क्रीडा

भारतीय संघाकडून पाकिस्तानचा धुव्वा, 'डेव्हिस चषक' लढतीत ४-० असे एकतर्फी यश

भारतीय टेनिस संघाने अपेक्षेप्रमाणे डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत पाकिस्तानचा ४-० असा सहज धुव्वा उडवला. या विजयासह भारताने पाकिस्तानवरील वर्चस्व कायम राखतानाच ‘वर्ल्ड ग्रुप-१’ गटाची पात्रता मिळवली.

Swapnil S

इस्लामाबाद : भारतीय टेनिस संघाने अपेक्षेप्रमाणे डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत पाकिस्तानचा ४-० असा सहज धुव्वा उडवला. या विजयासह भारताने पाकिस्तानवरील वर्चस्व कायम राखतानाच ‘वर्ल्ड ग्रुप-१’ गटाची पात्रता मिळवली. आता सप्टेंबर महिन्यात भारतीय संघ वर्ल्ड ग्रुपमधील अन्य बलाढ्य संघांशी दोन हात करेल. पाकिस्तानला मात्र वर्ल्ड ग्रुप-२ गटातच राहावे लागेल.

तब्बल ६० वर्षांनी भारताचे टेनिसपटू डेव्हिस चषकासाठी पाकिस्तानात दाखल झाले होते. शनिवारी एकेरीच्या सामन्यांत रामकुमार रामनाथन व एन. श्रीराम बालाजी यांनी दमदार विजय नोंदवले. रामनाथनने ऐसाम कुरेशीला ६-७ (३-७), ७-६ (७-४), ६-० असे पिछाडीवरून नमवले, तर बालाजीने अनुभवी अकील खानला ७-५, ६-३ असे पराभूत केले होते.

रविवारी पुरुष दुहेरीत युकी भांब्री व साकेत मायनेनी यांच्या जोडीने मुझामील मुर्ताझा व अकील या पाकिस्तानी जोडीवर ६-२, ७-६ (७-५) अशी सरळ दोन सेटमध्ये मात केली. साकेत-युकीच्या यशामुळे भारताचा विजय पक्का झाला. त्यानंतर पुढील एकेरीची लढत खेळण्याची गरज नव्हती. मात्र दोन्ही संघांनी संमतीने खेळण्यास तयारी दर्शवली. यामध्ये भारताच्या २८ वर्षीय निकी पूनाचाने मोहम्मद शोएबला ६-३, ६-४ अशी धूळ चारली. पाचवी लढत खेळवण्यात आली नाही.

हे महत्त्वाचे!

६०

६० वर्षांपूर्वी म्हणजेच १९६४मध्ये भारतीय संघ अखेरचा पाकिस्तानात गेला होता. त्यावेळी भारताने ४-० असे वर्चस्व गाजवले होते. २०१९मध्येही भारताला पाकिस्तानात जायचे होते. मात्र त्यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव ही लढत कझाकस्तान येथे खेळवण्यात आली. त्यावेळेसही भारतानेच ४-० अशी बाजी मारली होती. पाकिस्तानचा टेनिस संघ २००६मध्ये अखेरचा भारतात खेळला आहे.

८-०

भारताने डेव्हिस चषकातील आतापर्यंतच्या आठही सामन्यांत पाकिस्तानला धूळ चारली आहे.

लक्ष्मीपूजनाला वरुणराजाचे 'फटाके'! दिवाळीच्या धामधुमीत मुंबई, ठाणे, नवी मुंबईत अवकाळी पावसाचे धुमशान

दिवाळीच्या सणात पावसाची आतषबाजी; शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

दिवाळीनिमित्त मोदींचे देशवासीयांना पत्र; स्वदेशी, भाषा, आरोग्य यासह ऑपरेशन सिंदूरचाही केला उल्लेख

राज ठाकरेंच्या दीपोत्सवावर सरकारची जाहिरातबाजी; मनसेची संतप्त पोस्ट, म्हणाले, "आमच्या पक्षाला...

MMR २०४७ पर्यंत बनणार अग्रगण्य शहरी अर्थव्यवस्था; MMRDA चा विश्वास