"फिटनेससाठी शॉर्टकट नाही तर…"; प्रिया बापटने सांगितलं ट्रान्सफॉर्मेशनमागचं सिक्रेट

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी सोशल मीडियावर शेअर केलेले जिममधले फोटो प्रचंड चर्चेत आले. दोघांचा फिट - टोन केलेला लूक पाहून अनेकांना हे फोटो AI ने तयार केले आहेत की काय, असा प्रश्नही पडला होता. मात्र हे फोटो खरेच होते. आता या ट्रान्सफॉर्मेशनमागचं गुपित खुद्द प्रियाने उघड केलं आहे.
"फिटनेससाठी शॉर्टकट नाही तर…"; प्रिया बापटने सांगितलं ट्रान्सफॉर्मेशनमागचं सिक्रेट
Published on

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी सोशल मीडियावर शेअर केलेले जिममधले फोटो प्रचंड चर्चेत आले. दोघांचा फिट - टोन केलेला लूक पाहून अनेकांना हे फोटो AI ने तयार केले आहेत की काय, असा प्रश्नही पडला होता. मात्र हे फोटो खरेच होते. आता या ट्रान्सफॉर्मेशनमागचं गुपित खुद्द प्रियाने उघड केलं आहे.

अलिकडेच हिंदुस्तान टाइम्सशी संवाद साधताना प्रियाने तिच्या फिटनेस प्रवासाबद्दल सविस्तर सांगितलं. ती म्हणते, फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन हा काही दिवसांचा नव्हे, तर दीर्घकाळ चालणारा प्रवास असतो. त्यासाठी सातत्य, संयम आणि योग्य मानसिकता गरजेची असते.

पुढील भूमिकेसाठी फिटनेसवर भर

प्रिया सध्या तिच्या एका मराठी वेबसीरिजचं शूट पूर्ण करत आहे. मात्र पुढील प्रोजेक्टसाठी तिला शारीरिकदृष्ट्या अधिक फिट व्हावं लागणार आहे. "सध्याच्या भूमिकेसाठी मला जसं आहे तसं राहणं गरजेचं होतं. पण जानेवारीच्या शेवटी सुरू होणाऱ्या पुढील प्रोजेक्टसाठी ही मेहनत उपयोगी ठरेल. त्या व्यक्तिरेखेत फिट बसणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे," असं ती सांगते. ॲक्शन रोल्स करण्याची इच्छा असल्याचंही तिनं स्पष्ट केलं.

जिममधले सातत्य आणि उमेशची साथ

जिममध्ये सातत्याने जाण्याचं श्रेय प्रिया तिचा नवरा उमेश कामतला देते. "गेल्या दहा वर्षांपासून मी नियमित वर्कआउट करते. त्यामागे उमेशची मोठी साथ आहे. तो फिटनेसबाबत खूप शिस्तबद्ध आहे," असं ती सांगते.

प्रिया आणि उमेश (इंस्टाग्राम)
प्रिया आणि उमेश (इंस्टाग्राम)

'फिटनेससाठी शॉर्टकट नसतात'

ॲब्सबद्दल बोलताना प्रिया म्हणते की, सुरुवातीला ॲब्स दाखवण्याचा काही विचारच नव्हता. पण जेव्हा शरीरात बदल दिसू लागतो, तेव्हा फिटनेससाठी अजून जास्त प्रेरणा मिळते. “शरीर लगेच बदलत नाही, त्यामुळे निराश होऊ नये. फिटनेससाठी कोणतेही शॉर्टकट नसतात,” असा सल्लाही ती देते.

वजन वाढवणं-कमी करणं आणि नवा अनुभव

आपल्या फिटनेस रुटीनबद्दल बोलताना प्रिया सांगते की, याआधी दोन वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी तिला जवळपास १० किलो वजन वाढवावं लागलं होतं आणि नंतर ते कमीही केलं. मात्र यावेळी अनुभव वेगळा होता. "यावेळी शरीरातील प्रत्येक स्नायू सक्रिय करावा लागला. ॲब्स परफेक्ट शेपमध्ये आणण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. स्क्रीनवर इतकं फिट दिसणं हा माझ्यासाठी एक नवीन अनुभव होता," असं ती म्हणते.

'अभिनयासाठी शरीर आणि मन दोन्ही तयार हवं'

फोटोशूटबद्दल बोलताना प्रिया म्हणते, "मला फक्त एकच गोष्ट महत्त्वाची वाटत होती, मी चांगली आणि आनंदी दिसायला हवी. अभिनय म्हणजे फक्त संवाद बोलणं नाही. त्यासाठी शारीरिक आणि मानसिक तयारी तितकीच गरजेची असते. भूमिकेसाठी गरज असेल तर स्वतःमध्ये बदल करणं, आव्हानं स्वीकारणं हे कलाकारानं शिकायलाच हवं."

या संपूर्ण फिटनेस प्रवासामागे कोणताही शॉर्टकट नाही, हेच या ट्रान्सफॉर्मेशनचं खरं गुपित असल्याचं प्रिया ठामपणे सांगते. सातत्य, संयम आणि भूमिकेसाठी स्वतःला बदलण्याची तयारी यामुळेच हा बदल शक्य झाला.

logo
marathi.freepressjournal.in