क्रीडा

एकच लक्ष्य

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नियोजित केलेले सराव सामनेही टीम इंडियाला खेळावे लागणार आहेत

वृत्तसंस्था

संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष लागून राहिलेल्या टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला रविवारपासून सुरुवात होत असली, तरी भारताचा पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध रविवार, २३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. म्हणजे, सरावासाठी आणि वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी आणखी एक आठवडा टीम इंडियाला मिळणार आहे. मग प्रश्न मनात निर्माण होतो की, ऑस्ट्रेलियात जाण्याची घाई कशापायी केली? दमछाक करून घेण्यासाठी की, सराव सामन्यातील संभाव्य अपयशाने खचून जाण्यासाठी? पहिल्या सराव सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला; पण दुसऱ्या सराव सामन्यात पराजय झाला. सराव करताना एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला तर मग काय करायचे? त्यातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नियोजित केलेले सराव सामनेही टीम इंडियाला खेळावे लागणार आहेत.

अन्य देश काय करतात ते पाहिले की, आपल्या नियोजनाची कीव करावीशी वाटते. पाकिस्तान आणि इंग्लंड यांनी वन-डे नव्हे; तर टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळायचे भान ठेवत तब्बल सात सामन्यांची टी-२० मालिका आयोजित केली. त्यानंतर पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात तिरंगी टी-२० मालिका झाली. या तिरंगी मालिकेत पाकिस्तानने चमकदार कामगिरी केली. तिरंगी मालिकेत पाकिस्तानने बांगलादेशचा सात गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली. त्यानंतर पाकिस्तानने न्यूझीलंडवर पाच विकेट‌्स आणि तीन चेंडू राखून विजय मिळवत टी-२० तिरंगी मालिकेचे विजेतेपद पटकाविले. न्यूझीलंडला त्यांच्याच घरात नमवून तिरंगी मालिका जिंकल्यामुळे टी-२० विश्वचषक स्पर्धेतील भारताविरुद्धच्या सामन्यासाठी त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे, निश्चितच.

भारताने मात्र अशा आपसूक सरावाची आणि मनोधैर्य वाढण्याची संधी वाया दवडली, असे राहून-राहून वाटते, खरोखरच. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेऐवजी टी-२० मालिका असती तर सरावाबरोबरच संघात एकवाक्यता निर्माण होण्यासही मदत झाली असती, हमखास. टीम इंडियाने पर्थमध्ये तळ ठोकला आहे, म्हणे. चेंडूची उसळी आणि गती यांच्याशी जुळवून घ्यायचे आहे ना! त्यासाठीच तर त्यांना पर्थला जाण्याची भारी घाई झाली होती! ऑस्ट्रेलियात सराव सामनेही भरपूर खेळायचे आहेत. मग मायदेशातच जास्तीचे अधिकृत आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले असते तर चालले नसते का? टी-२० मालिका नियोजित असती, तर मंगळवारी शेवटचा सामना खेळून ऑस्ट्रेलियाला रवाना झाल्यानंतरही पुरेसा वेळ खेळपट्ट्या, हवामान, वातावरण यांच्याशी एकरूप होण्यासाठी मिळणार होता; पण आता बोलून काही उपयोग नाही. ‘बूँद से गयी, वह हौद से नहीं आती।’ हेच खरे.

टी-२० विश्वचषक संघाचा राखीव खेळाडू दीपक चहर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत दुखापतग्रस्त झाला आणि टी-२० विश्वचषक स्पर्धेलाच मुकला. आता सराव सामन्यात आणखी कोणाला दुखापत झाल्यास पर्यायच आजमावत बसायचे का? जायबंदी जसप्रीत बुमराहच्या जागेवर मोहम्मद शमीची निवड भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एकदाची जाहीर केली आहे. तेव्हा आता बुमराहला पर्याय म्हणून अनुभवाच्या जोरावर शमी हाच कामी येणार आहे. त्यातच चहरही दुखापतग्रस्त झाल्याने ‘दुष्काळात तेरावा महिना’ म्हणावा, तशी समस्येत आणखीनच भर पडली आहे. आता मोहम्मद सिराज आणि शार्दूल ठाकूर हे राखीव खेळाडू झाले आहेत. बलाढ्य संघांविरुद्ध टीम इंडियाचे सराव सामने होणार असल्याने भारतीय खेळाडूंची मोठीच कसोटी लागणार आहे.

पहिल्या सराव सामन्यात वेस्टर्न ऑस्ट्रेलियावर टीम इंडियाने विजय मिळवल्याने भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलियातील वातावरणात बऱ्यापैकी रुळल्याचे समाधान वाटत असतानाच दुसऱ्या सराव सामन्यात टीम इंडियाला वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडूनच पराभव पत्करावा लागला आणि जीवही मग उगाचच टांगणीला लागला. टीम इंडिया १६८ इतक्या माफक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासही अपयशी ठरली आणि ३६ धावांनी पराभूत झाली. टीम इंडियाला २० षटकांत आठ विकेट्स गमावून केवळ १३२ धावा करता आल्या. आता सांगा, ‘नाचता येईना अंगण वाकडे’ असे कोणी हिणवू नये, म्हणून खेळपट्ट्यांचा ठाव घेण्यासाठी काही दिवस आधीच धाव घेत, ठाण मांडण्याचे टीम इंडियाला काय फळ मिळाले?

