पॅरिस : भारताचा वैयक्तिक प्रकारातील पहिला ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्राला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतर्फे (आयओसी) ऑलिम्पिक चळवळीतील अमूल्य योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा ‘ऑलिम्पिक ऑर्डर’ बहुमानाला सन्मानित करण्यात येणार आहे. पॅरिस ऑलिम्पिक सोहळ्याच्या समारोपाच्या आदल्या दिवशी १० ऑगस्टला होणाऱ्या ‘आयओसी’च्या १४२व्या सभेमध्ये बिंद्राला या सन्मानाने गौरविण्यात येईल.
बिजिंग २००८ ऑलिम्पिक स्पर्धेत अभिनवने १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक मिळवले होते. अभिनव २०१० ते २०२० कालावधीत आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाच्या खेळाडू समितीचे सदस्य होते. या दरम्यान २०१४ पासून ते अध्यक्ष होते. अभिनव सध्या २०१८ पासून ‘आयओसी’च्या खेळाडू समितीचा सदस्य आहे.
‘आयओसी’च्या कार्यकारी समितीने ऑलिम्पिक चळवळीतील योगदानाबद्दल तुला ‘ऑलिम्पिक ऑर्डर’ बहुमानाने गौरविण्याचा निर्णय घेतला आहे. हे तुला कळवताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे, असे ‘आयओसी’अध्यक्ष थॉमस बाख यांनी अभिनवला २० जुलै रौजी पाठविलेल्या संदेशात म्हटले आहे.
‘ऑलिम्पिक ऑर्डर’ हा ‘आयओसी’च्या वतीने देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार असून, तो ऑलिम्पिक चळवळीतील विशिष्ट योगदानासाठी दिला जातो. ज्या व्यक्तीने वैयक्तिक कर्तृत्वातून ऑलिम्पिक आदर्श घालून दिला, क्रीडा जगतात उल्लेखनीय गुणवत्ता प्राप्त केली किंवा ऑलिम्पिकसाठी उत्कृष्ट सेवा प्रदान केली अशा व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी एक समिती पुरस्कार्थींची नामांकने ‘आयओसी’कडे प्रस्तावित करते आणि त्यावर कार्यकारी मंडळाकडून निर्णय घेतला जातो. प्रतिष्ठेचा बहुमान मिळाल्याबद्दल केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी अभिनव बिंद्राचे अभिनंदन केले.
दरम्यान, स्पर्धेसाठी दाखल होणाऱ्या १०,५०० खेळाडूंसह लाखो क्रीडा पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तब्बल ४५ हजार पोलीस तैनात करण्यात आले असून, त्यांना १० हजार लष्करी सैनिकांच्या तुकडीची जोड देण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्था कडक राहण्यासाठी उभारण्यात आलेल्या छावण्या अशा आहेत की, शहरातील कोणत्याही ऑलिम्पिक केंद्रावर सुरक्षा जवान ३० मिनिटांत पोहोचू शकतात.