अहमदाबाद : भारताचा युवा डावखुरा सलामीवीर अभिषेक शर्मा टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलग तीन सामन्यांत शून्यावरच बाद झाला आहे. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी ज्या खेळाडूकडून सर्वाधिक धावा फटकावण्याच्या अपेक्षा होत्या, तोच संघर्ष करत असल्याने अनेक माजी क्रिकेटपटू तसेच तज्ज्ञांनी अभिषेकला विविध सल्ले दिले आहेत. सुपर-आठ फेरीत अभिषेकची बॅट तळपणे भारतासाठी फार महत्त्वाचे असेल.
भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेत यंदाही गेल्या वेळेप्रमाणे २० संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येकी पाच संघांचा एक असे चार गट बनवण्यात आले आहेत. भारत २०१६नंतर प्रथमच टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. रोहितच्या नेतृत्वात २०२४मध्ये भारताने टी-२० विश्वचषक उंचावला. आता भारतापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान आहे.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारताने अ-गटातून अग्रस्थानासह आगेकूच करताना सलग चार विजय नोंदवले. भारताने सर्वप्रथम वानखेडेवर अमेरिकेला पराभूत केले. मग नवी दिल्ली येथे नामिबियाला धूळ चारली. कोलंबो येथे पाकिस्तानला चीतपट करून भारताने सुपर-आठ फेरीच्या पहिल्या गटातील स्थान पक्के केले. मग बुधवारी चौथ्या साखळी लढतीत नेदरलँड्सवर मात करून भारताने विजयी चौकार लगावला.
आता २१ फेब्रुवारीपासून सुपर-आठ फेरी सुरू होईल. या फेरीसाठी भारताच्या गटात दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे यांचा समावेश असेल. मुख्य म्हणजे हे चारही संघ साखळी फेरीत आपापल्या गटात अग्रस्थानी राहिले. सुपर-आठ फेरीच्या दुसऱ्या गटात पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड व श्रीलंका हे संघ आहेत. या फेरीच्या अखेरीस आघाडीवर असलेले दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र होतील. ७ मार्चला अहमदाबाद येथे अंतिम सामना खेळवण्यात येईल.
दरम्यान, भारतीय संघाची विजयी घोडदौड सुरू असली, तरी २५ वर्षीय अभिषेकच्या कामगिरीची संघाला चिंता आहे. आजारी असल्याने अभिषेक नामिबियाविरुद्ध खेळू शला नव्हता. तर अमेरिका, पाकिस्तान व नेदरलँड्स या संघांविरुद्ध तो अनुक्रमे १, ४ व ३ चेंडू खेळून भोपळा ही न फोडता माघारी परतला. म्हणजेच ३ सामन्यांत त्याची धावसंख्या शून्य आहे. विशेषत: पाकिस्तान व नेदरलँड्सने पहिल्याच षटकात अभिषेकसमोर ऑफस्पिनरला आणून त्याला जखडून ठेवले. तसेच यष्ट्यांच्या दिशेने गोलंदाजी केली. त्यामुळेच अभिषेक मोठा फटका खेळण्याच्या नादात झेलबाद किंवा त्रिफळाचित झाला. आता सुपर-आठ फेरीतही आफ्रिका, झिम्बाब्वे व विंडीजचे संघ त्याच्या या कमकुवत बाजूचा लाभ उचलू शकतात. म्हणूनच सुनील गावस्कर यांनी अभिषेकला घाई न करण्याचे सुचवले आहे.
“अभिषेकवर कदाचित अपेक्षांचे दडपण असावे. तो उत्तम फलंदाज आहे. मात्र पहिल्या षटकात फिरकीपटू समोर असेल, तर अतिघाई करणे त्याने टाळावे. विश्वचषकात बहुतांश संघ भारताविरुद्ध फिरकीपटूनेच सुरुवात करत आहेत. कारण आपले आघाडीचे तिन्ही फलंदाज डावखुरे आहेत. अशा स्थितीत ऑफस्पिनर प्रभावी ठरू शकतो. चेंडूच्या दिशेविरुद्ध फटके खेळताना अभिषेक बाद आहे. पहिले १-२ षटक त्याने चौकार-षटकार लगावला नाही, तरी नंतरला निर्धाव चेंडूंची भरपाई करण्याची त्याच्याकडे क्षमता आहे,” असे गावस्कर म्हणाले.
