राजकीय

काका-पुतण्यांत वाकयुद्ध! आमदार रोहित पवारांचा टोला; अजित पवार म्हणाले, बच्चा

Swapnil S

विशेष प्रतिनिधी/मुंबई

आमदार रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती अ‍ॅग्रोवर शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाने छापे टाकले. यावरून रोहित पवार यांनी मराठी बाणा लढण्याचा असल्याचे सूचक ट्विट केले होते. त्यानंतर शनिवारी या मुद्यावरून बोलताना रोहित पवार यांनी बारामती अ‍ॅग्रोमध्ये जर काही चुकीचे केले असते, तर मी अजित पवार यांच्याबरोबर भाजपमध्ये गेलो असतो, असा टोला लगावला. यासोबतच अजित पवार गट आणि शिंदे गट आता कमळावर निवडणूक लढतील, असाही चिमटा काढला. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार रोहित पवार बच्चा आहे. त्यावर आमचे प्रवक्ते बोलतील, असे म्हटले. त्यामुळे आगामी काळात काका-पुतण्यात संघर्ष अटळ असल्याचे बोलले जात आहे.

आमदार रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रोमधील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ईडीने ६ ठिकाणी छापे टाकले. त्यामुळे आमदार रोहित पवार यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याअगोदर आमदार रोहित पवार यांनी ईडीच्या कारवाईमागे दोन बड्या नेत्यांचा हात असल्याचा आरोप केला होता. त्यातच आता धाडीनंतर शनिवारी बोलताना त्यांनी थेट अजित पवार गट आणि शिंदे गटावर निशाणा साधला. सात-आठ दिवसांपूर्वी अजितदादा मित्रमंडळाचे कोण दिल्लीत गेले, हे पाहणे महत्त्वाचे आहे. मी खरच चूक केली असती तर अजितदादांसोबत भाजपमध्ये जाऊन बसलो असतो, आमच्यासाठी विचार महत्त्वाचा आहे.

माझा आक्षेप ईडीच्या अधिकाऱ्यावर नाही, असे म्हणत आमदार रोहित पवार यांनी पुन्हा सूचक विधान केले. यामुळे आता अजित पवार गटही आक्रमक झाला आहे.

त्यातच अजित पवार यांनी तर आमदार रोहित पवार बच्चा असल्याचे सांगतानाच आमचे प्रवक्ते योग्य ते उत्तर देतील, असे सांगून संघर्षाचे संकेत दिले. त्यामुळे आगामी काळात आमदार रोहित पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गट यांच्यात शाब्दिक फैरी झडण्याची शक्यता आहे. यावरून राजकीय संघर्षही चांगलाच पेटू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

नाट्यसंमेलनाला अजित पवारांची अनुपस्थिती

पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी झालेल्या नाट्य संमेलनासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमाला शरद पवार यांनी हजेरी लावली. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित राहिले. एकाच व्यासपीठावर शरद पवार यांच्यासोबत उपस्थित राहणे अजित पवार यांनी टाळले. त्यामुळे पवार काका-पुतण्यात मतभेद वाढल्याचे बोलले जात आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस