच स्थानिक नागरिक देखील या मोहिमेत सहभागी होतात. मोहिमेच्या निमित्ताने लहान-मोठे रस्ते, पदपथ, चौक यांच्यासह नाले, सार्वजनिक प्रसाधनगृहं आदी सर्व ठिकाणी स्वच्छता केली जाते. रस्ते धूळमुक्त करण्यासाठी पाण्याने धुण्यात येतात. तसेच राडारोडा (डेब्रीज) आणि ठिकठिकाणी साचलेला कचरा हटवण्यात येतो. त्याचा परिणाम म्हणजे, सार्वजनिक स्वच्छतेमध्ये मोठी सुधारणा झाली आहे, विशेषतः मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारणा होण्यासाठी त्याचा फायदा झाला आहे. रस्ते स्वच्छ धुतल्याने धूलिकण कमी होवून वायू गुणवत्ता सुधारली आहे. पाणी फवारणी करणाऱ्या मिस्ट मशिन्समुळे हवेतील धूली कणांचे प्रमाण कमी झाले आहे.

मुंबईत काही ठिकाणी हवा गुणवत्ता निर्देशांक ३५० वरून आता २०० पेक्षा देखील कमी झाला आहे. पवई, बोरिवली यासारख्या अनेक ठिकाणी हा निर्देशांक १०० पेक्षा खाली आला आहे. मुंबईतील मुख्य रस्त्यांसोबतच अंतर्गत रस्ते स्वच्छ करण्याच्या दृष्टिने प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचना पालिकेला करत नियमितपणे राबवलेल्या स्वच्छता मोहिमेचा अधिकाधिक चांगला परिणाम आगामी कालावधीत नक्कीच दिसून येईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

भूमिगत बोगद्याची पाहणी

आजच्या दौऱ्याच्या सुरुवातीला मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील दक्षिण दिशेला जाणाऱ्या भूमिगत बोगद्याची पाहणी केली. बोगद्यामध्ये वायूविजनासाठी तसेच आग किंवा धूर अशा आपत्कालीन प्रसंगी मदतकारक ठरणारी, अतिशय अद्ययावत 'सकार्डो वेंटिलेशन' प्रणाली स्थापन करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बोगद्याची कामे अंतिम टप्प्यात असून, ती सर्व ३१ जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहेत. तर उत्तर दिशेने जाणाऱ्या बोगद्याची कामे मे २०२४ अखेरीस पूर्ण होणे अपेक्षित आहे. हा बोगदा वाहतुकीसाठी खुला केल्याने वाहतुकीला जलद प्रवासाचा पर्याय मिळेल.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस