

बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिका नेहा कक्कर सध्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. आपल्या हटके आवाजामुळे आणि हिट गाण्यांमुळे ओळखली जाणारी नेहा यावेळी मात्र कामातून ब्रेक घेण्याच्या निर्णयामुळे चर्चेचा विषय ठरली आहे.
ब्रेकची पोस्ट अन् चर्चांना सुरुवात
सोमवारी नेहाने इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत "जबाबदाऱ्या, नाती, काम आणि सध्या मनात असलेल्या सगळ्या गोष्टींपासून ब्रेक घेत आहे" असं म्हटलं होतं. तसेच "मी परत येईन की नाही, याची खात्री नाही" असंही तिने या पोस्टमध्ये नमूद केलं होतं. या पोस्टनंतर सोशल मीडियावर नेहा कक्कर आणि तिचा नवरा रोहनप्रीत सिंग यांच्या नात्याबाबत विविध चर्चा सुरू झाल्या. काही नेटकऱ्यांनी नेहा घटस्फोट घेणार असल्याचाही अंदाज व्यक्त केला. यावर आता नेहाने स्वतः इंस्टाग्राम स्टोरीद्वारे स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.
घटस्फोटाच्या चर्चांवर नेहाची प्रतिक्रिया
नेहाने आपल्या स्टोरीमध्ये लिहिलं आहे, "कृपया माझ्या इनोसंट नवऱ्याला आणि माझ्या प्रेमळ कुटुंबाला या सगळ्यात ओढू नका. ते सगळे अतिशय चांगले लोक आहेत. आज मी जे काही आहे, ते त्यांच्या पाठिंब्यामुळेच आहे. माझा राग काही वेगळ्या लोकांवर आणि संपूर्ण सिस्टिमवर आहे."
पुढे ती म्हणते, "सोशल मीडियावर पोस्ट करताना मी खूप भावनिक झाले होते. मीडियाला ‘राईचा पर्वत’ कसा करायचा, हे चांगलंच माहीत आहे. यातून मला धडा मिळाला आहे." तसंच, "आता पुढे मी माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीही बोलणार नाही. बिचारी इमोशनल नेहू या जगासाठी खूपच भावनिक आहे," असंही तिने नमूद केलं.
दरम्यान, नेहाने याआधी शेअर केलेल्या पोस्टमध्ये पापाराझींना आपले फोटो किंवा व्हिडिओ शूट न करण्याची विनंती केली होती आणि खासगी आयुष्याचा आदर ठेवण्याचं आवाहन केलं होतं. नेहाने घेतलेला हा ब्रेक वैयक्तिक नसून व्यावसायिक कारणांमुळे असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे.