एक्स
क्रीडा

अर्जेंटिनाच्या मेस्सीची पुढील वर्षी भारतवारी; केरळमध्ये मैत्रीपूर्ण सामना खेळण्यासाठी संपूर्ण संघासह येणार

विश्वातील सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून ओळखला जाणारा लिओनेल मेस्सी पुढील वर्षी भारतात येणार आहे. केरळमध्ये मेस्सीचा अर्जेंटिना संघ मैत्रीपूर्ण लढत खेळणार असून ही लढत कधी व कोणत्या संघाशी होणार, याविषयी लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येईल. केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजायन यांनी ही घोषणा केली. अर्जेंटिना भारतात दोन सामने खेळणार आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : विश्वातील सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून ओळखला जाणारा लिओनेल मेस्सी पुढील वर्षी भारतात येणार आहे. केरळमध्ये मेस्सीचा अर्जेंटिना संघ मैत्रीपूर्ण लढत खेळणार असून ही लढत कधी व कोणत्या संघाशी होणार, याविषयी लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येईल. केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजायन यांनी ही घोषणा केली. अर्जेंटिना भारतात दोन सामने खेळणार आहे.

३७ वर्षीय मेस्सी हा सध्या कारकीर्दीतील अखेरच्या टप्प्यात आहे. २०२२मध्ये मेस्सीच्या अर्जेंटिनाने विश्वचषक उंचावला, त्यावेळी केरळसह भारतातही दणक्यात जल्लोष साजरा करण्यात आला. २०११मध्ये कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियममध्ये व्हेनेझुएलाविरुद्ध मैत्रीपूर्ण सामना खेळण्यासाठी मेस्सीचा अर्जेंटिना संघ आला होता. त्यावेळी अर्जेंटिनाने १-० असा विजय मिळवलेला. त्यानंतर आता तब्बल १३ वर्षांनी भारतीय चाहत्यांना पुन्हा एकदा मेस्सीला पाहण्याची संधी लाभणार आहे.

“केरळ तसेच भारतीय क्रीडा क्षेत्राच्या इतिहासातील हा एक अभिमानास्पद क्षण असणार आहे. मेस्सीचा अर्जेंटिना संघ पुढील वर्षी दोन सामने खेळण्यासाठी केरळमध्ये येणार आहे. हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे. स्पर्धेचे ठिकाण, प्रतिस्पर्धी व तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल,” असे केरळचे मुख्यमंत्री विजयन म्हणाले.

दरम्यान, यापूर्वीही विश्वविजयानंतर अर्जेंटिना भारतात येणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र खर्च झेपत नसल्याने त्यावेळी हा प्रस्ताव बारगळला. आता पुन्हा एकदा अर्जेंटिना फुटबॉल महासंघाशी संवाद झाल्यानंतर ते भारतात संघ पाठवण्यासाठी तयार झाले असल्याचे समजते. मात्र यामागे किती कोटी रुपयांची गुंतवणूक आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

केरळमध्ये मेस्सीचे मोठ्या प्रमाणावर चाहते असून तो येथील चाहत्यांचे प्रेम पाहून भारावून जाईल, असेही मत विजयन यांनी नोंदवले. त्यामुळे आता मेस्सीच्या आगमनाची फुटबॉलप्रेमींना उत्सुकता लागून आहे.

राज्यात ६० टक्के मतदान; सर्वाधिक ६९.२२ टक्के मतदान गडचिरोलीत

सिंहासनासाठी काँटे की टक्कर! ‘एक्झिट पोल’च्या आकड्यांमध्ये संमिश्र कौल

सुसंस्कृत महाराष्ट्रातही मतदानादरम्यान हिंसक घटना

चार राज्यांतील पोटनिवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान

मुंबईत मतदारांमध्ये निरूत्साह! केवळ ५१.४१ टक्के मतदान; अनेक मतदारांची मतदानाकडे पाठ