तेव्हा मुद्दा एवढाच आहे की, कोणत्याही वातावरणात, मैदानात खेळण्याची कणखर मानसिकता सर्वात महत्त्वाची आहे. सराव सामन्यात खेळाडू घाम गाळून सराव करतील, निःसंशय. त्याहीपेक्षा अधिकृत सामन्यात एखादा विक्रम खुणावत असेल, अनोख्या उपलब्धीची नोंद होणार असेल, तर हिरिरीने सर्वस्व अर्पण करून हिरो होण्याचा जीवापाड प्रयत्न करतील. म्हणूनच सराव सामन्याऐवजी अधिकृत सामने खेळण्यावर भर असायला हवा होता, खचितच. खेळपट्ट्यांचा निष्कारण धसका घ्यायला नको होता. टी-२० आशिया चषक २०२२ मधील टीम इंडियाची निराशाजनक कामगिरी संघ व्यवस्थापनाने खरेच का एवढी मनाला लावून घ्यायची होती?

ऑस्ट्रेलियात आता केवळ सराव सामन्यांमध्ये विजय मिळवून भागणार नाही; तर प्रतिस्पर्ध्यांना दरारा वाटेल अशी चमकदार कामगिरी करून दाखवावी लागेल. ‘कोण आला रे, कोण आला’ असे प्रतिस्पर्ध्यांना वाटण्याइतपत दमदार धमक निर्माण करावी लागेल. असे झाले तरच टी-२० विश्वचषकावर भारताला आपला मजबूत दावा ठोकता येईल.

या स्पर्धेत भारताला ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघांशी मुकाबला करायचा आहे. म्हणूनच स्थानिक संघाकडून झालेला पराभव टीम इंडियाला नाउमेद करणारा ठरू नये, हीच अपेक्षा. दुसऱ्या सराव सामन्यातील पराभवामुळे टीम इंडियाची घडी अजून बसलेली नाही का, असाही प्रश्न ऑफ स्टम्प बाहेरील चेंडू बॅटला चाटून जावा, तसा मनाला चाटून जातो. तेव्हा संघबांधणी नीट झाली आहे का, हेही तपासून पाहणे जरुरीचे आहे. वास्तविक, जडणघडण मायदेशातच अपेक्षित होती; पण अजूनही वेळ गेलेली नाही. आता किमान सराव सामन्यांमध्ये तरी एकच एक संघ नीट बांधून मुख्य सामन्यांसाठी व्यवस्थित घडी बसविली पाहिजे.

दुसऱ्या सराव सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला; पण गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करून प्रभाव पाडला, हेही नसे थोडके. कौतुकाची अशी थापही खेळाडूंना मानसिक आधार देण्यासाठी पुरेशी असते. दुसऱ्या सराव सामन्यात रविचंद्रन अश्विन कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे चमकला. सामन्यातील सर्वोत्तम गोलंदाजी करत त्याने तीन विकेट्स मिळविले. या सामन्यात अश्विनने चक्क सहा चेंडूंत खेळ फिरविला. पहिल्या तीन षटकांमध्ये अश्विन महागडा ठरला; पण चौथ्या षटकामध्ये त्याने कमाल केली. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच सुरू केलेली असतानाच अश्विनच्या फिरकीने चमत्कार केला.

अश्विनने शेवटच्या षटकामध्ये फक्त दोन धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या. त्याची हॅट‌्‌ट्रिक घेण्याची संधी हुकली. चौथ्या चेंडूवर त्याने विकेट मिळविली. दरारा म्हणतात, तो हाच. असा धाक प्रत्येक खेळाडूने निर्माण केला पाहिजे. अश्विनने आपला दरारा निर्माण करून वर्ल्डकपच्या प्लेइंग इलेव्हनसाठी आपली उमेदवारी पक्की केली आहे, म्हणा ना! युझवेंद्र चहल असताना अश्विनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी तशी दुरापास्तच दिसतेय, म्हणा. निवडकर्त्यांना मात्र त्याने ‘खाजवा की डोकं...’ असाच इशारा दिला आहे, जणू.

पहिल्या सराव सामन्यात फ्लॉप ठरलेला मध्यमगती गोलंदाज हर्षल पटेलची कामगिरी दुसऱ्या सामन्यात हर्षभरित करणारी ठरली. हर्षलने चार षटकांमध्ये २७ धावा देऊन दोन फलंदाज गारद केले. अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. एक फलंदाज चपळ क्षेत्ररक्षणामुळे बाद झाला. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला आठ गडी बाद १६८ धावाच करता आल्या. निर्धारित लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर के. एल. राहुलने ५५ चेंडूंत ७४ धावा करून प्रतिस्पर्ध्यांना हूल दाखविली. राहुलसोबत सलामीला आलेला ऋषभ पंत प्रभाव पाडू शकला नाही. राहुल वगळता टीम इंडियातील एकही फलंदाज टिकू शकला नाही. रोहित शर्मा फलंदाजीला आला नाही. त्यामुळेसुद्धा चिंतेत भर पडली.

तेव्हा, सराव सामने खेळताना फाजील आत्मविश्वासाच्या नादात इजा होऊ न देण्याची दक्षता प्रत्येक खेळाडूने बाळगण्याचीदेखील तितकीच आवश्यकता आहे. काहीही झाले, तरी विश्वचषक जिंकण्यासाठी आता सरावापेक्षाही स्पर्धेतील सामने हेच एकच लक्ष्य असले पाहिजे.

मुख्यमंत्रीपदाचा फैसला आज; महायुतीचे नेते व केंद्रीय संसदीय मंडळ घेणार निर्णय

महायुतीत मंत्रिपदासाठी २१-१२-१० चा फॉर्म्युला

आजपासून सुरू होणारे संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; अदानी, मणिपूरवर चर्चा करा! सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांची मागणी

यशस्वी, विराटचा शतकी तडाखा; भारताचा दुसरा डाव ४८७ धावांवर घोषित; ऑस्ट्रेलियाची ३ बाद १२ अशी अवस्था

यूपीतील हिंसाचारात तिघांचा मृत्यू; २० पोलिसांसह अनेक जण जखमी