अजिंक्य रहाणे 
क्रीडा

मुंबईकर अजिंक्य रहाणे क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्त; 'तुम्ही मला कधीच परके मानले नाहीत'; इन्स्टाग्रामवर भावनिक Video टाकत केली घोषणा

२०२०-२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापतग्रस्त भारतीय संघाचे नेतृत्व करत ऐतिहासिक कसोटी मालिका विजय मिळवून देणारा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. पुढे जाण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे ३८ वर्षीय मुंबईकर रहाणेने स्पष्ट केले.

Swapnil S

मुंबई : २०२०-२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापतग्रस्त भारतीय संघाचे नेतृत्व करत ऐतिहासिक कसोटी मालिका विजय मिळवून देणारा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. पुढे जाण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे ३८ वर्षीय मुंबईकर रहाणेने स्पष्ट केले.

२०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या रहाणेने भारतासाठी ८५ कसोटी, ९० एकदिवसीय आणि २० टी-२० सामने खेळले आहेत. २०२३ मधील वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर तो भारतीय संघाकडून खेळलेला नाही. तरीही या वर्षाच्या आयपीएलपर्यंत रहाणेने संघात पुनरागमन करण्याची आशा व्यक्त केली होती. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील व्हिडीओ संदेशात रहाणे म्हणाला की, “आयुष्याचे सत्य हेच आहे की प्रत्येक गोष्टीची सुरुवात असते आणि अंतही असतो. जेव्हा ती वेळ येते, तेव्हा तुम्हाला त्याचा आदर करावा लागतो आणि पुढे जावे लागते. मी माझ्या फलंदाजीत नेहमीच वेळेवर विश्वास ठेवला आणि त्याचे महत्त्व समजून घेतले. आज मला वाटते की आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि सर्व प्रकारच्या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर करण्याची योग्य वेळ आली आहे.” ‘कॅप नंबर २७८-साइनिंग ऑफ’ असे कॅप्शन त्याने सोबत जोडले.

उजव्या हाताच्या या फलंदाजाने ८५ कसोटी सामन्यांत ३८.४६ च्या सरासरीने ५,०७७ धावा केल्या असून त्यात १२ शतके आणि २६ अर्धशतकांचा समावेश आहे. ९० एकदिवसीय सामन्यांत रहाणेने ३५.२६ च्या सरासरीने २,९६२ धावा केल्या, ज्यामध्ये ३ शतके आणि २४ अर्धशतके समाविष्ट आहेत. तर २० टी-२० सामन्यांमध्ये रहाणेने ३७५ धावा केल्या आहेत.

डोंबिवलीतून लहानपणी सरावासाठी प्रवास करण्याच्या दिवसांपासून मी या खेळाला सर्वस्व दिले, असे सांगताना रहाणे पुढे म्हणाला की, “मी फक्त देश आणि संघाला स्वतःपेक्षा पुढे ठेवले. प्रामाणिकपणे खेळलो आणि तुमचा हेतू योग्य असेल तर खेळ तुमची काळजी घेतो यावर माझा नेहमीच विश्वास राहिला आहे. भारतीय क्रिकेटपटू म्हणून माझे प्रकरण संपत असले तरी या खेळासोबतचा माझा प्रवास संपत नाही. पुढील पिढीला मदत करण्यासाठी मी उत्सुक आहे.”

आयपीएलमध्ये रहाणेने मुंबई, चेन्नई, राजस्थान, पुणे, दिल्ली व कोलकाता या ६ फ्रँचायझींचे प्रतिनिधित्व केले आहे. २०२३-२४ च्या हंगामात त्याने मुंबईला ४२वे रणजी करंडक विजेतेपद मिळवून दिले होते.

मेलबर्नवरील खेळी संस्मरणीय

रहाणेच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा क्षण २०२१ मध्ये आला, जेव्हा नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत त्याने भारतीय संघाचे नेतृत्व केले. ॲडलेडमधील पहिल्या कसोटीत ३६ धावांत ऑलआऊट झाल्यानंतर कोहली पितृत्व रजेवर भारतात परतला होता. त्यानंतर दुखापतींमुळे जसप्रीत बुमरा आणि रवींद्र जडेजासारखे महत्त्वाचे खेळाडू बाहेर असतानाही रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच भूमीत २-१ असा पराभव करत बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली. ब्रिस्बेनमधील गॅबा येथील चौथ्या कसोटीत भारताने ३ गडी राखून मिळवलेला विजय ऐतिहासिक ठरला. मात्र या पुनरागमनाची सुरुवात दुसऱ्या कसोटीत झाली, जिथे रहाणेने ११२ धावांची धडाकेबाज खेळी साकारून भारताला विजयाची दिशा दाखवली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : १४ फूट उंच झोपड्यांच्या कारवाईवरून विरोधक आक्रमक; काँग्रेस, ठाकरेंच्या शिष्टमंडळांनी घेतली आयुक्तांची भेट

समुद्रातील तरंगता कचरा हटवण्यासाठी रोबोटिक बोटी; ३.६ कोटींच्या प्रकल्पाला BMC ची मंजुरी, गेट वे, बधवार पार्क येथील प्रयोग यशस्वी

मुंबई मेट्रो वनची व्यवस्थापन क्षेत्रात भरारी; एकात्मिक आयएमएस-आयएसएमएस प्रमाणपत्र मिळवणारी देशातील पहिली मेट्रो

Mira-Bhayandar : कृत्रिम तलावांतील मूर्तींवर जेसीबीने भराव; पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

ठाण्यातील आरोग्य केंद्रांवर करडी नजर