Photo : X
क्रीडा

नबीसह सहा गोलंदाजांना पाचारण; अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात नेट बॉलर म्हणून दाखल

जम्मू आणि काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबीसह सहा गोलंदाजांचा अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात नेट बॉलर (सरावातील गोलंदाज) म्हणून समावेश करण्यात आला आहे. आयपीएलमध्ये खेळलेल्या खेळाडूंनी विश्रांतीला प्राधान्य दिले, तर या सहा जणांपैकी एखाद्याचा मुख्य संघातही समावेश केला जाऊ शकतो.

Swapnil S

मुंबई : जम्मू आणि काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबीसह सहा गोलंदाजांचा अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात नेट बॉलर (सरावातील गोलंदाज) म्हणून समावेश करण्यात आला आहे. आयपीएलमध्ये खेळलेल्या खेळाडूंनी विश्रांतीला प्राधान्य दिले, तर या सहा जणांपैकी एखाद्याचा मुख्य संघातही समावेश केला जाऊ शकतो.

नबीव्यतिरिक्त आयपीएलमध्ये हैदराबादकडून खेळणारा उत्तर प्रदेशचा लेगस्पिनर झीशान अन्सारी, डावखुरा मनगटी फिरकीपटू शिवांग कुमार, डावखुरा वेगवान गोलंदाज गुर्जापनित सिंग, आयपीएलमध्ये लक्ष वेधणारा वेगवान गोलंदाज प्रिन्स यादव आणि ऑफस्पिनर सारांश जैन हे अन्य पाच खेळाडू सरावाचा भाग असतील. हे सर्व गोलंदाज कसोटीच्या तयारीसाठी भारतीय संघाला मदत करणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले.

आयपीएलचा १९वा हंगाम ३१ मे रोजी संपन्न झाला. आता ६ जूनपासून भारतीय क्रिकेट संघाचा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम सुरू होईल. भारत-अफगाणिस्तान यांच्यात मुल्लानपूर येथे कसोटी सामना रंगणार असून त्यानंतर उभय संघांत ३ सामन्यांची एकदिवसीय मालिकादेखील होणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणारे भारताचे सर्व खेळाडू गुरुवारपर्यंत मुल्लानपूर येथे दाखल होईल. मात्र जे खेळाडू मुल्लानपूर येथे दाखल झालेले आहेत. त्यांचा सराव मंगळवारपासूनच सुरू झालेला आहे.

या संघात आयपीएलमध्ये खेळलेले मोहम्मद सिराज व प्रसिध कृष्णा आहेत. जसप्रीत बुमराला विश्रांती देण्यात आली आहे. मात्र सिराज व कृष्णा ३१ मे रोजी अंतिम फेरीत खेळले. तसेच त्यांना पाच दिवसांत सलग तीन सामने खेळावे लागले होते. अतिउष्ण हवामान आणि लागोपाठच्या सामन्यांमुळे सिराज आणि कृष्णा नेटमध्ये पूर्ण ताकदीने गोलंदाजी करू शकत नाहीत. तसेच अधिक जोर लावल्यास दोघांनाही दुखापत होण्याची शक्यताही आहे. त्यामुळे फलंदाजांना पुरेशा सरावाची गरज असल्याने या ६ नेट गोलंदाजांना पाचारण करण्यात आले आहे. एखाद्या प्रमुख गोलंदाजाने कसोटीतून विश्रांती घेण्याची विनंती केल्यास नेट बॉलरपैकी १-२ जणांचा मुख्य संघात समावेश केला जाईल, असे समजते.

२९ वर्षीय नबीने यंदा जम्मू-काश्मीरला रणजी करंडक जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावताना ६० बळी मिळवले. मात्र त्याला भारतीय कसोटी संघात स्थान न मिळाल्याने अनेकांनी टीका केली होती. पंजाबचा वेगवान गोलंदाज गुर्नूर ब्रारला नबीऐवजी प्राधान्य देण्यात आले. नबीला वगळल्यामुळे माजी कर्णधार आणि माजी निवड समिती अध्यक्ष दिलीप वेंगसकर यांनीही रणजी करंडकातील कामगिरीला महत्त्व दिले जात नसल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. नबीचा अद्याप १५ सदस्यीय मुख्य संघात समावेश करण्यात आलेला नसला, तरी त्याचा राखीव खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. गुजरात टायटन्सचे सात खेळाडू या कसोटी संघात सामील आहेत.

नबीची कामगिरी

  • १० रणजी सामन्यांत सर्वाधिक ६० बळी.

  • यंदाच्या रणजी हंगामातील सर्वोत्तम खेळाडू.

  • १२.५६ची गोलंदाजी सरासरी, गरजेवेळी फलंदाजी करण्याचीही क्षमता.

साईराज बहुतूले फिरकी प्रशिक्षक

मुंबईसह भारताचे माजी फिरकीपटू साईराज बहुतुले यांची भारतीय संघाच्या फिरकी प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. ५३ वर्षीय बहुतूले अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यापासून ही सूत्रे स्वीकारतील. नुकताच झालेल्या आयपीएलमध्ये बहुतूले पंजाब संघाचे फिरकी प्रशिक्षकपद भूषवत होते. त्यांनी यापूर्वी केरळ व बंगालच्या रणजी संघालाही मार्गदर्शन केले आहे. तसेच बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत त्यांनी युवा फिरकीपटूंना मार्गदर्शन केले आहे. तसेच २०१८ ते २०२१ या काळात ते राजस्थान रॉयल्सचे फिरकी प्रशिक्षक होते. १९९७मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या बहुतुले यांनी फक्त २ कसोटी व ८ एकदिवसीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. मात्र निवृत्तीनंतर त्यांनी प्रशिक्षणात चांगले यश मिळवले. गेल्या काही वर्षांत भारतीय फिरकीपटूंची कसोटीतील कामगिरी खालावलेली असल्याने बहुतुले यांची निवड संघासाठी फलदायी ठरेल, असे अपेक्षित आहे. सध्या गौतम गंभीर भारताचा मुख्य प्रशिक्षक असून रायन टेन डस्काटे सहाय्यक प्रशिक्षक, मॉर्ने मॉर्केल गोलंदाजी प्रशिक्षक, सितांशू कोटक फलंदाजी प्रशिक्षक, टी. दिलीप क्षेत्ररक्षण प्रशिक्षक या सर्वांचा प्रशिक्षकीय फळीत समावेश आहे. बहुतुले मर्यादित षटकांच्या प्रकारातही भारतीय फिरकीपटूंना मार्गदर्शन करतील.

Mumbai Rain : पावसाच्या हलक्या सरींमध्येच अंधेरी सबवे पाण्याखाली; BMC च्या मान्सूनपूर्व तयारीवर प्रश्नचिन्ह

तीन ब्रेन-डेड रुग्णांच्या कुटुंबीयांकडून अवयवदान; अनेकांना मिळाले जीवनदान; मुंबईत सामाजिक जाणिवेचे दर्शन

‘लाडकी बहीण’ योजनेत मोठा घोटाळा; SIT चौकशीची सुप्रिया सुळे यांची मागणी

दहशतवाद्यांच्या रडारवर भिवंडीतील नारपोली पोलीस ठाणे?

बुलेट ट्रेन प्रकल्पाला आणखी वेग; पालघरमधील तिसऱ्या पर्वतीय बोगद्याचे 'ब्रेकथ्रू' पूर्ण