“अभिषेकने स्वत:ला वेळ देणे आवश्यक आहे. त्याचा सूर हरवलेला नाही. न्यूझीलंडविरुद्ध काही आठवड्यांपूर्वीच त्याने दणदणीत अर्धशतके झळकावली होती. तो सुपर-आठ फेरीत भारतासाठी नक्कीच चांगली कामगिरी करेल,” असे माजी कर्णधार रवी शास्त्री यांनी सांगितले. तसेच संजय बांगर यांनी अभिषेकला एकेरी धाव घेत खाते उघडण्याचे किंवा ऑफस्पिनर समोर असल्यास इशान किशनने पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर स्ट्राइक घेण्याचे सुचवले आहे. एकूणच आता अभिषेकची सगळीकडे चर्चा सुरू आहे.
आघाडीच्या फलंदाजांचा क्रम कायम : डस्काटे
भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डस्काटे यांनी सुपर-आठ फेरीच्या पहिल्या सामन्यासाठी भारतीय फलंदाजी क्रमात बदल करण्याची शक्यता नाकारली आहे. अभिषेक, इशान किशन, तिलक वर्मा असे तिघेही डावखुरे फलंदाज भारताच्या आघाडीच्या फळीत आहेत. “प्रत्येक संघ आमच्याविरुद्ध फिरकीपटूद्वारे आक्रमण करेल, याची कल्पना आहे. सॅमसनचा पर्यायही आमच्याकडे उपलब्ध आहे. मात्र संघ व्यवस्थापनाने एकमताने या तीन खेळाडूंची निवड केलेली आहे. या तिघांमध्ये फिरकीचा नेटाने सामना करण्याची क्षमता व अफाट गुणवत्ता आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापन तिघांच्याही पाठीशी खंबीरपणे असेल,” असे डस्काटे म्हणाले.
एकीकडे अभिषेक धावांसाठी संघर्ष करत असताना तिलकही चाचपडताना दिसत आहे. प्रत्येक लढतीत त्याने २५ ते ३० धावा केल्या असल्या, तरी फिरकीपटूंसमोर तो मुक्तपणे फटके खेळू शकलेला नाही. नेदरलँड्सविरुद्ध तिलकने २७ चेंडूंत ३१, पाकिस्तानविरुद्ध २४ चेंडूंत २५, तर नामिबियाविरुद्ध २१ चेंडूंत २५ धावा केल्या. त्यामुळेच पॉवरप्लेनंतर भारताची धावगती मंदावत आहे. किशन मात्र सध्या उत्तम लयीत असला, तरी तोसुद्धा सलग दोन लढतीत ऑफस्पिनरसमोरच बाद झाला आहे.
हे माहीत आहे का?
अभिषेक हा टी-२० विश्वचषकात सलग तीन सामन्यांत शून्यावर बाद होणारा भारताचा पहिलाच फलंदाज ठरला. २०२४मध्ये विराट कोहली दोन वेळा शून्यावर बाद झालेला.
विश्वचषकात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्यांच्या यादीत अभिषेक आता संयुक्तपणे अग्रस्थानी आहे. रिची बेरिंगटन, आंद्रे फ्लेचर, रॉजर मुकासा, तांझिद हसन, रेगिस चकाब्वा हे खेळाडूसुद्धा प्रत्येकी ३ वेळा शून्यावर बाद झाले आहेत. त्यामुळे आता आणखी एका लढतीत अभिषेक भोपळा न फोडता माघारी झाला, तर नकोसा विक्रम त्याच्या नावावर नोंदला जाईल.
श्रीलंकेचा दसुन शनका आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक १६ वेळा शून्यावर बाद झाला आहे. भारतीयांचा विचार करता रोहित शर्मा (१२ वेळा) या यादीत नवव्या स्थानी आहे.