भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याचा मुलगा आणि मुंबई इंडियन्स संघाचा वेगवान गोलंदाज अर्जून तेंडूलकर याच्याविषयीची एक मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएल पदार्पणानंतर अर्जून तेंडूलकरची सिनिअर टीम इंडियात पदार्पण करण्याच्या दिशेनं वाटचाल सुरु झाली आहे. अर्जून तेंडूलकर याच्यासह एकूण २० प्रतिभावान खेळाडूंना बीसीसीआयनं बंगळुरुतील एनसीए अर्थात नॅशनल क्रिकेट एकेडमीसाठी बोलावणं धाडलं आहे.
बीसीसीआय एलीट स्तरावर हरहुन्नरी खेळाडूंच्या शोधात आहे. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयनं या २० खेळाडूंना एनसीएमध्ये बोलावलं आहे. हा कॅम्प एकूण ३ आठवड्यांचा असणार आहे. या वर्षाच्या शेवटी अंडर २३ आशिया कप स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार असल्यानं बीसीसीआयकडून हरहुन्नरी युवा खेळाडूंचा शोध घेतला जात आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण यांची ऑल राउंडर खेळाडूंचा कॅम्प घेण्याची संकल्पना आहे. यामुळे टेस्ट, वनडे आणि टी २० या तिन्ही फॉर्मेटसाठी खेळाडूंचा शोध घेता येईल, अशी माहिती बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.