पर्थ : कसोटी क्रिकेटमध्ये मानाचे स्थान असलेल्या ॲशेस मालिकेला शुक्रवारपासून प्रारंभ होणार आहे. ऑस्ट्रेलिया-इंग्लंड या दोन बलाढ्य संघांतील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिली लढत पर्थ येथे खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील दीड महिना क्रिकेटप्रेमींना दर्जेदार खेळ पाहायला मिळेल, अशी आशा आहे.
१८८२-८३ पासून ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात खेळवण्यात येणाऱ्या कसोटी मालिकेस ‘ॲशेस’ असे संबोधले जाते. २०२३मध्ये इंग्लंड येथे अखेरची ॲशेस मालिका झाली होती. त्यामध्ये दोन्ही संघांना २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. त्यामुळे तूर्तास ऑस्ट्रेलियाकडे ॲशेस करंडक आहे. कारण २०२१-२२मध्ये त्यांनी मायदेशात ही मालिका जिंकली होती. आता चार वर्षांनी पुन्हा एकदा कांगारूंना मायदेशात ॲशेसवरील वर्चस्व अबाधित राखण्याची संधी आहे.
पर्थ येथे पहिली कसोटी झाल्यावर त्यानंतर ४ डिसेंबरपासून ब्रिस्बेन येथे दुसरी, १७ डिसेंबरपासून ॲडलेडला तिसरी, २६ डिसेंबरपासून मेलबर्नला चौथी, तर ४ जानेवारीपासून सिडनीला पाचवी कसोटी खेळवण्यात येईल. स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करत असून पॅट कमिन्स व जोश हेझलवूड हे अनुभवी वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे पहिल्या कसोटीला मुकतील. कांगारूंनी अंतिम ११ खेळाडू जाहीर केले असून जॅक वेदराल्ड व ब्रेंडन डॉगेट यांना पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.
दुसरीकडे, बेन स्टोक्सच्या नेतृत्वात खेळणारा इंग्लंडचा संघ पराक्रमासाठी सज्ज आहे. या संघात वेगवान गोलंदाज मार्क वूडचे पुनरागमन झाले असून ओली पोपऐवजी हॅरी ब्रूककडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तसेच अष्टपैलू विल जॅक्सला अनपेक्षितपणे संघात स्थान लाभले आहे. जोफ्रा आर्चर, जो रूट या खेळाडूंच्या कामगिरीवर इंग्लंडचे भवितव्य अवलंबून असेल.
७३ ॲशेस मालिका
उभय संघांत आतापर्यंत ७३ ॲशेस मालिका झाल्या आहेत. त्यापैकी ३४ मालिकांमध्ये ऑस्ट्रेलियाने, तर ३२ मालिकांमध्ये इंग्लंडने बाजी मारली आहे. उर्वरित सात मालिका बरोबरीत सुटल्या आहेत. त्यामुळे दोन्ही संघांत दमदार द्वंद्व आहे.
प्रतिस्पर्धी संघ
ऑस्ट्रेलिया (अंतिम ११) : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), जेक वेदराल्ड, उस्मान ख्वाजा, मार्नस लबूशेन, ट्रेव्हिस हेड, कॅमेरून ग्रीन, ॲलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, स्कॉट बोलंड, ब्रेंडन डॉगेट, नॅथन लायन.
इंग्लंड : बेन स्टोक्स (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस ॲटकिन्सन, शोएब बशीर, जेकब बेथल, हॅरी ब्रूक, ब्रेडन कार्स, झॅक क्रॉली, बेन डकेट, विल जॅक्स, ओली पोप, मॅथ्यू पॉट्स, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग, मार्क वूड.
वेळ : सकाळी ७.५० वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनी आणि जिओहॉटस्टार ॲप