क्रीडा

अजिंक्य रहाणे कर्णधारपदावरून पायउतार; आगामी रणजी स्पर्धेत फक्त खेळाडू म्हणून करणार मुंबईचे प्रतिनिधित्व

आगामी देशांतर्गत हंगाम लवकरच सुरू होणार असून त्यासाठी नव्या नायकाला घडवण्यास हीच योग्य वेळ असल्याचे मला वाटते. त्यामुळे मी मुंबई संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होत आहे, असे रहाणेने सांगितले. रहाणे अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला नसून देशांतर्गत हंगामाच्या बळावर त्याला अद्यापही भारताच्या कसोटी संघात पुनरागमन करण्याची आशा आहे.

Swapnil S

मुंबई : ३७ वर्षीय अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने गुरुवारी मुंबईच्या रणजी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. आगामी देशांतर्गत क्रिकेट हंगामात रहाणे फक्त खेळाडू म्हणून मुंबईचे प्रतिनिधित्व करणार आहे.

एकेकाळी भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवलेल्या रहाणेने २०२४मध्ये मुंबईला विक्रमी ४२व्यांदा रणजीचे जेतेपद मिळवून दिले. मात्र २०२५च्या हंगामातील अपयश, वाढते वय व भविष्याचा विचार करता रहाणेने आता नव्या कर्णधाराला घडवण्याचा निर्णय घेतला आहे. रहाणेने मुंबईसाठी २०१ प्रथम श्रेणी सामन्यांत १४ हजार धावा केल्या असून यामध्ये ४१ शतकांचा समावेश आहे. यंदाच्या रणजी हंगामाला १५ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे.

रहाणेच्या नेतृत्वात मुंबईने २०२४च्या रणजी जेतेपदासह इराणी चषकही जिंकला. तसेच टी-२० व एकदिवसीय प्रकारात श्रेयस अय्यर मुंबईचे कर्णधारपद भूषवत असला, तरी रहाणे वरिष्ठ खेळाडू म्हणून छाप पाडत आहे. मुंबईने २०२४मध्ये मुश्ताक अली टी-२० स्पर्धेची ट्रॉफी उंचावली. त्यामध्ये रहाणेनेच ४६९ धावा फटकावून स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला.

२०२५च्या आयपीएलमध्ये रहाणे कोलकाताचा कर्णधार होता. मात्र फलंदाज व नेतृत्व या दोन्ही विभागांत तो फारशी छाप पाडू शकला नाही. रहाणे अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला नसून देशांतर्गत हंगामाच्या बळावर त्याला अद्यापही भारताच्या कसोटी संघात पुनरागमन करण्याची आशा आहे.

"मुंबईच्या संघाचे नेतृत्व करण्यासह जेतेपद मिळवणे माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. मात्र आगामी देशांतर्गत हंगाम लवकरच सुरू होणार असून त्यासाठी नव्या नायकाला घडवण्यास हीच योग्य वेळ असल्याचे मला वाटते. त्यामुळे मी मुंबई संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होत आहे. मात्र खेळाडू म्हणून यापुढेही मी तिन्ही प्रकारांत मुंबईचे प्रतिनिधित्व करण्यास उत्सुक आहे." - अजिंक्य रहाणे

रमाबाई आंबेडकर नगरवासीयांचे स्वप्न २ वर्षांत होणार पूर्ण! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

तुम्ही राज्यांच्या अधिकारावर अतिक्रमण करत आहात? सर्वोच्च न्यायालयाने ED ला फटकारले

महसूल विभागाची मुंबईकरांना दिवाळी भेट! महत्त्वाच्या कागदपत्रांच्या नोंदणीसाठीची 'ही' अट रद्द

अखेर वैभव खेडेकर यांचा भाजपमध्ये प्रवेश; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले स्वागत

बिबट्या व हरणाची पिल्ले मी देखील पाळली; नाईकांच्या खुलाशावर पाटकरांचा संताप