भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवार, २५ सप्टेंबर रोजी हैदराबाद येथे होणाऱ्या सामन्याची ऑफलाइन तिकिटे विकत घेण्यासाठी गुरुवारी तब्बल ३० हजार माणसांनी स्टेडियमबाहेर गर्दी केल्याचे वृत्त समोर आले. ३ हजार तिकिटांसाठी इतका घोळका जमल्याने पोलिसांना नाइलाजास्तव लाठीचार्ज करावा लागला. यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले असून यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे.
राजीव गांधी स्टेडियमवर तब्बल तीन वर्षांनी प्रथमच आंतरराष्ट्रीय सामना होत असल्याने हैदराबादमधील चाहते ही लढत पाहण्यासाठी आतुर आहेत. सकाळी १० वाजता जिमखानाबाहेर तिकिटांची विक्री करण्यात येणार होती. यासाठी पहाटेपासूनच नागरिकांची गर्दी जमण्यास प्रारंभ झाला. हळूहळू गर्दी वाढल्याने चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवली. त्यामुळे पोलिसांनी अनेकांवर लाठीचार्ज केला. यामध्ये काहींना किरकोळ दुखापत झाली. पोलिसांच्या हल्ल्यात एकूण २० जण जखमी झाले असून सात जणांना उपचारासाठी नेण्यात आले आहे.
ऑफलाइन विक्री बंद!
दरम्यान, हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख मोहम्मद अझरुद्दीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता पेटीएम अॅप आणि पेटीएम इनसाइडर अॅपद्वारे तिकिटे विकली जातील. सुमारे ५५,००० क्षमतेचे राजीव गांधी स्टेडियम हे शहरातील मुख्य क्रिकेट स्टेडियम आहे. तसेच या घटनेचा सामन्यावर काहीही परिणाम होणार नाही, असे अझरुद्दीन यांनी सांगितले.