राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापलं असतानाच राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आमचं सरकार पाडलं नसतं तर आम्ही नक्कीचं मराठा आरक्षण टिकवलं असतं, असं वक्तव्य चव्हाण यांनी केलं. ते पुण्यात बोलत होते. चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने पलटवार करत जहरी टीका केली. पृथ्वीराज चव्हाण यांना सुपारी देऊनच महाराष्टारत पाठवलं होतं. जर आम्ही निवडणुका एकत्र लढणार नव्हतो. तर अशा सरकारमध्ये राहण्यात काही अर्थ नव्हता, असं उत्तर अजित पवार गटातील खासदार सुनील तटकरे यांनी दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
२०१४ साली मी मुख्यमंत्री असताना सहकार क्षेत्रात घेतलेल्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आमचं सरकार पाडलं. जर त्यावेळी आमचं सरकार पडलं नसतं तर आम्ही नक्कीच मराठा आरक्षण टिकवलं असतं. मला खात्री आहे की माझं सरकार जर पडलं नसतं, तर आम्ही दोघे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्रित निवडणुकीला समोरे गेलो असतो आणि २०१४ साली भाजपऐवजी आमचं सरकार आलं असतं, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. तसंच आम्ही सत्तेत असतो तर मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील मार्गी लावला असता, असा दावा देखील त्यांनी केला.
अजित पवार गटाचा पलटवार
पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने पलटवार करत प्रत्युत्तर दिलं आहे. पृथ्वीराज चव्हाण हे राजकारणी आहेत असा माझा आतापर्यंतचा समज होता. त्यांना हल्ली विनोद का सुचतो ते काही कळत नाही. सत्ता गेल्यानंतर आरक्षण टिकलं नाही असं म्हणण्याला काही अर्थ नाही. त्यांची असं बोलण्यामागची भूमिका काय हे माहिती नाही, असा हल्लाबोल खासदार सुनील तटकरे यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण यांना सुपारी देऊनच पाठविलं होतं. जर आम्ही निवडणुका एकत्र लढणार नव्हतो, तर अशा सरकारमध्ये राहण्यात काही अर्थ नव्हता. पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात आघाडी लय विघडली. आघाडी सरकारमध्ये विलासराव हे सर्वोत्तम मुख्यमंत्री होते, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस चौथ्या क्रमांकावर गेली, असाही घणाघात सुनील तटकरे यांनी केला.