चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत टीम इंडियाने शानदार विजयी सलामी देत बांगलादेशला ६ गडी आणि २१ चेंडू राखून धूळ चारली. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (५३ धावांत ५ बळी) केलेल्या प्रभावी माऱ्यानंतर युवा सलामीवीर शुभमन गिलने (१२९ चेंडूंत नाबाद १०१ धावा) साकारलेल्या झुंजार शतकाच्या बळावर भारताने बांगलादेशने दिलेले २२९ धावांचे आव्हान सहज पार केले. या सामन्यात गिलने ठोकलेल्या शतकी खेळीशिवाय कर्णधार रोहित शर्मा, स्टार फलंदाज विराट कोहलीच्या नावावरही काही विक्रम नोंदवले गेले.
बघूया सामन्यातील खास आकडे -
- ११,००० : भारताचा कर्णधार रोहित शर्माने या लढतीत एकदिवसीय क्रिकेटमधील ११ हजार धावांचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारा तो भारताचा चौथा फलंदाज ठरला. रोहितच्या आधी सचिन तेंडुलकर (१८,४२६), विराट कोहली (१३,९६३), सौरव गांगुली (११,२२१) यांचा क्रमांक लागतो. रोहितला या लढतीपूर्वी ११ हजार धावांसाठी फक्त १२ धावांची गरज होती. त्याने मुस्तफिझूरला चौकार लगावून औपचारिकता पूर्ण केली.
- २ : भारतासाठी सर्वात जलद ११ हजार धावा करणाऱ्यांच्या यादीत रोहितने दुसरे स्थान मिळवले. विराटने २२२ डावांत, तर रोहितने २६१ डावांत ही कामगिरी केली.
- ३३ : भारताने बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय प्रकारात ३३वा विजय नोंदवला. उभय संघांतील ४२ सामन्यांपैकी बांगलादेशने फक्त ८ लढती जिंकल्या आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा हा बांगलादेशविरुद्धचा सलग दुसरा विजय ठरला. २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताने बांगलादेशला उपांत्य फेरीत धूळ चारली होती.
- १५६ : विराटने भारतासाठी एकदिवसीय प्रकारात सर्वाधिक झेल घेणाऱ्यांच्या यादीत संयुक्तपणे अग्रस्थान मिळवले. विराट व मोहम्मद अझरुद्दीन या दोघांनीही १५६ झेल घेतले आहेत. विराटला पुढील लढतीत अझरुद्दीनला मागे टाकण्याची संधी आहे.
- १५४ : तौहिद हृदय आणि जेकर अली यांनी बांगलादेशसाठी भारताविरुद्ध सहाव्या विकेटसाठी १५४ धावांची सर्वोत्तम भागीदारी रचली. तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येसुद्धा ही सहाव्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी ठरली.
- २०० : मोहम्मद शमीने एकदिवसीय प्रकारात भारतासाठी सर्वात जलद २०० बळी मिळवण्याचा पराक्रम केला. या लढतीपूर्वी शमीचे १९७ बळी होते. ४३व्या षटकात जेकर अलीला बाद करून शमीने २०० बळींचा टप्पा गाठला. शमीने १०४ सामन्यांत २०० बळी मिळवले. त्याने अजित आगरकरला मागे टाकले. आगरकरने १३३ लढतींमध्ये २०० एकदिवसीय बळी गारद केले होते. तसेच विश्वातील सर्व गोलंदाजांचा विचार करता शमीने सर्वात जलद २०० बळी मिळवणाऱ्यांच्या यादीत दुसरे स्थान मिळवले. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने १०२ सामन्यांत हा पराक्रम केला होता. शमीच्या शानदार पुनरागमनामुळे भारताला गुरुवारी जसप्रीत बुमराची उणीव जाणवली नाही.
गिलचा 'स्पेशल चौकार' - शुभमन गिलने ९ चौकार व २ षटकारांसह एकदिवसीय कारकीर्दीतील आठवे तसेच सलग दुसरे शतक झळकावले. यासह गिलने 'स्पेशल चौकार' मारला. एकदिवसीय सामन्यात गिलने ५० पेक्षा जास्त धावा करण्याची ही सलग चौथी वेळ ठरली. इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील अहमदाबाद येथील अखेरच्या लढतीत गिलने शतक (११२ धावा) साकारले होते. त्याआधी नागपूरमधील लढतीत त्याने नाबाद ८७ आणि कटकमध्ये ६० धावांची खेळी केली होती.
आता रविवारी भारताची पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी गाठ पडणार आहे.