सेंट लुशिया : टी-२० विश्वचषकात सोमवारी रात्री होणाऱ्या सुपर-८ फेरीच्या लढतीत भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे कडवे आव्हान असेल. २०२३च्या विश्वचषकातील अंतिम फेरीचा वचपा काढण्याच्या हेतूने मैदानात उतरणाऱ्या भारतापुढे ऑस्ट्रेलियाला या स्पर्धेतून बाहेर करण्याची नामी संधी आहे. मात्र या लढतीवर पावसाचे सावट असेल.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ पहिल्या गटात दोन विजयांच्या ४ गुणांसह अग्रस्थानी आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला नमवून थाटात उपांत्य फेरी गाठण्याचे भारताचे ध्येय असेल. भारतीय संघाला २०२३मध्ये कसोटी अजिंक्यपद व एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडूनच पराभव पत्करावा लागला होता.
दुसरीकडे मिचेल मार्शच्या ऑस्ट्रेलियन संघात अनेक तारांकित खेळाडू आहेत. मात्र अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवाने त्यांच्यावरील दडपण वाढले आहे. त्यामुळे भारताला नमवण्यासाठी ते सर्वस्व पणाला लावतील.
खेळपट्टी आणि वातावरण
> डॅरेन सॅमी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक असून येथे १८० ते १९० धावांचा पाठलागही करता येऊ शकतो. येथे वेगवान गोलंदाजांच्या तुलनेत फिरकीपटूंना अधिक सहाय्य लाभेल.
> येथेच स्थानिक वेळेनुसार ही लढत सकाळी १०.३० वाजता सुरू होणार आहे. मात्र सेंट लुशियामध्ये सकाळी ८ वाजता पावसाची शक्यता आहे. तसेच दुपारी १२ ते १च्या सुमारासही पाऊस येऊ शकतो.
उपांत्य फेरीचे समीकरण
> भारताने ऑस्ट्रेलियाला नमवल्यास अफगाणिस्तानने फक्त १ धावेने बांगलादेशला हरवले, तरी भारतासह ते उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
> भारताची धावगती (२.४२५), ऑस्ट्रेलिया (०.२२३) व अफगाणिस्तानच्या (-०.६५०) तुलनेत सरस आहे. त्यामुळे भारताच्या दृष्टीने अखेरची लढत गमावली तरी पराभवाचे अंतर ३० ते ४० धावांहून अधिक असू नये, याची काळजी त्यांना घ्यावी लागेल.
> ऑस्ट्रेलियाने भारताला नमवल्यास अफगाणिस्तानपुढे लढत सुरू होण्यापूर्वी नवे समीकरण असेल. ऑस्ट्रेलियाने भारताला ३१ व अफगाणिस्तानने बांगलादेशला ९३ धावांनी नमवले, तरच भारतीय संघ स्पर्धेबाहेर जाईल.
प्रतिस्पर्धी संघ
> भारत : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, संजू सॅमसन, ऋषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
> ऑस्ट्रेलिया : मिचेल मार्श (कर्णधार), ॲश्टन ॲगर, पॅट कमिन्स, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरून ग्रीन, जोश इंग्लिस, ट्रेव्हिस हेड, जोश हेझलवूड, मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, ॲडम झाम्पा, मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल.
> वेळ : रात्री ८ वाजल्यापासून
> थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनी आणि हॉटस्टार ॲप