लंडन : इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्रयू फ्लिंटॉफ याने 'इंग्लंड लायन्स'च्या मुख्य प्रशिक्षकपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये या पदाची सूत्रे हाती घेणाऱ्या फ्लिंटॉफने इंग्लंडच्या सर्वोत्कृष्ट तरुण क्रिकेटपटूंचा विकास करण्यास मदत केल्याबद्दल अभिमान असल्याचे व्यक्त केले.
इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) जारी केलेल्या निवेदनात ४८ वर्षीय फ्लिंटॉफने म्हटले की, दुर्दैवाने मी इंग्लंड लायन्ससोबतच्या माझ्या भूमिकेपासून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्वोत्तम तरुण क्रिकेटपटूंसोबत काम करण्याची संधी मिळण्याचा आनंद तर झालाच, पण त्यांचा विकास होताना पाहताना मोठा अभिमान वाटल्याचे त्याने नमूद केले.
अपघातातून क्रिकेटमध्ये भीषण सावरल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या फ्लिंटॉफने 'बिग बॅश लीग'मधील 'सिडनी थंडर' या संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली आहे. पाकिस्तानविरुद्ध १२ ऑगस्टपासून बेकेनहॅम येथे सुरू होणाऱ्या चार दिवसांच्या 'प्रोफेशनल काउंटी क्लब सिलेक्ट इलेव्हन' सामन्यासाठी माईक यार्डी हा फ्लिंटॉफची जागा घेईल. 'ईसीबी'चे पुरुष परफॉर्मन्स डायरेक्टर एड बार्नी यांनी 'इंग्लंड लायन्स' मधील वातावरण बदलण्यात फ्लिंटॉफने दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली आहे.